गुरुवार, २८ मार्च, २०२४

अमलताश



 लहानपणी वाचलेली जादूची गोष्ट. एक सुंदर राजकन्या. रूपवान, गुणवान पण कसला तरी जिवघेणा शाप. पांढऱ्या घोड्यावरून आलेला एक शूर राजपुत्र तिच्या प्रेमात पडतो, तिच्याशीच लग्न करायचा हट्ट धरून बसतो आणि मग ते लग्न करून सुखी होतात वगैरे…!


जादूच्या गोष्टी वाचताना मन नकळत कल्पनाविलासात दंग व्हायचं. वाचलेल्या शब्दांचं डोळ्यासमोर एक सुंदर चित्र उभं रहायचं. 
परवा एक अशीच सुंदर जादूची गोष्ट बघितली- ‘अमलताश’
पुस्तकातल्या गोष्टीसारखी सरळ धोपट सांगितलेली नाही पण अनेक छोट्या छोट्या प्रसंगांची आगळीच गुंफण. एखादं jigsaw puzzle लावताना कसे आपण तुकडे जोडत जातो किंवा एखादं कोलाज बनवताना जसा feel येतो तशीच काहीशी गोष्ट पुढे सरकत जाते. हळूहळू उलगडत जाते. 

तुमच्या आमच्या सारखीच, आसपास असतात तशी सगळी पात्रं. त्यांचं वागणं-बोलणं, एकमेकांची काळजी घेणं, टाइमपास करणं, ‘पुणेरी’ पध्दतीने एकमेकांची खेचत राहणं सगळं आपल्या आजूबाजूलाच घडतंय असं वाटतं. त्याला तडका म्हणजे कॅनडाहून आलेल्या पल्लवीचा जबरदस्त accent आणि ‘एक विचारू का ?’ हा प्रश्न !!
जसं ‘कहानी’मध्ये कोलकता महत्त्वाची भूमिका पार पाडतं तसंच ‘अमलताश’मध्ये पुणं सतत भेटत रहातं. वेताळ टेकडीवर, पौडफाट्याच्या फ्लायओवरवर, नदीपात्रात, कॅनालरोडच्या वॅाकवे वर, दुचाकी पुलावर, पेठेतल्या दुकानात, वाड्यातल्या घराच्या गच्चीवर…आणि सिनेमॅटोग्राफरची कमाल म्हणजे पुणं इतकं सुंदर दिसतं नां!!!

अमलताशचं संगीत अफलातून. ‘Absolute Pitch’ची दैवी देणगी लाभलेला राहूल,  unplugged style अप्रतिम compositions, पल्लवी परांजपेचा वेगळाच पोत असलेला आवाज, ऐकत रहावी अशी दीप्ती माटेनी गायलेली लोरी, jamming session आणि चोख साथीदार पियानो आणि गिटार. संपूर्ण चित्रपटावर या संगीताचं गारूड रहातं. 

अमलताश म्हणजेच बहावा. पहिल्यांदा वि.द. घाट्यांच्या ‘कॅशिया भरारला’ मध्ये शाळेत असताना भेटलेला आणि आता नशीबाने दर उन्हाळ्यात भेटत राहणारा. कारण माझ्या घरासमोरच्या रस्त्यावर ओळीने बहाव्याची झाडं आहेत. जानेवारी फेब्रुवारीमध्ये निष्पर्ण, निष्प्राण दिसणारी झाडं. सगळीकडे जोरदार पानगळ होत असते. बहुतेक झाडांच्या नुसत्याच काड्या राहिलेल्या. आणि अचानक एखाद-दुसरी काडी हिरवी व्हायला लागते. कुठे कुठे हिरवे शेंडे दिसायला लागतात. मग एखादा छोटासा पिवळ्या फुलांचा झुबका. आणि पाहता पाहता काही दिवसांत सगळी बहाव्याची रांगच पिवळ्याघोसांनी बहरून जाते. उन्हाळ्यामुळे तगमग होत असली तरी बाहेर बघता क्षणीच प्रसन्न वाटतं. A great feeling of abundance and joy of life…

वर्षातल्या अवघ्या काही आठवड्यांचा हा बहर. पुढे येणाऱ्या पावसाची वर्दी देणारा. हा बहर येतोच तो समृध्दीची, पूर्णत्वाची भावना घेऊन. ‘जिंदगी लंबी नहीं पर बडी होनी चाहिए’ चा दाखला देत फुलत रहातो. 
राहूल पल्लवीची उण्यापुऱ्या एक महिन्याची ओळख, दोघांची समांतर आयुष्यं आणि तरीही नकळत एकमेकांत गुंतत जाणं, फुलत जाणं… त्यांच्या आयुष्यातल्या ‘अमलताश’चा अर्थ प्रत्येकाने आपापल्यापरीने लावावा. एखादं चित्रं बघताना, मैफल ऐकताना जसं एक   Abstract feeling असतं तसंच काहीसं ‘अमलताश’ बघताना जाणवत रहातं. आणि म्हणूनच प्रत्येकाला तो वेगवेगळा समजतो, भावतो.
थोडासा चाकेरी बाहेरचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्कीच पहावा असा ‘अमलताश’ 

©️वैशाली फाटक


सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

सुदाम्याचे पोहे

      " ईशाची मम्मा ना खूप छान  आहे दिसायलाआणि तिचे ड्रेस पण खूप छान असतात. पण अगं ती ना मम्मा नाही वाटत !".  सोनिया लहान असताना तिच्या पाळणाघरात एक नवीन मुलगी आली  होती. तिची आई रोज तिला सोडायला यायची आणि थोडावेळ थांबून मग जायची. सोनियाचं निरीक्षण फार. मला वाटलं असेल एखादी ' संतूर गर्ल'. पण सोनियाला वेगळंच काहीतरी जाणवत होतं आणि तिला नक्की काय वाटतंय ते मला कळत नव्हतं. आज एकदम ह्या प्रसंगाची आठवण झाली गौरीच्या मुखवट्यांचे फोटो बघून.  

या वर्षी घरचा गणपती करून निघाले. गौरीला पुण्यात नसल्याने सगळे अपडेट्स फोनवरच. गौरी गणपतीचे दिवस  आले की  वातावरणातच कसा उत्साह येतो. गणपतीचे स्टॉल लागायला लागतात आणि मग माझी एक हमखास चक्कर तुळशीबागेत होते. गौरीचे मुखवटे, स्टॅन्ड , साड्या , दागिने,सजावटीचं साहित्य यांनी तुळशीबाग गजबजून जाते. कुणाकडे खडयाच्या गौरी, कुणाकडे पितळ्याचे  किंवा चांदीचे मुखवटे. कुणाकडे तांब्या-भांड्यावर हळदी कुंकवाने रंगवलेल्या गौरी तर बरेच ठिकाणी शाडूचे मुखवटे. आमच्या घरी उभ्याच्या गौरी नसल्या तरी लहानपणी खळदकर मावशीकडे मी हक्काने तीन दिवस गौरी  आणायला,बसवायला, हळदीकुंकू द्यायला जात असे. लग्न झाल्यापासून आनंदिनी आणि अश्विनीकडच्या  गौरींचे दर्शन मी सहसा चुकवत नाही. गौरीच्या चेहेऱ्यावरचा प्रसन्न भाव आणि पूजेनंतर जे तेज येतं ते बघून मला एक वेगळीच ऊर्जा मिळते.

परवा एका मुखवट्याचा फोटो व्हॉट्स ऍप वर आला. अतिशय सुंदर मुखवटा. सुबक चेहेरा. आधुनिक केशरचना, कानावर बटा, कोरीव भुवया,डोळे-पापण्या -गालावर आजच्या पद्धतीचा मेकअप, कानात झुमके , गळ्यात नव्या जुन्या प्रकारचे दागिने. मुखवटा सुंदर होता यात शंकाच नाही पण त्यात मला काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. काही तरी कमी वाटत होतं, राहून गेल्यासारखं.  गौरीच्या साध्याशा मुखवट्यातला सात्विक शालीन भाव, मांगल्य, समाधान, तृप्ती कुठेतरी या नवीन मुखवट्यात मी शोधू पाहत होते.



मला एकदम आपली आधीची पिढी आठवली. आपली आई, आजी, काकू-आत्या, मामी-मावश्या, शाळेतल्या बाई,शेजारच्या काकू, मैत्रिणींच्या आया...सगळ्याजणी काही 'लौकिकार्थानं  सुंदर' नव्हत्या पण तरीही किती छान दिसायच्या. त्यातल्या बहुतेक जणी कधी ब्युटी पार्लरची पायरीही चढल्या नसतील. स्नो, पावडर, शिंगारचे ठराविक रंगातले कुंकू किंवा पिंजर, केसांची वेणी किंवा अंबाडा, ठराविक फॅशनच्या साड्या आणि दागिनेही मोजके चार-पाच प्रकारचे.

एखादा समारंभ किंवा हळदी कुंकू असेल तर चापून चोपून नेसलेल्या ठेवणीतल्या जरीच्या नऊवार किंवा पाचवार साड्या, गळ्यात तन्मणी,नाकात नथ, केसात घरचं गुलाबाचं फूल किंवा गजरा. चेहेऱ्यावर तृप्त, शांत समाधान!! रवी वर्म्याच्या चित्राइतकंच सुंदर वाटतं मला हे आठवणीतलं चित्रं.   

आपल्या मुलांवरचं प्रेम, आवश्यक ती शिस्त आणि धाक, मुलांच्या आजारपणात काळजीनं येणारा हळवेपणा,मुलांची छोटी हौस-मौज , हट्ट पुरवण्यातलं समाधान, लहान सहान गोष्टींचं डोळ्यातलं कौतुक, श्रावणी शुक्रवारी किंवा अश्विनी पौर्णिमेला मुलांना ओवाळताना चेहेऱ्यावरचा सात्विक आनंद. या सगळ्या नितळ भावनांचं 'आईपण' चेहेऱ्यावर खुलून येत असेल का? कुठल्याच सौंदर्याच्या परिभाषेत मांडता येणार नाही असं,बाह्य सौंदर्याच्या पलीकडचं वेगळंच परिमाण. जे फक्त अनुभवता येतं, आतून जाणवत राहतं.

आणि आज इतक्या वर्षांनी सोनिया तेव्हा मला जे सांगू पाहत होती ते पुरतं समजलं. डोळ्याला भावणारं, लुभावणारं  सौंदर्य शोधायच्या नादात कुठेतरी ‘मनीचा भाव’ हरवून बसलो का आपण?

 मला आठवतं,सोनिया झाली तेव्हा संजूचे मामा , भाऊमामा हॉस्पिटल मध्ये एका छोट्याशा कागदाच्या पाकिटात माझ्यासाठी नारळाच्या बर्फीच्या चार वड्या  घेऊन आले होते. डोळ्यात नेहमीचे मिश्किल हसू आणि मला प्रेमाने म्हणाले " सुधामामीने ताज्या वड्या केल्यात. बघ आज तुझं आणि नातीचं तोंड गोड करायला घेऊन आलो”. त्या वड्यांवर ना बदाम पिस्त्याची नक्षी, ना केशराचा वर्ख. पण इतकी अप्रतिम चव आणि भरपूर मायेचा ओलावा. तसंच एकदा लग्न झाल्यावर आम्ही दोघं वेंगुर्ल्याला फाटकांचे गणपतीचे देऊळ आहे तिथे गेलो होतो. गावात एक चुलत घर आहे जे गणपतीची व्यवस्था बघतात. जेवायला रोजचा साधा स्वयंपाक. गोड म्हणून त्या आजींनी दुभत्याच्या कपाटातून दोन छोट्या दह्याच्या वाट्या काढल्या, वरून साखर घातली आणि आमच्या पानात ठेवल्या. आजींनी किती साधेपणात वेळ साजरी केली. नाही तर आज काल कोणाला जेवायला बोलवायचे म्हणजे आधी काय बेत करायचा ते ठरवायचे, त्या साठी दहा ठिकाणाहून सामान आणायचे. एक दिवस आधी घराची स्वच्छता, क्रोकरी काढा, मग जेवणाच्या दिवशी टेबलाची, घराची सजावट आणि मग दुसऱ्या दिवशी सगळं क्रमाने आवरा. मग एवढा उटारेटा करण्यापेक्षा सरळ बाहेरच भेटू किंवा बाहेरून मागवू.

खरंच सगळं सुंदर, perfect, छान करण्याच्या नादात आपणंच आपलं आयुष्य कॉम्प्लिकेटेड आणि दिखाऊ करून घेतलं की काय?

पूर्वी कुणाला साडी द्यायची पद्धत पण किती छान होती. आई साडीची घडी मोडून, निऱ्या करून, भोवतीने गोल पदर गुंडाळून, साडीला हळद कुंकू लावून मग ज्यांना द्यायची त्यांना कुंकू लावून हातात देत असे. कागदातून घडी काढताना कुठला रंग असेल ही उत्सुकता, नव्या कोऱ्या साडीचा वास, पोतावरून हळूवार हात फिरवून बघणं असं सगळं रंग, गंध,स्पर्श आणि मनाला भावणारं नव्या नवलाईचं सुख आता उत्तम सजवलेल्या साडी बॉक्स मध्ये कसं मिळणार ? कोणी आलं की ओटी भरून कापड देणं ही पद्धत आपल्या व्यवहारी (प्रॅक्टिकल) विचाराने आपण जवळपास बंदच करून टाकली. पण मला वाटतं , घरात असलेल्या गोष्टींमधून एकमेकांना काही तरी देऊन प्रेम व्यक्त करायची हीअतिशय साधी -सोपी आणि आताच्या भाषेत sustainable पद्धत होती.

 पूर्वीच्या ह्या साध्यासोप्या गोष्टी... पण 'निर्मळ आनंदाची' देवाण घेवाण होत होती. पंचेंद्रियांच्या जाणिवांच्या पलीकडच्या , अंतरीच्या खऱ्या खुऱ्या भावनांचं मोल जाणून ते तितक्याच प्रेमानं जपलं जात होतं.

आपला सगळा आनंद, समाधान, सुख, यश दिखाव्यात,Likes मोजण्याचा, status ठेवण्याच्या नादात  'सुदाम्याचे पोहे' खाणारा आपल्या मनातला कृष्णच आपल्यापासून दुरावला की काय ??


p.c. आनंदिनी क्षीरसागर, Google

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

अदलाबदल

 

    "गॅस बारीक ठेव, त्या भांड्याला लाकडी डाव वापर, तुपाच्या डब्याच्या झाकणावर चहाचा चमचा कशाला ठेवलास ?" अशा बऱ्याच सूचना मला लेकीकडून मिळत असतात कारण आता तिच्या स्वयंपाकघरात मी लुडबुड करते ना ! सात-आठ वर्षापूर्वी घेतलेली शिकवणी तिने चांगली लक्षात ठेवली आहे ते बघून बरं वाटतं. एकेकाळी खोलीतला पसारा आवर म्हणून मी तिच्या मागे लागायचे आणि आता ती माझ्यामागे स्वयंपाकघर तिच्या पद्धतीने आवरत फिरत असते. सध्या अमेरिकेत आल्यापासून भूमिकांची मस्त अदलाबदल झाली आहे आणि मी हा बदल एकदम एंजॉय करतेय.

    माझी तीन वेळा ठरवून रद्द झालेली अमेरिका वारी या वेळेस पूर्ण झाली. त्यामुळे ' रात्र थोडी सोंगं फार ' असं आहे. आईला शक्य ती ठिकाणे दाखवायचा सोनिया आणि माझा होणारा  जावई यश यांचा प्रयत्न असतो. गेल्या आठवड्यात मुलांबरोबर ग्रीन्सबरो , ऍशविल, ब्लॅक माउंटन अशी मस्त ट्रिप झाली. एरवी कुठे जायचे म्हणजे मी भरपूर गूगल करते. कुठून कसं जायचं, काय पाहायचं, बरोबर काय घ्यायचं ... पण यावेळेस एकदम उलट. सगळी काळजी मुलांना. आपण फक्त  चला म्हटले की चलायचे. घरून गावाला निघताना दूध फ्रीज मध्ये ठेवलंय नां, गॅस, नळ नीट बंद केलेत नां किंवा air bnb सोडताना सगळ्या खोल्या बघणं , कचरा टाकणंआपलं काही कामंच नाही. लहानपणीचं  बिनजबाबदारीचं सुख बरेच वर्षांनी मिळतंय तर मजा करा.

    आधीच्या आठवड्यात सोनियाच्या ऑफिसची चार दिवस फिलाडेल्फियाला कॉन्फरन्स होती म्हणून मी पण तिच्या बरोबर गेले.म्हटलं तेवढेच एक ठिकाण बघून होईल. वॉकिंग टूर, ट्रॉली टूर कुठे कुठे जायचं असं मी बघून ठेवलं होतं. पण तिथे जरा 'वल्ली' लोक असल्याने आणि आम्ही जायच्या आदल्याच दिवशी हॉटेलजवळ एका माणसासोबत काहीसा प्रकार घडल्याने एकटं-दुकटं फिरू नका अशा सारख्या सूचना सोनियाला येत होत्या. एकदा तर ती मला कोपऱ्यावरच्या कॅफेतून सोडायला आली. “मी काय कधी एकटी फिरली नाहीये का कुठे?” अशी मी कटकट करताचतुझ्यापेक्षा इथले चार पावसाळे जास्त पहिले आहेत मीअसं म्हणून तिनं मला गप्प केलं. तरीही आपली आई कल्टी  मारून कुठेतरी  पटकन जाऊ शकते असा अंदाज असल्याने  तिने माझं लोकेशन ट्रॅकिंग चालू करून ठेवलं.वॉकिंग टूर नाही तर निदान Big Bus टूरसाठी मी परवानगी मिळवली आणि मस्त भर पावसात भटकून आले.  

    वॉशिंग्टनच्या घरी मात्र मी तिच्याशिवाय कुठे बाहेर पडत नाही. कारण इथे दर चार-पाच  माणसांमागे एक पाळीव प्राणी आहे. दर वेळेस लिफ्टमध्ये हे चार पायांचे मित्र नाहीत ना ते बघूनच मला चढावे लागते. तसंच एस्कलेटरवर चढताना मला काही होत नाही पण उतरताना मात्र चक्कर येते. त्यामुळे आईला (तिच्या हसण्यासकट) सांभाळून नेणे हा सोनियासाठी एक उद्योगच झाला आहे. एकदा तर रात्री वा फायर अलार्म वाजला. नेहमीप्रमाणे मी गाढ झोपेत. सोनियानेच उठवलं आणि अर्धवट झोपेत नऊ मजले उतरून खाली आलो. कुणाकडे तरी दूध जळले होते त्यासाठी इतक्या लोकांची आणि प्राण्यांची झोपमोड.

     अशी सगळी मजा चालू असताना कधी कधी मात्र आईची फार आठवण येते. कारण कळत-नकळत आता मी तिच्या सारखीच वागते.

    मला आठवतंय, कोव्हिडच्या पहिल्या वर्षी आई रहायला आली होती. मी अक्षरशः दिवसभर खुर्चीला चिकटल्यासारखी बसून काम करायचे. मग आई जमेल तशी मदत करत रहायची. संध्याकाळी काही तरी गरम खायला कर. कधी भाजी निवडून ठेव, थोडी फार आवरा-आवरी. आता मी ही तेच करते. "मी नंतर एकदम सगळी भांडी घासीन" असं सोनियानी बजावलं तरी दिवसभर पडतील तशी भांडी घासून टाकते. "त्यात काय गं, वेळ आहे तर घासून टाकली. बसून तरी काय करायचं सारखं " किंवा " मी आहे तोवर करते. नंतर तुलाच करायचं आहे सगळं"  चक्क आईचेच डायलॉग मारायला लागलेय मी !! सोनियाला दोन दिवस घरून काम करायचं असतं. जेव्हा तिचा व्हिडीओ कॉल असेल तेव्हा खोलीत आवाज न करता बसून रहाते. जणू काही ' Mute-Unmute/ teams background ' या गोष्टी मला माहितीच नाहीत. आपल्यामुळे तिच्या कामात व्यत्यय नको एवढंच वाटतं. दिवसभर मुलांबरोबर भरपूर भटकून , संध्याकाळी chill केल्यावर रात्री खोलीत एकटंच पुस्तक वाचत किंवा गाणी ऐकत बसायला बरं वाटतं. "तुम्ही या जाऊन सगळे, मी थांबते घरीच" असं बरेचदा आई म्हणतेच की.

    विचार करायला लागले की वाटतं किती सहज हे सगळं माझ्यात आणि सोनियात झिरपलं आहे. वळणाचं पाणी म्हणतात ते हेच की काय ? प्रत्येक भूमिकेत प्रवाही होणारं ?

    आता परत निघायची वेळ जवळ आली आहे. बघू या सध्याच्या भूमिकेचा 'जेट लॅग' किती टिकतो ते !!

 

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला भेट

 

" ममा, फिरायला आल्यावर बघितलेली अमेरिका आणि राहायला आल्यावर बघितलेली अमेरिका; खूप फरक आहे त्यात. खूप स्पर्धा आहे इथे आणि कोणी तुम्हाला फार मदत करत नाही. तुमचं तुम्हालाच पुढे जावं लागतं." मी आणि सोनिया जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी (GWU) बघायला गेलो तेव्हाचा हा संवाद.

कोविडमुळे दोन वर्ष ठरवूनही तिच्याकडे येता आलं नव्हतं. पहिल्यांदा -कॉनव्होकेशन  झालं. सगळे विद्यार्थी, पालक, प्रोफेसर्स virtually connect झाले होते. पण २०२१ मध्ये युनियव्हर्सिटीला २०० वर्षं पूर्ण झाली म्हणून दोन्ही वर्षांच्या कॉनव्होकेशनसाठी खूप मोठ्या समारंभाचे आयोजन केले होते. (वॉशिंग्टनमध्ये  चार युनिव्हर्सिटीज असल्या तरी फक्त GWU चे कॉनव्होकेशन  नॅशनल मॉल इथे  होते. नॅशनल मॉल इथे सगळी महत्वाची स्मारकं आहेत.) त्यावेळेस जाता  येईल असं वाटत असतानाच ट्रॅव्हल रेस्ट्रीकशन्स मुळे जमलं नाही. त्यामुळे या वेळेस आल्या आल्या पहिली भेट GWU ला.

"ममा, आता पुढचे दीड दोन तास आपण कॅम्पस टूर करायची आहे. भरपूर चालायची तयारी आहे ना ?" मेट्रोमधून बाहेर येतानाच सोनिया म्हणाली. तरी बरं तिला माहित आहे की युनिव्हर्सिटी वगैरे म्हटलं की माझ्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. गोडबोले आणि शिक्षण यांचं फार जवळचं नातं आहे. सगळे गोडबोले आयुष्यभर काही ना काही शिकत राहतात आणि शैक्षणिक संस्थांना हातभार लावतात असं संजू आम्हाला नेहमी चिडवत असतो.

युनिव्हर्सिटी कॅम्पस म्हटला की आपल्या डोळ्यासमोर विस्तीर्ण परिसर उभा राहतो. हिरवेगार वृक्ष, दगडी इमारती, त्याभोवती हिरवळ-बागा, विखुरलेल्या इतर इमारती, फारशी वाहतूक नसलेले रस्ते, पायवाटा, गजबजलेलं कॅन्टीन आणि ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे घोळके.

GWU मात्र या पेक्षा खूप वेगळी आहे. मेट्रो स्टेशन मधून बाहेर आलो की युनिव्हर्सिटीचा कॅम्पस सुरु. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक चौकांमध्ये लांबवर पसरली गेलेली ही युनिव्हर्सिटी पण सगळा कॅम्पस मुख्य शहरातच.  

टूरची सुरुवात अर्थातच सोनियाच्या 'Milken School of Public Health' पासून



या इमारतीची रचना अशी की आत शिरल्यावर लिफ्ट दिसतच नाही. अर्थातच सगळे समोरच्या जिन्यानेच वर जातात. एक जिना संपला की दुसऱ्या मजल्यावर जायला एक चक्कर मारून दुसऱ्या बाजूला जायला लागते, तिथे पुढचा जिना. दिवसभर सगळ्यांना सहजच व्यायाम होत राहतो. आग लागली तर दुसरा एक जिना आपोआप बंद होतो आणि सगळ्यांना मुख्य जिन्यानेच खाली यायला लागते. थिएटर स्टाइल क्लास रूम्स,प्रत्येक मजल्यावर छोट्या स्टडी रूम्स,डिस्कशन रूम्स, वेगवेगळी डिपार्टमेंट्स. मला तर स्कूल खूपच आवडली. पण सोनिया आता तिथे नसल्याने आम्हाला फार वेळ थांबता आलं नाही.  तिथून पुढे GW हॉस्पिटल. आपल्या दीनानाथ सारखी तिथेही मस्त कॉफी मिळते असं कळलं. तिथून पुढे मेडिकल, इंजिनियरिंग, सायन्स , आर्टस् , law अशी अनेक डिपार्टमेंट्स, टेक्सटाईल म्युझियम , डिझाईन म्युझियम, लहान मोठी बरीच होस्टेल्स , कम्युनिटी बिल्डींग्स, बँक , ग्रोसरी शॉप्स . सगळा परिसर विद्यार्थ्यांनी फुललेला. त्यांना काम करत बसण्यासाठी ठिकठिकाणी छोटे छोटे आयलँड्स, बेंचेस, वर्क स्टेशन्स.  त्या रस्त्यांवरून फिरताना परत एकदा कॅम्पस मधली उत्फुल्लता जाणवायला लागली. एकदम फ्रेश, ताजं -तवानं वाटायला लागलं.  


कॅम्पस मध्ये तीन मोठ्या लायब्ररीज आहेत. २४ तास चालू असतात. आत जाऊन पाहायची फार इच्छा होती पण ऍक्सेस नसल्याने बाहेरूनच पाहावी लागली. बरीच मुलं शेअरिंग बेसिसवर राहत असल्याने बराचसा अभ्यास, सबमिशन इथेच बसून पूर्ण करतात


बाहेरच्या रस्त्यावर बरीच वाहतूक असली तरी आतले रस्ते शांत होते. गाड्यांची फारशी वर्दळ नाही. बहुतेक सगळे विद्यार्थी 'कमवा आणि शिका' प्रकारातले असल्याने आपल्याकडे कॉलेज पार्किंगमध्ये गाड्यांची जशी तुडुंब गर्दी असते तसं काहीच दृश्य नव्हतं. सायकलीही दिसल्या नाहीत. मेट्रोची उत्तम सुविधा हेही एक कारण.

'स्टुडंट्स सेंटर' हे इथलं  एक महत्वाचं ठिकाण. आल्या आल्या सगळ्यांची ओळख होते  ती  इथेच. अनेक देशांचे सण -उत्सव इथे उत्साहात साजरे होतात. ही एकदम happening आणि रंगीबेरंगी जागा आहे. नवीन कार्यक्रमांची पोस्टर्स, वेगवेगळ्या जाहिराती, सूचना, टाइमपास करणारी मुलं, गजबजलेलं फूड कोर्ट,वरच्या मजल्यावर योगा  रूम, डान्स रूम, निवांत संध्याकाळी बसण्यासाठी रूफ टॉप टेरेस . मला तर ही जागा फारच आवडली.    

 कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टनचे पुतळे आहेत. त्यांचा मॅस्कॉट हिप्पोचा ही पुतळा आहे


असा हा कॅम्पस पुढे लिंकन मेमोरियलपाशी संपतो. "तुमच्या युनिव्हर्सिटीला आमच्यासारखा कॅम्पस नाही" असं जेव्हा बाकीच्या युनिव्हर्सिटीची मुलं यांना चिडवतात तेव्हा, आमच्याशेजारी लिंकन मेमोरिअल आहे असं  GWUची मुलं अभिमानाने सांगतात.

वाटेतच WHO चे ऑफिस लागले. ऐन कोविडच्या काळात सोनियाला  तिथे कोविड संदर्भात इंटर्नशिप करायला मिळाल्याने तिथे जाणे माझ्यासाठी खासच होते.






दीड-दोन  तासांची कॅम्पस टूर मला आठवणींमध्ये घेऊन गेली. डेन्टिस्ट्रीच्या दुसऱ्या -तिसऱ्या वर्षात असताना सोनिया काही रिसर्च पेपर्स वर काम करायला  लागली.दोन पेपर इंटरनॅशनल जर्नल मध्ये निवडले गेले . २०१६ मध्ये ती एकटीच अमेरिकेला जाऊन आली आणि तिथूनच कदाचित पुढची दिशा ठरत गेली.

मग वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती मिळवणं, तयारी करणं सुरु झालं. भारतात 'Public Health' ही शाखा अजून फार प्रचलित नसल्याने फारशी माहिती उपलब्ध  नव्हती. पण प्रो. सत्यनारायण सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि इतर सहा युनिव्हर्सिटी मिळत असताना GWU निवडण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला. वॉशिंग्टनडीसीमध्ये राहिल्याने इतर अनेक उपक्रमात भाग घेता आला. सिनेटरचे Congressional  Hearing कॅपिटल हिलमध्ये जाऊन ऐकायला मिळाले.

मला खात्री आहे, शिक्षणाच्या संधी शोधत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची साधारण अशीच गोष्ट असणार. स्वप्नांचा पाठपुरावा करत त्यांनी आपलं गाव किंवा देश, आपलं घर, मित्रमैत्रिणी या 'comfort zone' मधून बाहेर येत झेप घेतली आहे. सगळ्या अवघड गोष्टींवर मात करून पुढे जाण्याचं त्यांचं या लहान वयातलं धैर्य आणि या सगळ्यासाठी लागणारी  विचारातली सुस्पष्टता  मला अचंबित करते. जेव्हा जेव्हा मी या पिढीतल्या मुलांशी बोलते तेव्हा दर वेळेस मला वाटतं की मी २५ वर्षं उशीरा जन्माला यायला हवं होतं. GWU फिरून आल्यावर तर मला हे आज फारच प्रकर्षांनं जाणवलं. बघू या आता इथे एखादा कोर्स सिनियर सिटीझन साठी आहे का ते 😊😊