शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

गणेशदर्शनाची प्रभात फेरी


आजची पहाट उत्साहात उजाडली . पूर्वीच्या भाषेत 'गावात जाऊन' गणपती बघितले  की   मला गणेश उत्सव साजरा केल्याचे समाधान मिळते . गावात एक प्रभात फेरी ,विसर्जन मिरवणुकीत मानाचे गणपती पाहणे आणि ठेका देत ढोल ऐकणे हे केले नाही तर काही तरी चुकल्यासारखे वाटत राहाते वर्षभर.


 

एरवी गजबजलेला बाजीराव रस्ता आज इतका शांत होता  की  आनंदाश्रम, नूमवि ह्या इमारती खूप दिवसांनी निवांत , आरामात असल्यासारख्या भासल्या . जसजसे तुळशीबागेजवळ गेले, तशी थोडी फार वर्दळ दिसायला लागली . जिलब्या मारुती मंडळाच्या  गणपती  दर्शनाने सुरुवात केली. नवीन रंगरंगोटी आणि मुकुटाच्या झळाळीने मूर्ती उजळून निघाली होती.



मंडईच्या गणपती बाहेर खूप मोकळी जागा असल्याने गर्दी जाणवत नव्हती . शेजारील इमारतीतल्या जुन्या मूर्तीचे दर्शन घेऊन मांडवात गेलो . मांडवात शिरताना दोन्ही  बाजूला भिंतीवरील नक्षी काम  आणि  छान प्रकाश योजना केली आहे . छतावरची झुंबरे वेगळीच शोभा आणतात .  फुलांच्या झोपाळ्यावर पहुडलेल्या शारदा गणेशाचे प्रसन्न दर्शन झाले. पूर्वी शाळेत असताना आम्हाला दरवर्षी अथर्वशीर्ष म्हणायला न्यायचे त्याची आठवण झाली .



मंडईत पूजा साहित्याची दुकानं दिसली . एरवी कितीही ब्रँडेड उदबत्या जवळच्या वाण्याच्या दुकानात मिळत असल्या तरी वजनावर गुलाबी, जांभळ्या, हिरव्या रंगाच्या, वेगवेगळ्या वासाच्या उदबत्त्या घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही
बाबू गेनू गणपतीचे दर्शन घेऊन लाडक्या दगडूशेठ गणपतीच्या दिशेने जाऊ लागलो . आता रस्त्यावरची गर्दी अचानक वाढली . हार, फुले, दुर्वा,, कमळे विकणारे रस्त्यात मध्यभागी बसून माल विकत होते. खेळणी वाले होते, कपाळाला गंधाचा टिळा लावणारे होते , देवीची परडी घेऊन जोगवा मागणाऱ्या बायका होत्या ,तोरण विकणारे हाका मारून बोलावत होते . जरीच्या साड्या नेसलेल्या स्त्रिया आणि गळ्यात भगवे उपरणे घेतलेले पुरुष लगबगीने मांडवाकडे जात होते. त्या भागात चक्क्याची इतकी दुकाने आहेत  की   श्रीखंड करायचा मोह झाला पण पिशवी नसल्याचे कारण पुढे करून तो आवरता घेतला.



थोडे पुढे जाताच 'याच साठी केला अट्टाहास ' असं वाटायला लावणाऱ्या 'श्रीमंत'  दगडूशेठ गणपतीचे दर्शन झाले. एरवी मंदिरात पण तीच मूर्ती असते पण या दिवसात मूर्तीला काय विशेष तेज येतं की  काय असं वाटतं. कितीही वेळ बघितले तरी मन भरत नव्हते . "ताई जरा बाजूला व्हा " असं कुणी म्हटलं की  जरा जागा बदलायची आणि परत नजर बाप्पाकडे लावायची असं चालू होतं . पुढच्या वर्षी अजून लवकर यायचं म्हणजे गर्दी जरा कमी असेल आणि आत जाऊन दर्शन घेता येईल असा विचार करतच तिथून निघालो .


मधल्या वाटेने तुळशीबाग . आज तुळशीबागेचे मागचे दार बंद होते आणि एरवी चालायलाही जागा नसणारी गल्ली एकदम आळसावलेली , सुस्त होती.
तुळशीबागेचा गणपती आमच्या विशेष प्रेमाचा. मूर्तिकार खटावकरांनी माझ्या लग्नात त्या गणपतीची एक लहान प्रतिकृती  करून मला दिली होती आणि तेव्हापासून आमच्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या गणपतीचे आशीर्वाद असतात . 

चांदीचे अलंकार आणि महिरप असलेली मोठी मूर्ती. अगदी जवळ जाऊन मूर्तीचे दर्शन घेता येते. हा गणपती माझ्या मुलीचा सगळ्यात आवडीचा .  या वर्षी ती इथे नसल्याने तिला व्हिडिओ कॉल करून दर्शन दिले .


तिथून पुढे मधल्या गल्लीतून गणपती चौक . नवरा आपला इमाने इतबारे मी सांगेन त्या रस्त्याने बरोबर येत होता . गुरुजी तालीम मंडळाचा गणपती जरा वेगळा आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर तो मला ' In action ' वाटतो. उंदरावर बसून कुठेतरी निघालाय किंवा तिथे बसून कोणाशी तरी बोलतोय असं मला आपलं उगीचंच वाटतं . कारण  ह्या मूर्तीचे डोळे खूप बोलके आहेत .



               आज नूमविचा मागचा बोळ पण अगदी निवांत . एरवी कपड्याचे स्टॉल आणि डोश्याच्या गाड्यांनी चालायला जागाच नसते . कोपऱ्यावर जोगेश्वरीचे देऊळ  . आज पुण्याची ही ग्राम देवता तिच्या मूळ रूपात पाहता आली. छोटीशी पण सुबक मूर्ती. तांबडी जोगेश्वरी नावाप्रमाणे तांबड्या रंगाची. मूर्तीला अभिषेक चालू होता . शेजारीच मानाचा दुसरा गणपती. तिथेही अथर्वशीर्ष पठण चालू होते . शांतपणे येऊन लोक बसत होते आणि म्हणायला सुरुवात करत होते .



आता परत जायची वेळ होत आली  कारण ऑफिसला पोचायचे होते . तरी पण वाटेत गरम गरम ताजे पोहे दिसल्यावर थांबता पुढे कसे जाणार म्हणून छोटीशी विश्रांती घेतली. मानाचा पाचवा गणपती, केसरीवाडा इथे धावती भेट देऊन आजची प्रभात फेरी पूर्ण केली .

अवघी तास -सव्वा तासाची भ्रमंती पण तीच मला कुठेतरी माझ्या मूळांशी घेऊन जाते . काळाच्या ओघात आपण जरी बदललो असलो तरी मूळ पिंड कुठे तरी शिल्लक आहे हे जाणवून बरं वाटतं .

आता आज गौरी येणार . त्या सर्वांग सुंदर, साजिऱ्या  माहेरवाशिणी आणि त्या निमित्ताने घराघरात केली जाणारी सजावट , फराळ आणि हळदीकुंकवाच्या निमित्ताने सगळ्यांशी गाठी -भेटी...

आपली परंपरा जपणारे हे सण -उत्सव काही काळ का होईना सगळा तणाव विसरायला लावतात . सगळ्या आघाड्यांवर सध्या चर्चेत असलेल्या नकारात्मक घडामोडींपेक्षा हे सहज साधं , खरंखुरं , आपल्या मनाच्या खूप जवळचं जग आणि तिथली प्रसन्नता मला हवीहवीशी वाटते. खूप छान ऊर्जा देऊन जाते.

एरवी मी फार Tech Savvy  नाही पण माझी मुलगी जेव्हा व्हिडीओ कॉल मधून तीच मूळं धरुन ठेवू पाहते तेव्हा व्हर्चुअल आणि रिअलच्या फंदात पडता हा गणेशोत्सव मनापासून अनुभवणं  हे आणि इतकंच  खरं एवढंच मला उमगतं .

 

वैशाली फाटक

१५ सप्टेंबर , २०१८



५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम लेख. तुझ्या लेखांमुळे सगळ्या बाप्पांचे दर्शन झाले. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा...वैशाली
    छानच लिहिलंय
    बसल्या जागी सर्व गणपतीबाप्पा डोळ्यासमोर उभे राहीले

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान लेख. पूर्णपणे Virtual Tour घडवली तुम्ही.

    उत्तर द्याहटवा
  4. वैशाली तु एक मनस्वी मुलगी आहेस जितके छान लिहतेस तितकी तू पण मस्त आहेस
    लिहीत रहा शेयर करत रहा
    अप्रतीम

    उत्तर द्याहटवा