मंगळवार, २१ मार्च, २०१७

Mr. and Mrs. Phatak Repeats (?)!!!




प्रसंग १: १७ डिसेंबर १९९१

संजीव आणि वैशालीचे लग्न नुकतेच लागले आहे. वैशाली भंजाळलेल्या अवस्थेत ... आहेर घ्यायचा नाही असं ठरलं असतानाही पाकिटं घ्यायला लागली आहे. आणि संजू तिला समजावतोय "अगं हे काय करते आहेस तू?"


प्रसंग :
केदार फाटक पहिल्यांदाच दुताईच्या (म्हणजे वैशालीच्या आईच्या) घरी भेटायला आला आहे. चहा, मिसळ आणि थोड्याशा गप्पा झाल्यावर आरामात बेडवर मांडी घालून गणपतीचे फोटो पाहात आहे

प्रसंग :

साधारण १९९२-९३ साल 

संजू आणि वैशाली गप्पा मारत आहेत. वैशालीच्या मैत्रिणीला नवऱ्यामुळे करियर सोडावे लागले म्हणून ती खूप अपसेट आहे. Gender Inequality, Rights of Individuals वर तावातावाने बोलत आहे. आणि संजूचे एकच शांत स्टेटमेंट - "It’s a law of nature .... बाकी मला काही समजत नाही. "


प्रसंग डिसेंबर २०१६

केदार आणि अपूर्वाचे रिसेप्शन... लोकांची गर्दी आणि रांग संपतच नाहीये.... भुकेने आणि एकंदर गर्दीने अपूर्वाचं डोकं हळूहळू फिरायला लागलं आहे आणि केदार मात्र शांतपणे हसून सगळं  साजरंकरतोय

प्रसंग
संजू फाटक उर्फ गोटू पहिल्यांदाच डॉ गोडबोल्यांच्या घरीभावी जावई’ म्हणून भेटायला आला आहे. थोडा वेळ फॉर्मल बोलणे झाल्यावर आरामात सोफ्यावर मांडी घालून सासूबाईंनी केलेला शिरा खात आहे


प्रसंग
“मला अजिबात पटतच  नाही हे .... " कुठल्यातरी सामाजिक विषयावर अपूर्वा तावातावाने बोलतेय

"अगं, त्यांनी इतकं काम केलं म्हणून तर आपण आज इथं आहोत." इति मी ...  समजुतीच्या स्वरात

"मावशीचं बरोबर आहे... त्यांच्यामुळेच तुम्ही आहात ". " अतिशय शांत पण ठाम शब्दात केदार...


२५ वर्षे.. वेगवेगळे प्रसंग.. पण काहीतरी साम्य...
 आणि मी हे सगळे तुकडे जुळवून, ठिपके जोडून कुठलं चित्र बघतेय?

Yes!!! Got it, it’s another Mr and Mrs Phatak in making!!!..... 

मिसेस फाटक (Sr) आणि मिसेस फाटक (Jr)....  
बरेचसे रक्तातून आलेले एकसारखे गुणधर्म (!).
कष्टातून, जिद्दीतून वाट काढताना अंगी आलेला चिवटपणा आणि कणखरपणा
एका बाजूला अतिशय तर्कशुद्ध, balanced किंवा rational विचारसरणी आणि कधीतरी तितकाच टोकाचा मनस्वीपणा... उत्कटता.. आणि संवेदनशीलता...
स्वतःचीच कंपनी सगळ्यात जास्त आवडीची आणि स्वतःचीस्पेस’ सगळ्यात जास्त गरजेची.

अतिशय ठाम व्यक्तिवादी विचार.... कधी कधी काळाच्या पुढचेही...
कुठल्याही गोष्टीला सरळ सरळ टक्कर देऊनअरे ला कारे’ करायची वृत्ती.
एखादी गोष्ट पटली नाही तर तोंडावर सांगून मोकळी होणार.
शब्दांच्या आधी चेहराच काय ते बोलणार.
कुणीतरी सांगतंय म्हणून ऐकता आधी "का? कशाला " असे प्रश्न विचारून पटलं तरच पुढे जाणार... 
थोडक्यात काय तर , ‘Problem Child - Handle with care ‘.  
चुकून मुलगी झाली का? असा विचार आईवडिलांच्या मनात शंभरदा येणार



मि. फाटक (Sr) आणि मि. फाटक (Jr)
 एकदम शहाणी मुले, पहिल्या बाकावरची. ‘जीच्या  भाषेत "खोल"; म्हणजे समजूतदार, विचारी. घरापासून बरीच वर्षे लांब राहिल्याने घराची, घरच्यांची कायम ओढ.  
दिलखुलास हसणं, भरपूर गप्पा आणि खाण्याची अतिशय आवड.
जेवणाची डावी- उजवी बाजू, गोड, आंबट, तिखट सगळं चवीनं खाणार.  
विशेषतः अळूची भाजी, मसालेभात, पुरणपोळी असे पारंपरिक जेवण तर अतिशय प्रिय

आणि ह्याच्या उलट मिसेस फाटक (Sr आणि Jr ) यांना पोट भरण्याशी मतलब.
पानात पडलेले काहीही चालतं आणि आयते मिळाले तर फारच उत्तम.
मूड आला तर मनापासून एकदम मस्त स्वयंपाक करणार, पण रोज मूड लागेलच याची खात्री नाही.
पुस्तकं आणि स्वयंपाक यांचा choice दिल्यास पसंती अर्थातच पुस्तकं वाचण्याला.
अख्खा दिवस पुस्तकं आणि कॉफीवर काढायची तयारी.
तर मि. फाटक  सकाळ, दुपार आणि रात्री वेगवेगळे मेनू असतील तर फारच खूष  आणि सर्व भाज्या, सामान बाहेरून आणण्यास एका पायावर तयार.
ह्यांचा राग शांत करण्याचा मार्ग बरेचदा पोटातूनच जातो
आणि  हो , एरवी कितीही शांत आणि समजूतदार असले तरी रागावले म्हणजे जमदग्नीचा अवतार आणि शंकराचा तिसरा डोळाच उघडणार.   

बरीचशी पारंपरिक विचारसरणी...
आयुष्याचे, प्रत्येक नात्याचे ठराविक ठोकताळे,
साध्या, सरळ गरजा आणि अपेक्षा.
ह्यांना आयुष्याबद्दल फार प्रश्न पडत नाहीत. कारण ते उगीच जड जड पुस्तकं  वाचत नाहीत आणि त्यावर चर्चाही करत नाहीत.
एखादी गोष्ट आवडली तर मजेत दाद देतील पण नाही आवडली तर सरळ दुर्लक्ष करून पुढे जातील.
जग सुधारण्याशी त्यांना काही मतलब नाही

लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो असे म्हणतात आणि ३६ गुण जुळले तरंच लग्न चांगलं टिकतं म्हणतात.
पण इथे तर काय.. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल... म्हणूनच कदाचित इतकं घट्ट नातं!! 

पण जसजशी वर्षं जातात तसतसे मि. अँड मिसेस फाटकही बदलत जातात

मिसेस फाटकांना घरात बसून मसाले करायला, घर आवरायला आवडायला लागतं आणि "तू करिअर साठी अजून थोडं जास्त ट्रॅव्हल करायला पाहिजे, चार लोकांना भेटलं पाहिजे” असं म्हणून मि. फाटक  तिला सल्ला द्यायला लागतात

‘उंबरठा’ सिनेमात जी स्मिता पाटील ३० वर्षांपूर्वी पटलेली असते, तिचं वागणं मिसेस फाटकांना कुठेतरी टोकाचं वाटायला लागतं. मध्यम मार्ग नसता का काढता आला? असंही वाटायला लागतं

Rule of Nature, Survival of the Fittest हे मनापासून पटत नसलं तरीअरे ला लगेच कारे’ करण्यापेक्षा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे लक्षात यायला लागतं.
पटलेल्या प्रत्येक गोष्टीवर वाद घालण्यापेक्षा कितीतरी गोष्टी सोडून देऊन 'आहे ते ठीक आहे ' असा समजूतीचा सूर बरा वाटायला लागतो

मि फाटक (Sr) आता २२ वर्षाच्या मुलीचे बाबा म्हणून विचार करायला लागतात आणि २५ वर्षांपूर्वी मिसेस फाटकांच्या ज्या गोष्टी त्यांना पटत नव्हत्या त्याच आज मुलीच्या चष्म्यातून बरोबर वाटायला लागतातथोडंसं चुकलंच का आपलं ? असंही कधीतरी वाटायला लागतं

पुलाखालून आता बरंच पाणी गेलं असतं आणि हे जाणवून दोघं मात्र आता मजेत जगत असतात .   

मि. अँड मिसेस फाटक (Jr) यांची स्टोरी तर आत्ता कुठे सुरू झालीये...
आता हेच बघायचे की कोण कोणाला किती बदलते ते.....

Interesting times ahead .... 
And who knows, Mr & Mrs Phatak (Sr) getting older may start behaving as per their original traits 25 years down the line!!! 

So ...  keep watching!!! 


वैशाली फाटक
फेब्रुवारी , २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा