बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

मी अनुभवलेली दुर्गापूजा


         कधीतरी नवरात्रात कोलकत्याला जाऊन दुर्गापूजा अनुभवायची ही माझ्या 'बकेट लीस्ट' मधील एक इच्छा गेल्यावर्षी सुफळ संपूर्ण झाली. इतकी वर्षे पुण्यात राहिल्यानेआपला गणेशोत्सवच काय तो एकदम भारी!!’ हा जो काही भ्रम  होता तो पुरता नाहीसा झाला.

         माझ्यासारख्याच उत्साही माझ्या बहिणी आणि वहिन्या. सहा जणींची आमचीमहिला स्पेशल’ ट्रीप ठरली. नंतर तिकिटं महाग होतात म्हणून साधारण एप्रिलमध्येच बुकिंग करून टाकले.माझे ऑफिस कोलकत्यालाही असल्यामुळे तिथल्या माझ्या मैत्रिणी रुमा आणि गार्गी उत्साहाने आमचा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम ठरवायच्या मागे लागल्या.

       प्रवासात दिवसाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून जाता येता आम्ही मध्यरात्रीचे विमान पकडले. चार बायका एकत्र आल्यावर वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच पडत नाही. भरपूर गप्पा आणि हसण्या-खिदळण्यात कोलकत्याला येऊन पोहोचलो. पुणे-मुंबईच्या अनुभवानुसार बाहेर आपली गाडी वाट बघत असेल वाटले होते. पण, "मी वाटेतच आहे, पोहोचतोच आहे" असे सांगत तब्बल पाऊण तासाने यथावकाश आमची गाडी आली.

कोलकता विमानतळाजवळचान्यू कोलकताहा परिसर अतिशय आधुनिक आणि सौन्दर्यपूर्ण रितीने विकसित केला आहे. मोठे, रुंद रस्ते, दुतर्फा झाडे, हिरवळी, त्यावरची साधी पण सुंदर शिल्पे, नानाविध प्रकारचे दिव्याचे खांब आणि आकर्षक रचना. आपण विदेशात असल्यासारखेच वाटते.

कोलकत्यात प्रवेश करताच उत्सवाचे वातावरण जाणवायला लागले. रस्त्यावर ठिकठिकाणी कमानी उभ्या केल्या होत्या. पण रस्ता अडवून बांधलेले मंडप कुठेही दिसले नाहीत. कुठलेही शहर/गाव अनुभवायचे तर अगदी मध्यवस्तीत राहायचे हे ठरलेले. म्हणजे पुण्यात अप्पा बळवंत चौक किंवा लक्ष्मी रोड वर राहून गणपतीची मजा अनुभवल्यासारखे. त्यामुळॆ, ‘गरिया हट’ नावाच्या भागात हॉटेल बुक केले होते. हॉटेलवर पोहोचताच पटकन आवरुन कोलकता फिरायचा बेत होता. ‘दालचा पुरी’ हा तिथला स्टॅंडर्ड नाश्ता. मैद्याच्या पुऱ्या आणि मिश्र डाळींचे घट्ट वरण. रात्रभर प्रवास करून भूक लागल्याने गरमागरम नाश्ता फारच चविष्ट लागला.

 पुढचे तीन चार दिवस कदाचित सुट्टी असेल म्हणून गेल्यावर लगेच ‘व्हिक्टोरिया मेमोरियल’ पाहायचे ठरवले. ही कोलकत्यातली ब्रिटिश कालीन प्रसिद्ध वास्तू. बाहेरचा परिसर, बागा अतिशय सुंदर व्यवस्थित असल्या तरी आतील अस्वच्छता, जळमटे पाहून वाईट वाटले. इतका सुंदर वारसा आपण नीट जतनही करू शकत नाही! आतल्या संग्रहालयाला धावती भेट देऊन बाहेर पडलो.

बाहेर उभ्या असलेल्या, आरसे लावलेल्या बग्गीतून फिरायचा मोह आम्हाला आवरता आला नाही. मग ती हौससुद्धा भागवून घेतली.

आता मुख्य कार्यक्रम सुरु झाला. तो म्हणजे 'पूजा पेंडाल'ला भेटी. उत्तर कोलकत्ता,दक्षिण कोलकत्ता आणि मध्य कोलकत्ता अशा प्रत्येक भागात प्रसिद्ध पूजा असतात. आम्ही साधारण कुठल्या पूजा बघायच्या ते ठरवले.

 प्रत्येक पूजा पेंडालचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला एक विशिष्ट संकल्पना  (theme) असते. अनेक कलाकार महिनोन्महिने मेहनत घेऊन त्या सजावटी उभ्या करतात. मोठमोठ्या मैदानांवर किंवा मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर हे मंडप उभे केले जातात. पुण्यातील गणपतीच्या मंडपापेक्षा कितीतरी मोठे हे मंडप असतात. प्रत्येक ठिकाणी पंचायतन म्हणजे दुर्गा, काली, सरस्वती या देवी आणि गणपती कार्तिकेय हे देव आणि देवीच्या पायाखाली राक्षस या मूर्ती असतातच. आम्ही इतक्या पूजा पहिल्या, पण प्रत्येक ठिकाणच्या मूर्ती वेगळ्या होत्या. प्रत्येक देवीच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे. काही ठिकाणी देवीची एकच मोठी मूर्ती होती; पण बाकीच्या चार मूर्ती छोट्या स्वरूपात होत्याच. सर्व मूर्तींची वस्त्रे, दागदागिने , केशरचना यांत एक सुंदर मेळ होता. एकासारखे दुसरे पंचायतन नाही. पण प्रत्येक पंचायतन तितकेच मोहक. बघत राहावे असे वाटणारे.

पेंडालच्या आत जाण्याचा आणि बाहेर येण्याचा मार्ग बहुतेक ठिकाणी वेगळा असतो. त्यामुळे गर्दीने चेंगराचेंगरी वगैरे काही होत नाही. स्वयंसेवक आणि पोलीस अतिशय शिस्तबद्ध रीतीने गर्दी नियंत्रित करत असतात. यावेळी पुण्याच्या गणपतीपेक्षा जाणवलेला एक फार मोठा फरक म्हणजे कुठेही बकालपणा, थिल्लरपणा नाही. कितीही गर्दी असली तरी असुरक्षित वाटत नाही. दिवस-रात्र रस्ते गर्दीने फुलून गेलेले असतात. मुले , बायका, वयस्कर लोक सगळेच गोतावळ्याने पूजा बघायला बाहेर पडतात. बायका जरीच्या साड्या , दागिने घालूनही निवांतपणे गर्दीत फिरत असतात. त्या अर्थी तिथे 'साखळीचोर' नसावेत असे वाटले. आमचे हॉटेल अगदी गावातच असल्याने आम्ही जरी रात्री बाहेर पडून फिरलो नाही तरी खिडकीतून रस्त्यावरची गर्दी आणि उत्साह बघून छान वाटत होते.

अजून जाणवलेली एक विशेष गोष्ट म्हणजे कुठेही कानठळ्या बसवणारे संगीत किंवा गाणी नाहीत. उलट हेमंतकुमारच्या संगीताची आणि आवाजाची आठवण करून देणारे, ऐकायला गोड असे बांगला संगीत ठिकठिकाणी लावलेले होते . काही ठिकाणी पेंडॉलमध्ये पूजा  याग , पुरोहितांचे मंत्रपठण चालू असे.

प्रत्येक पेंडॉलच्या संकल्पनेनुसार   सगळी सजावट, सामान वापरलेले असते. एका ठिकाणी सायकल ही संकल्पना वापरून सजावट केली होती. साधारण शंभरेक पूर्ण मनुष्याकृती सायकल चालवण्याच्या निरनिराळ्या पोझेस मध्ये उभ्या केल्या होत्या. सायकलची, चाके, घंटा, सीट , चेन , हॅन्डल, पेडल्स , स्पोक्स , गियर केबल अश्या प्रत्येक पार्टचा कलात्मक वापर केला होता . केशरी, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे धागे वापरून त्याला उठाव दिला होता.

एका पेंडॉल मध्ये केरसुणीच्या पंख्यांचा वापर केला होता तर एका ठिकाणी प्लॅस्टिकच्या पुंगळ्या आणि कागदी फुलांची आरास होती.





एक देवी संगीतावर आधारित पेंडॉल मध्ये होती. सप्त सूर, हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्या, नाना  वाद्ये, ठिकठिकाणी लटकलेल्या स्वर रचना आणि या सगळ्याला साजेशी मंद प्रकाश योजना अप्रतिम होती. इथली देवी मला अतिशय आवडली. बैलाची  शिंगे पकडून बसलेली देवी सध्याच्या भाषेत बोलायचं तर 'Solid commanding and In- control' वाटली.  Self Esteem, Confidence and Grace सगळं तिच्या ठायी होतं. तिच्या चेहेऱ्यावरून, body language वरून जाणवत होतं.


काही ठिकाणी आर्ट गॅलरी उभ्या केल्या होत्या. मेटल्सवरची विविध पेंटिंग्स लावली होती तर कुठे श्रीकृष्णाच्या आयष्यावरची म्युरल्स होती. एका ठिकाणी पूर्ण सागरी जीवनावर आधारित सजावट होती. वेगवेगळ्या नौका, शिडे, वल्ही तर होतीच पण जादूमय तऱ्हेने देवी आणि तिचे पाण्यातले प्रतिबिंब उभे केले होते .   प्रत्येक पेंडॉलच्या छताची सजावटही तितकीच विलोभनीय होती. रंगीबेरंगी झालरी,झुंबरच्या प्रकाश रचना सगळेच डोळे दीपवून टाकणारे होते.

 



काही ठिकाणच्या पूजा बघून आम्ही जरा लांबची ठिकाणे म्हणजे रामकृष्ण परमहंस यांनी जिथे उपासना केली ते दक्षिणेश्वर काली मंदिर आणि रामकृष्ण मिशनचा मुख्य मठ,बेलूर मठ पाहायला गेलो.

काली मंदिर इथे मोबाईल, आय पॅड काहीही आत न्यायला परवानगी नाही. १५-२० रुपयांच्या डिपॉझिटवर या गोष्टी ठेवून जाण्याचा मला धीर झाला नाही. म्हणून आम्ही दोघी जणी सगळ्यांच्या पर्सेस सांभाळत बाहेर थांबलो. काली मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. गर्दीही खूप होती. आत देवीची सुंदर मूर्ती आहे. पण तिथेही विशेष स्वच्छता नसल्याचे कळले. अंधार पडायच्या आत बेलूर मठला पोचायचे असल्याने आम्ही दोघींनी बाहेरूनच नमस्कार केला आणि पुढे निघालो.


बेलूर मठाचा परिसर अतिशय रम्य आणि पवित्र आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे याच बरोबर चपला ठेवण्याचीही चांगली सोय आहे. अनेक स्वयंसेवक तिथे काम करत असतात. उत्कृष्ट बांधकाम केलेले मंदिर आणि भोवतालचे आवार, मोठा सभामंडप.  सभामंडपात रामकृष्ण परमहंसांचा पूर्णाकृती पुतळा आहे. मोठ्या संख्येने लोक तिथे ध्यानाला बसले होते. काही वेळ आम्ही तिथे बसलो.  खूप शांत आणि प्रसन्न जागा आहे ती.

बेलूर मठाची दुर्गा पूजाही खूप सुंदर होती. मंडपात उपासना चालू होती.




शेजारीच हुगळी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. आजवर हिंदी चित्रपटात बघितलेली हुगळी नदी, तिथे चित्रित झालेली बर्मन पिता-पुत्रांचा परीस स्पर्श लाभलेली अवीट गोडीची गाणी.  संध्याकाळच्या सावल्या गडद होत असताना त्या नदीकडे बघताना मी एकदम भारून गेले. त्या विस्तीर्ण पात्राशी, त्या प्रवाहाशी, त्या मधून लोकांना घेऊन चाललेल्या बोटीशी, त्या नदीच्या काठाशी माझं कुठलं तरी अनामिक नातं आहे असं जाणवत राहिलं. फार वेगळा अनुभव होता तो.

येताना सुप्रसिद्ध हावडा ब्रीजवरून परत आलो. काही वर्षांपूर्वी मी कोलकत्याला गेले होते तेव्हा जुन्या भागात दिसलेली अस्वच्छता या वेळेस फारशी जाणवली नाही. आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण शहरात कुठेही फ्लेक्स, बॅनर दिसले नाहीत.

आमच्या चार दिवसांच्या सहलीचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे शांतिनिकेतनला भेट. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला रवींद्र टागोरांवरचा धडा आणि त्यातला शांतिनिकेतनच्या झाडाखाली भरणाऱ्या शाळेचा उल्लेख. कदाचित तेव्हापासूनच हे ठिकाण बघायचं हे डोक्यात बसलं असावं.  कामासाठी तीनदा कोलकत्याला जाऊनही तो योग आला नव्हता. पण या वेळेस मात्र सगळं जुळून आलं. 

त्या दिवसाची सुरुवातही एकदम छान झाली. लवकर निघणार असल्याने हॉटेलमध्ये चहा मिळणार नव्हता. आसपास कुठे चहा मिळतो का ते बघायला बाहेर पडलो. रस्त्यावर एका ठिकाणी कुल्लडमध्ये गरम चहा मिळत होता. आमचं मराठी बोलणं ऐकून तिथे आलेल्या एका माणसाने बोलायला सुरुवात केली. भोसले त्यांचे नाव. गाव सांगली. महाराष्ट्रातली बरीच माणसे सोन्याच्या कारागिरीसाठी कोलकत्यात कामासाठी आहेत असे समजले.

आपल्या मुलुखातलं कोणीतरी भेटल्याचा आनंदात त्यांनीच आम्हाला चहा पाजला. पहाटे अजून एका पूजेचे दर्शन घेतले.  पूर्ण चंदेरी रंगाची अप्रतिम सजावट आणि सोनेरी मूर्ती बघून स्तिमित झालो.

कोलकत्ता ते शांतिनिकेतन दोन-अडीच तासांचा रस्ता. दोन्ही बाजूला एक सारखी छान वाढवलेली मोठी झाडं आणि दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं. रस्त्यात गावं अशी फारशी लागलीच नाहीत. आपल्याकडे हायवेवर दिसतात तशी हॉटेल्स,दुकानं , पेट्रोल पंप काहीही नाही. रस्ता, झाडं, शेतं आणि तुरळक वाहतूक.

वाटेत एका ठिकाणी दोन -चार मिठाई भांडार होती. तिथे ड्रायव्हरने नाश्त्यासाठी गाडी थांबवली. मिठाई भांडार म्हणजे सर्व बंगाली मिठाई मिळण्याचे दुकान आणि आत बसायला चार बाकडी आणि टेबलं. सगळीकडे एकच मेनू. सिंगाडा म्हणजे छोटे सामोसे आणि पुरी भाजी. तीन प्लेट पुरीभाजी, सहा सिंगाडे, चवीसाठी दोन मोठे लांबच लांब गुलाबजाम आणि चहा. नाश्ता एकदम मस्त झाला आणि बिल म्हणाल तर अवघे शंभरसव्वाशे.


बाहेर आलो तर तिथला भेळवाला समोर उभा. 'झालमोडी ' म्हणजे तिथली खास भेळ. वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण, चिवडे, काकडी, कांदा, सरसोचे तेल, लोणचं अशी भेळ खोबऱ्याचे लांब काप देतात त्याने खायची. भेळेची चव न घेता पुढे जाणे कुठल्या बायकांना जमेल?






दहाच्या सुमारास शांतिनिकेतनला पोचलो. वाटेत एक दोनदा रस्ता चुकलो पण आमच्या ड्रायव्हरचा ' गूगल 'वर जाम भरवसा होता. 'नेट चलाव ' असा तो आम्हाला अधून मधून आदेश देत असे.

गावापासून शांतिनिकेतन थोडे बाहेरच्या बाजूस आहे. आत शिरताच एक छानसे तळे आणि जवळच नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचा बंगला आहे.  सगळंच परिसर हिरव्यागार वृक्षराजीने वेढलेला आहे. मोठे मोठे वट वृक्ष जतन केलेले आहेत. पर्यावरणपूरक परिसर असल्याने पूर्ण परिसरात फक्त बॅटरी रिक्षा चालतात. दोन रिक्षा करून आम्ही निघालो.


रवींद्रनाथांचं जन्मस्थान, त्यांचं घर, त्यांच्या पत्नीने सुरू केलेली शाळा, खास  शैलीत बांधलेले त्यांच्या वडिलांचे ध्यानकेंद्र, विस्तीर्ण वृक्षराजी मध्ये तयार केलेले वर्ग , शिक्षकआणि मुलांना बसण्यासाठी बांधलेले कट्टे ,जरा मोठ्या कार्यक्रमासाठी बांधलेले खुले व्यासपीठ.  तिथेच एका झाडाखाली बसून आम्ही जणू परत शाळेत गेलो. कधीकाळी बघितलेले शांतिनिकेतनमधल्या झाडाखाली भरणाऱ्या शाळेत जायचे माझे स्वप्न पुरे झाले होते.



थोडेसे पुढे चालत गेलो कीआपण  ' कलाभवन ' या जागतिक दर्जाच्या विश्वविद्यालयात प्रवेश करतो.


त्या परिसरात ठेवलेली जुनी शिल्पं,चित्रकारांसाठी बांधलेली खास दालनं आणि चित्रशाळा .... सगळंच खूप पाहण्यासारखं म्हणण्यापेक्षा अनुभवण्यासारखं आहे. तिथे काही तास घालवणं पण माझ्यासाठी खूप काही होतं. मध्ये कुणी तरी मला विचारलं, "काय मिळतं तुला अशा ठिकाणी जाऊन? ".

'शांतिनिकेतनमध्ये मला काय मिळालं?' याचं दुसऱ्या कुणाला 'शब्दात' सांगता येईल असं उत्तर मला अजून तरी सापडलेलं नाहीये !

थोड्या बाहेरच्या बाजूला ' हाट ' म्हणजे खुला बाजार भरतो. ग्रामीण कलाकार, त्यांचे कौशल्य अस्तंगत न होता त्याला बाजारपेठ मिळावी म्हणून हा उपक्रम. शांतिनिकेतनचे स्वतःचे असे एक विक्री दालन आहे. तिथे आम्ही अर्थातच मनसोक्त खरेदी केली. त्याच परिसरात रवींद्रनाथांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे. बाकी कुठेही त्यांचा पुतळा पाहायला मिळाला नाही.

शांतिनिकेतनच्या रम्य आठवणी बरोबर घेऊन निघालो. येताना वाटेत एका ठिकाणी जेवायला थांबलो . तिथे आणि कोलकत्त्यातही अतिशय सुवासिक , किंचित गोडसर असा भात खाल्ला . साधी बटाट्याची रस्सा भाजी , एक कुठलीतरी पालेभाजी आणि  भात . पण काय चव होती !

         संध्याकाळी काली घाट इथे गेलो. काली मातेच्या देवळाच्या रस्त्यावर छोटी छोटी खूप दुकाने आहेत. बंगाली पद्धतीच्या लाल -पांढऱ्या बांगड्या, सिंदूर,शंख असं सगळं तिथे मिळतं . आम्ही आमची छोटोशी खरेदी आटपली.  मी पूर्वी एकदा काली मातेच्या देवळात गेले होते पण पंडे लोकांचा एकंदरीत अनुभव फारसा बरा नसल्याने आणि देवळात गर्दी असल्याने बाहेरूनच नमस्कार केला.

      'दसरा' म्हणजे दुर्गापूजेचा शेवटचा दिवस. 'महादशमी'. त्या दिवशी देवीला वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक करतात. काहीजण त्याला ' अंजली ' म्हणतात. ती पूजा होईपर्यंत उपास करतात म्हणजे फक्त मैद्याच्या पुऱ्या खालेल्या चालतात.

      त्या दिवशी सकाळी आम्ही सगळ्याजणी तिथे खास खरेदी केलेली 'पूजा साडी ' बंगाली पद्धतीने नेसून आमच्या हॉटेलजवळच्या पेंडॉल मध्ये गेलो. देवीचे दर्शन घेतले. संध्याकाळी इथे ' सिंदूर खेला ' आहे. तुम्ही नक्की या असे तिथल्या बायकांनी आम्हाला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगितले.

दसरा असूनही बहुतेक बाजारपेठ बंद होती. आपल्याकडे दसरा -दिवाळीला दुकानं कशी झगमगत असतात. फुलांची तोरणं, दिव्यांच्या माळा आणि खरेदीची झुंबड. त्या मानाने इथे अगदीच शांतता होती. काही दुकानं चार दिवस अर्धा वेळच चालू होती. लोकं बहुतेक आधीच सगळी खरेदी आटपत असावेत.

          त्या दिवशी आम्ही तिथली प्रसिद्ध 'बाहुबली ' वर आधारित पूजा बघायला गेलो. एक-दोन किलोमीटर आधीपासूनच ट्रॅफिक जाम झाला होता. भरपूर गर्दी. पण आमचा उत्साह अफाट होता. एवढ्या लांब आलोच आहोत तर आता पूजा बघूनच जाऊ असे म्हणून थांबलो. पण अतिशय शिस्तबद्ध रितीने आत सोडत असल्याने कुठलाही गोंधळ न होता अर्ध्या तासात आम्ही आत जाऊ शकलो. प्रत्येक पेंडॉलच्या क्षमतेनुसारच तिथे आत लोकं सोडतात. बाहेरच्या लोकांना अंतराअंतरावर दोऱ्या लावून अडवून ठेवतात. आतली गर्दी बाहेर गेली की पुढची माणसे आत सोडतात. त्यामुळे चेंगराचेंगरी नाही आणि नीट सजावट बघता येते . आपल्याकडे गणपती उत्सवात ही पद्धत सहज वापरता येईल. पेंडॉलच्या बाहेरून आत पर्यंत  बाहुबलीप्रमाणे अनेक  शिल्पे केली होती. हत्ती, कारंजी, मोठे खांब सगळंच भव्य होतं. खरोखरंच या कलाकारांना द्यावी तेवढी दाद थोडीच आहे .

      दुपारपासूनच काही ठिकाणी विसर्जनाची तयारी सुरु झाली होती. ट्रक किंवा ट्रॅक्टरमध्ये पाचही मूर्ती व्यवस्थित उभ्या करून ठेवल्या होत्या. इथेही कुठे आवाज, गडबड नाही, सगळं शिस्तीत.

       संध्याकाळी आम्ही परत जवळच्या पेंडॉलमध्ये गेलो. सगळ्या बंगाली स्त्रिया 'पूजा साडी' नेसून आल्या होत्या. आपल्याकडे 'हळदी - कुंकू ' असते त्याप्रमाणे एकमेकींना गुलाल लावत होत्या. कपाळाला, गालाला गुलाल लावताना एवढ्या भारी साड्यांवर डाग तर पडणार नाही नां, अशी आपली मला उगीचच शंका.

      देवीजवळ एक शिडी उभी करून ठेवली होती. त्यावर चढून  आपण देवीला गुलाल लावू शकतो किंवा साखरेचा प्रसाद भरवू शकतो. आपल्याकडे लांबून देवीची ओटी भरून किंवा नुसते ताट पुढे करून नमस्कार करायची पद्धत असल्याने देवीला प्रत्यक्ष कुंकू लावणे किंवा भांगात सिंदूर भरणे हा अगदीच वेगळा, आनंददायी अनुभव होता. तिथल्या एका वयस्कर बाईंना आम्हाला बघून इतका आनंद झाला की आम्हाला जवळ घेऊन , डोक्यावर हात ठेवून " आप लोगोंको देखके बहुत अच्छा लगा , ऐसेही खुश रहो , सुखी रहो " असा आशीर्वाद त्यांनी दिला तेव्हा जणू आपली आई-मावशीच कोलकत्यात भेटल्यासारखे वाटले. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आईची माया तीच.

         तृप्त मनाने दुर्गापूजेच्या, कोलकत्त्याच्या छान आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही सहा बायकाच आलेल्या बघून आमच्या गाडीवाल्याने आम्हाला फसवायचा, जास्त पैसे उकळायचा प्रयत्न केला पण थोडीफार दुर्गा आमच्यातही अवतरल्याने आम्ही तो पुरता हाणून पाडला.

         या वर्षी जशी नवरात्राला सुरुवात झाली तशी दुर्गापूचेची आठवण यायला लागली. आज हे लिहिताना परत एकदा कोलकत्त्याची चक्कर मारून आले.

        खरं म्हणजे पाच दिवसांची दुर्गा पूजा हे एक निमित्त. पण त्यामुळे वर्षभर अनेकांना रोजगार मिळतो. नवनव्या निर्मिती कल्पना आकार घेतात कलाकारांना भव्य व्यासपीठ मिळते. आणि कोलकोत्याचे कलासक्त, अभिरुचीसंपन्न लोक दिवस रात्र फिरून या कलेला, कलाकारांना दाद देतात.

         इतके दिवस पुण्याचे गणपती आणि त्यांची ठराविक पाचसहा प्रकारातली सजावट बघत होते पण डोळ्याचे पारणे फिटवणारी 'भव्य -दिव्य ' सजावट काय असते ते कोलकत्त्यात समजले. मंगलमय, उत्साहाच्या वातावरणात, विना गोंगाट , ध्वनी प्रदूषणाशिवाय उत्सव कसा साजरा करता येतो ते बघितले . रात्रंदिवस रस्त्यावर 'उभं ' राहून बिनबोभाट गर्दी आणि वाहतूक नियंत्रित करणारे पोलीस बघून सरकारी यंत्रणेवरचा विश्वास वाढला. 'केल्याने देशाटन ... ' याची प्रचिती आली .

 

       आपण प्रतिज्ञेत म्हणतो त्या प्रमाणे खरोखर समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटावा अशी ही ' दुर्गा पूजा '..प्रत्येकाने एकदा तरी आयष्यात अनुभवावीच ...


२३ टिप्पण्या:

  1. Beautiful descriptions using simple words. I could actually visualise your experience. Vaishali, Great article. Enjoyed it.

    उत्तर द्याहटवा
  2. Beautiful descriptions using simple words. I could actually visualise your experience. Vaishali, Great article. Enjoyed it.

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम वैशाली. मोजक्या शब्दात, योग्य मांडणीने, डोळ्यासमोर कलकत्ता, देवी पूजा,शांती निकेतन
    उभे केलेस. तुझ्या शब्दरूपी देवीपूजेला मनोभावे नमस्कार.

    उत्तर द्याहटवा
  4. वैशाली खूप छान लिहिलंयस अगदी स्वतः जाऊन आल्यासारखे वाटतंय, सगळे फोटो स्पेशली आर्ट गॅलरी सहीच, एवढया वेगवेगळ्या थीम वापरून डेकोरेशन करतात हे मी पहिल्यांदाच पाहिलं, मी ही काही दिवसा पूर्वी गेले होते पण शांतिनिकेतन पाहायला वेळ नाही झाला, पण तुझ्या ब्लॉग मुळे त्याचीही झलक मिळाली, पुढच्या ट्रीपला नक्कीच जाऊन येईन,
    Waiting for your next blog

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर लेख! वर्णन व फोटो यामुळे प्रत्यक्षात कोलकत्यात फिरत असल्याचे भासले! 👌👍

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान लिहिलंस वैशाली .घर बसल्या कोलकत्ता फिरल्यासारखे वाटले एकदम मस्त

    उत्तर द्याहटवा
  7. वा खूपच सुंदर लेख.

    अगदी चित्रमय वर्णन केलंयस. तुझे अनुभव शब्दातीत असतील असं जाणवत राहतं पण अगदी बारीकसारीक तपशील टिपलेले आहेत.

    फोटो सुद्धा खूप छान आहेत, झाडांमधून दिसणारा बंगला आणि त्याचं पाण्यावर पडलेलं धूसर प्रतिबिंब खूप आवडलं.

    अशीच लिहीत राहा.

    उत्तर द्याहटवा
  8. Khoop awadali tuzi Kolkata Durga puja. Manobhave kelis. Tuzya mule amhalahi puja ghadali.
    Dhanyawaad

    उत्तर द्याहटवा
  9. वाह फार छान जमलाय लेख! माहितीपूर्ण, मनोरंजक, मनापासून लिहीलेला 👌🏻👌🏻👌🏻. फोटो पूर्ण आकारात पोस्टलेस तरी चालतील 😊..

    मस्तच!!!

    उत्तर द्याहटवा
  10. वैशाली...तुझ्या हौसेला आणि छांदिष्ट पणाला साष्टांग नमस्कार. खूपच साधेपणाने पण काळजाला भिडणारे वर्णन केले आहेस. कोलकात्या मधील दुर्गापूजेचे सात्विक स्वरूप बघून खरचं समाधान वाटले आणि आपल्या गणेशोत्सवाचे बकाल स्वरूप आठवून वैष्यमही वाटले.
    अशीच लिहीत राहा.श्री काली मातेचा आशीर्वाद सतत तुला लाभो हीच तिच्या चरणी प्रार्थना

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. एकदम छान प्रवास वर्णन.
      मी स्वतः ह्यातली बरीच ठिकाणं पाहिलीत.
      पण प्रत्यक्ष्याहून प्रतिमा उत्कट असं वाटतं.
      Keep writing.

      हटवा
  11. Really great articulation.

    Felt as if I am walking on street of Kolkata.

    Also, happy to note the BUCKET LIST. Recalled the movie #Jindagi maa milegi dobara

    All the best and Keep sharing!

    Milind

    उत्तर द्याहटवा
  12. वाचल्यावर असे वाटते अहे की calcutta ला गेलेच पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  13. अतिशय ओघवतं शब्द चित्र ,प्रत्ययकारी प्रवासवर्णन आहे.प्रत्येक अनुभव डोळस चिकित्सक पणे घेत असताना सश्रद्ध अंत:करणाने त्या अनुभूतीला सामोरं जाण्याची अभिजात रसिकता जाणवते आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. वैशाली, खूप च छान लेख लिहिला आहेस 👍👍... अगदी वाचताना आपण स्वतः त्या प्रत्येक ठिकाणी हजर आहोत असे वाटले.... तुम्ही फक्त 6 जणी कोलकत्ता ला जाऊन आलाततसे च आता मला पण वाटते आहे की मी सुद्धा माझ्या बहिणी आणि वहिनी बरोबर अशी एखादी ट्रिप करून यावी .....तुझ्या पुढच्या लेखा ची प्रतीक्षा करते आहे आता ☺️....

    उत्तर द्याहटवा