मंगळवार, ७ मार्च, २०१७

महिलादिनाच्या निमित्ताने ...




"मला बायकोबरोबर गेलंच पाहिजे डॉक्टरकडे. तसं विशेष काही नाहीए . पण तिला कुठल्याही गोष्टीसाठी  माझी मदत लागते . एकटीनं काही करताच येत नाही तिला !"

" अरे असं काय म्हणतोस ? चांगली शिकलेली आहे ती . फार तर चुकेल एक-दोनदा पण नंतर तर स्वतंत्रपणे करायला लागेल चार गोष्टी "

" नाही वैशाली. खूप समजावून सांगितलं . पण ऐकतच नाही . ती म्हणते , घरचं सगळं मी बघते, बाहेरचं सगळं तू बघ. बँकेचे व्यवहार , घराचे हप्ते काहीच समजून घायचं नाहीये तिला . मी एकटा कमावता . उद्या आजारी पडलो तर कसं व्हायचं ?  कुठलाही निर्णय ती स्वतःच्या जबाबदारीवर घेत नाही "
ओह , हा प्रॉब्लेम आहे तर...

देवदत्त पटनाईक यांनी सीतेवर लिहिलेलं पुस्तक "The Girl who chose".
सीतेने घेतलेल्या निर्णयांबद्दल बोलत असताना माझा नवरा म्हणाला," खरं तर सगळ्या बायका सीतेसारखे स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ शकल्या पाहिजेत. पण कितीजणी निर्णय घेतात? बरेचदा त्या परिस्थितीला तरी पुढे करतात किंवा दुसऱ्यावर जबाबदारी सोपवून मोकळ्या होतात. आपण मुलींना त्यांचे निर्णय घ्यायला आणि ते निभावून न्यायला कधी शिकवणार ?"

दोन पुरुषांची ही भाष्यं खरोखरीच विचार करायला लावणारी आहेत .

नुकताच मी एक Leadership Development Program attend केला .
‘Women Leader म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं?‘  असा प्रश्न येताच  बहुतेकांनी इंदिरा गांधी , चंदा कोचर , इंद्रा नूयी ,शेरिल सँडबर्ग अशी नावं घेतली .
पण आपली आजी , आई , बायको किंवा बहीण , ज्या इतक्या समर्थपणे घरची आघाडी सांभाळत असतात त्यापैकी कोणाचंही नाव पुढे आलं नाही .
खंबीरपणा ( strength) , चिकाटी ,मुत्सद्देगिरी ( diplomacy), interpersonal skills, stakeholder management, decison making खरं तर या सगळ्या  leadership qualities कमी अधिक प्रमाणात सर्व पिढयांमधल्या स्त्रियांमध्ये असतातच.
पूर्वीच्या  काळी एकत्र कुटुंब पध्दतीत राहताना किंवा लहान वयात वैधव्य आल्यावर मुलांना वाढवताना कितीतरी जणींनी स्वतःला सिध्द केलं आहे . परिस्थितीशी चिवट झुंज दिली आहे . फारसं शिक्षण नसताना केवळ अनुभव आणि आंतरिक बळाच्या जोरावर जोखीम घेत मार्ग काढला आहे . पण कधी कधी मला प्रश्न पडतो की crisis situation आली तरंच आपण पुढे व्हायचे का ?

आज कितीजणी घरातील महत्त्वाच्या निर्णयात सहभागी  होतात?  जमिनीचे , घराचे, गाडीचे  खरेदी- विक्री व्यवहार, मोठ्या गुंतवणुकी, विम्याचे हप्ते ....
कितीजणी स्वतःहून त्याची माहिती करून घेऊन त्यावर आपली मतं मांडतात ?
नवऱ्याच्या बिझनेसची किंवा नोकरीची , तिथल्या आर्थिक परिस्थितीची किती जणींना माहिती असते ?
मला वाटतं  हे प्रमाण खूप कमी आहे.
कंपनीतजॉब कट’ सुरु झाल्यावर स्ट्रेस घेतलेले कितीतरी जण भेटतात . आर्थिक आघाडी कशी सांभाळायची या विवंचनेत असतानाच बायकोला हे बिझिनेस डायनॅमिकस कसे समजवायचे अशीही कुठेतरी त्यांना काळजी असते.

स्वतः एक स्त्री असूनही मला असं वाटतं की आपल्याला बरेचदा choice असतो . मुलगा -मुलगी शिकताना मुलाने कायम असे शिक्षण घेतले पाहिजे , जे त्याला पुढच्या आयुष्यात पैसे कमवायला उपयोगी पडेल , पण मुलीचे तसे नाही . स्वतःच्या पायावर उभी राहिली तर छानच पण नाही राहिली तर काही हरकत  नाही.
नोकरी करायची की नाही,पैसे कमवायचे की नाही हा प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर दुमत नाही  
पण आपल्या आयुष्याची  , आपल्या प्रगतीची , बऱ्या वाईट अनुभवांची जबाबदारी ( Ownership) आपण कधी घ्यायला शिकणार

गेले काही दिवस महिला दिनाचे जोरात प्लँनिंग चालू आहे , छान मेसेजेस यायला सुरुवात झालीये . महिलांसाठी खास कार्यक्रम , जसे आरोग्य , योगाभ्यास , मेकअप , डाएट टिप्स , विविध क्षेत्रातल्या महिलांचे अनुभव कथन आणि सत्कार , घरातल्या मदतनीस बायकांसाठी आरोग्य तपासणी आणि असं बरंच काही ...
असं सगळं उत्साहाचं वातावरण आजूबाजूला असताना थोडंसं स्वतःला जोखायला पण सुरुवात करू या कां  ?
आपल्या आई वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा  स्वतःसाठी,कुटुंबासाठी आणि जमलंच तर समाजासाठी काहीतरी उपयोग करू या का ?

या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सुप्त क्षमतांना जागं करूया ...
थोडंसं आपल्या परिघाबाहेर उडायला शिकूया ...
कुणास ठाउक , उडता उडता कदाचित अथांग आकाशच कवेत घ्यावंसं वाटेल... 



वैशाली फाटक
मार्च ,२०१७

७ टिप्पण्या:

  1. सुंदर लेख. समर्पक आणि समयोचित 👌

    उत्तर द्याहटवा