दप्तरातले एक विविध वस्तू भांडार म्हणजे कंपास पेटी. पहिली - दुसरीत असताना तर फक्त पाटीवरची पेन्सिल न्यायला लागायची. त्या पेन्सिलीची चव पण काय छान असायची. कधी तरी पेन्सिलीला टोक करायला खोर कागद वापरायचो. पण त्यावेळी 'स्पंज पेटी' ही फार महत्त्वाची असायची. हिरव्या किंवा आमसुली गुलाबी अशा छान रंगात छोटी गोल डबी. त्यात स्पंजचा गोल तुकडा. तो भिजवून पाटी पुसताना काय मस्त वाटायचं आणि मग फुंकर मारून पाटी वाळवायची. आधी 'सिंगल पाटी' आणि मग जरा अभ्यास वाढल्यावर 'डबल पाटी'. त्यावर लिहिलेलं पुसू नये म्हणून दोन्ही बाजूला पुठ्ठे. गणिताची परीक्षा असे तेव्हा घरूनच पाटीवर बेरजा -वजाबाक्यांसाठी घरं आखून न्यायची. ओल्या पाटीवर लिहिताना आधी अक्षरं नीट दिसत नसत. पण पाटी वाळली की ठळक व्हायची त्यात पण गंमत वाटायची. पाटीवरून आठवलं, एक पिवळ्या रंगाची पुठ्ठयासारखी छोटी पाटी मिळायची. त्यावर रिफीलने काहीही लिहिलं आणि कागद उचलला की लिहिलेलं सगळं पुसून जायचं.
मग हळूहळू शिसपेन्सिल वापरायला
सुरुवात झाली. आणि त्याच्याबरोबर हिरवे
किंवा निळसर रंगाचे छोटेसे खोडरबर. ते हरवू नये
म्हणून बाजूला बॉलपेनने आपलं नाव घालायचं. त्यानं
खोडलं की सगळं पान
काळं होत असे आणि
रबर पण काळं व्हायचं.
मग युनिफॉर्मला घासून साफ करायचं. त्याच
सुमारास रंगीबेरंगी/पारदर्शक 'सेंटेड'
रबर मिळायला सुरुवात झाली. त्याला मस्त गोड वास
यायचा. फुलपाखरू, स्ट्रॉबेरी आणि इतर फळं,
बॅटबॉल आणि किती काय
काय आकार असायचे. त्यावेळी
वाढदिवसाला हमखास द्यायची किंवा मिळायची भेटवस्तू म्हणजे पेन्सिल आणि सेंटेड रबर.
आणि जवळ कितीही असले
तरी त्यातलं नाविन्य संपायचं नाही. माझे वडील डॉक्टर
असल्याने त्यांच्याकडे बरेचदा नाकात पेन्सिलीचा किंवा रबराचा छोटा तुकडा गेलेली
मुलं आणि त्यांचे घाबरे-घुबरे आई -वडील येत
असत. हे
पाहिल्याने रबराचा वास कितीही आवडला
तरी तो नाकात जाणार
नाही ह्याची मी पूर्ण खबरदारी
घेत असे.
पेन्सिलीचे तर किती प्रकार. नेहमीची लाल-काळी 'नटराज' पेन्सिल किंवा निळी 'अप्सरा'. पांढऱ्या रंगावर गुलाबी-हिरवी फुलं -पानं असलेली 'फ्लोरा' किंवा निळ्या-पिवळ्या रंगांवर छोटी नाजूक चित्र असलेल्या पेन्सिली. पेन्सिलला टोक करणं हा एक मन लावून करायचा उद्योग होता. मग त्या टोकयंत्रातून बाहेर आलेल्या छोट्या पापुद्र्याची फुलं करायची किंवा फुलांच्या पाकळ्या म्हणून चिकटवायला एका डबीत भरून ठेवायच्या. काही अतरंगी मुली अशी फुलं पुढे बसलेल्या मुलीच्या वेणीत खोचण्याचा खोडसाळपणाही करत असत! कोणी म्हणे की टोकयंत्रापेक्षा ब्लेड किंवा चाकूने टोक केलं तर ते तुटत नाही. पेन्सिल जास्त टिकते. मग अर्ध पातं आणि त्याला प्लास्टिकचं कव्हर असं ब्लेड वापरायचो. त्या ब्लेडने पेन्सिलचा मागचा गोल कापून त्याच्या लाल -काळ्या टिकल्या बनवायच्या.
मी लहान असताना आमच्याकडे काही कामासाठी सुतार आला असताना त्याची कानावर पेन्सिल ठेवायची स्टाईल मला इतकी आवडली की मोठ्या पेन्सिलचे दोन तुकडे करून मी माझ्या कानावर ठेवायला दोन पेन्सिली तयार केल्या.
'रेणुका स्वरूप' या शाळेच्या माजी विद्यार्थिनीच्या स्मरणार्थ आमच्या शाळेला नाव दिले असल्याने दरवर्षी तिच्या वाढदिवसाला सर्व मुलींना वह्या आणि पेन्सिली मिळत. वर्षानुवर्षे एकच डिझाईन असलेल्या, चमकदार गुलाबी, हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पेन्सिली. शाळेतल्या कुठल्याही स्पर्धेत बक्षीस म्हणून त्या पेन्सिली मिळायच्या. त्या पेन्सिली म्हणजे एक 'ब्रँड'च होता.
पुढे
मग पेन्सिलीतही H (Hard) आणि B (Blackness) नुसार 1H, 2B, 1HB असे प्रकार
असतात हे समजले. इंजिनिअयरिंगला
गेल्यावर ड्रॉईंगसाठी 'क्लच पेन्सिल' आणि
'लीड बॉक्स' आणली पण लाकडी
पेन्सिलची गंमत त्यात नव्हती.
पण पांढरं 'स्टॅडलर'च रबर मात्र
खूप आवडायचं.
शिसपेन्सिलीची
बहीण म्हणजे रंगीत पेन्सिल. माझ्या काकांचं
लक्ष्मीरोडवर मोठं ऑफिस होतं.
गणपती उत्सवात मिरवणूक बघायला आम्ही घरातले सगळे तिथे जमत असू. वर्षातून
एकदाच त्या ऑफिसला जायचे
अजून एक आकर्षण म्हणजे
निळ्या आणि लाल रंगांचे
शिसे असलेल्या पेन्सिली. अर्धी निळी, अर्धी लाल, दोन्ही बाजूंकडून
टोक करायचं. तशी पेन्सिल फक्त
तिथेच बघायला आणि वापरायला मिळत
असे, मग रात्रभर त्या
पेन्सिलीने लिहून अगदी बारीक व्हायची.
चित्रकलेसाठी
रंगीत पेन्सिली फार कुणाकडे नसत.
पण रंगीत खडू (oil pestles) मात्र भरपूर वापरले. माझा मामेभाऊ श्रीकांतदादा
फाईन आर्टसला होता. एकदा त्याने
मला ४८खडूंचा एक बॉक्स दिला
होता. ठराविक १२ खडूंचे रंग
माहीत असताना, वेगळ्याच ४८ छटांचे ते
'मॅट फिनिश' मधले खडू बघून
मला काय करू नि
काय नको असं झालं.
त्यात एरवी कुठेही बघायला
मिळणार असे 'स्किन कलर
'चे पण खडू होते.
मग वर्गात ' पतंग उडवणारी मुलं
', 'झेंडावंदन' अशी चित्र काढायला
दिली की ते खडू
सगळे जण वापरायचे.
'स्केच पेन' हा प्रकार खूप उशीरा वापरला आणि 'highlighter' तर कॉलेज संपतासंपता.
शाळेच्या वर्षांबरोबर पेन-पेन्सिल-रबर-पट्टी बरोबर कोनमापक, गुण्या , कर्कटक , कंपास अशा वस्तूंनी कंपास पेटी समृद्ध होत गेली. प्लॅस्टिकच्या पट्टीवरचे आकडे हळूहळू पुसले जायचे किंवा खटकन मधूनच पट्टी तुटायची. कंपासशी माझं कधी फारसं जमलं नाही. पेन्सिलने वर्तुळ काढताना मध्येच कंपास सरकला की वर्तुळ पूर्ण होणे अशक्यच. कंपासला पेन्सिल स्क्रूमध्ये घट्ट अडकवणे हे ही एक कौशल्याचं काम. जरा पेन्सिल उंचीला मोठी असेल तर मध्येच हाताला लागायची. कर्कटकचा मुख्य उपयोग बाकं कोरण्यासाठी किंवा कोणी त्रास देत असेल तर टोचण्यासाठी असतो हीच साधारण समजूत होती. कोनमापक-गुण्या मात्र भूमितीत उपयोगी पडायचे. परीक्षेच्या आधी कंपासपेटीतल्या काही वस्तू हमखास सापडेनाशा होत. मग घरीच भावंडांच्या कंपास मधून उधार-उसनवार करायची. कंपासमधल्या वस्तू हरवण्याचं प्रमाण आणि त्याचा एकंदरीत उपयोग ( utilization ) लक्षात घेता त्या वस्तूंची एक बँक शाळेत सुरु करावी असा विचार माझ्या मनात नेहेमी येत असे. सुरुवातीला सगळ्यांनी काही ना काही वस्तू डिपॉझिट करायच्या आणि मग लागतील तेव्हा वस्तू नेऊन वापरून झाल्यावर परत करायच्या असा काहीसा विचार होता, पण कृतीत आला नाही हे खरं.
कंपास पेटीबरोबरच रंगपेटीही माझी आवडती. वॉटर कलर्स च्या चकत्या, कधी ट्युब्स तर कधी पोस्टर कलर्सच्या बाटल्या. १-३-५ नंबरचे ब्रश, रंग बनवायला फुलपाखराच्या आकाराचे किंवा अंडाकृती पॅलेट. आणि पाणी भरण्यासाठी एक छोटी डबी. काही मुलींच्या हातातच जादू असे. एखादा रंग नाही म्हणून त्यांचं काही अडत नसे. ४-५ रंग एकमेकांत बेमालूम मिसळून त्या इतकी सुंदर चित्रं रंगवत. अशी सगळी छान चित्रं शाळेच्या चित्रकला वर्गात नेहेमी लावलेली असायची.
अजूनही हे कंपासपेटीचं,
रंग पेटीचं जग मला भुरळ घालतं. व्हिनसच्या दुकानातून उगीच बारीक सारीक खरेदी करायची
हौस फिटत नाही. परवा लॉक
डाउन मध्ये मी परत ब्रश
आणि रंगपेटी आणली. प्रवासासाठी, कामासाठी, सेमिनारसाठी बरेचदा तारांकित हॉटेलमध्ये जायची किंवा राहायची वेळ येते. तिथे
रायटिंग पॅड आणि पेन्सिल
दिसली की मला लिहायचा
मोह होतो. हॉटेलच्या प्रकृतीनुसार त्या पेन्सिलीही नाजूक
- साजूक असतात. ठसठशीत अक्षरं काही उमटत नाहीत.
पण म्हणून काय झालं, कागदावर
रेघोट्या मारताना, गोळा -फुली खेळताना काही
काळापुरतं माझं बालपण मला
नक्कीच देऊन जातात.
p.c. Google
अगदी बालपणात पोचले बघ आणि तो सुंदर सुवासिक खोडरबरचा वास लगेच आला ग
उत्तर द्याहटवापेन्सिलला टोक लावताना शार्पनर मधली फुलं कंपासमधे अनेक दिवस रहायची...वासाची खोडरबरं...व्हीनसमधून आणलेली म्हणून भाव खाणं
उत्तर द्याहटवागोड आठवणी
Sunder lihile ahe.amazing writing .agdi lahanpan athavala
उत्तर द्याहटवाSunder lihile ahe.amazing writing .agdi lahanpan athavala
उत्तर द्याहटवापुन्हा मस्त भरारी मारून आणलीस शाळकरी जीवनात.
उत्तर द्याहटवाकंपास पेटी ही दप्तरातली एकमेव खळखळ आवाज करणारी वस्तू. तिचा शत्रू म्हणजे गळकं बॉल पेन. एकदा का ती चिकट शाई सगळ्या साहित्याला लागली की कधीही जात नसे.
कंपास चे कॅमल सोडून अजूनही ब्रँड्स असत पण कॅमल ला होंडा सिटीचे प्रेस्टीज असायचे.
पेन्सिलीच्या तर खूप आठवणी. एक हमखास उपयोग म्हणजे कॅसेट रिवाइंड करणे.
अकरावीला सायन्स घेतल्यावर घ्यावा लागला तो Dissection Box. काय आर्थिक संकट असायचं ते पालकांसाठी त्या वर्षात. आणि त्यातल्या वस्तूंची तितकीच अपूर्वाई. आतून Velvet, ते भिंग, धारदार scalpel आणि इतर विविध चिमटे. काचेच्या slides आणि छोट्या डबीत पातळ गोल कव्हर स्लिप्स. आता आपण डॉक्टर होणार याची स्वप्नं पडायला लागायची 😊
डिसेक्शन बाॅक्स आणि गोल डबीतल्या कव्हर स्लिप्स. काचपट्टी ... मजाच आली वाचून
हटवाKhoopach chhan...as usual....
उत्तर द्याहटवाExam chya adhi compos box madhale saman kadhich sapdat nase....mag sagla udharicha karbhar....hahaha...kharech hote he sagle
Ajunahi te divas athvle ki...parat tya athvninmadhe ramun jayla avdte...
वाह, नेहमीप्रमाणे मस्त लेख! सेंटेड खोडरबर ही माझ्यासाठी फारच भारी आठवण आहे! आजही खूप miss करतो! असेच छान लिहीत रहा!👍
उत्तर द्याहटवाखूप आवडला तब्बल पंचेचाळीस वर्ष तरी मागे नेलंस मला त्या वॉटर कलर चे खूप आकर्षण वाटायचं रंगवता काही यायचं नाही पण ते एकमेकात मिसळणारे पाण्यात पसरणारे रंग बघत बसायला आवडायचं
उत्तर द्याहटवाह्यावेळच्या ब्लॉगमध्ये प्रत्येक वाक्य hyper Nostalgic आहे. कंपासपेटीच्या दुनियेत आठवणींचा खजिना ठसठसून भरला आहे. धनंजयची शाईची आठवण आजदेखील डोक्याला शॉट लावते
उत्तर द्याहटवापाठीवरच्या पेन्सिलची चव अजूनही जिभेवर आहे. कंपास हा तेव्हाही जिव्हाळ्याचा विषय होता आणि आजही. तुमच्या ब्लॉग च्या निमित्ताने ती प्रत्येक गोष्ट परत परत अनुभवता आली. वाचताना खूप मजा आली. नमूद केलेले सगळे बारकावे जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे राहिले. कधीही परत न येणाऱ्या अशा या आठवणी असल्या तरी आमच्या मुलांच्या वेळी त्या परत जगू शकू असे वाटले होते. आमच्या वेळी पहिली दुसरी पर्यंत आम्ही पाटी वापरली. पण माझ्या मुलीची पाटीची साथ लवकर संपली आणि तिची जागा फॅन्सी वह्या आणि आणि कंपास ने घेतली.
उत्तर द्याहटवाखूप छान वैशाली 👌
उत्तर द्याहटवापेन्सिलीच्या हरवलेल्या तुकडयांसारखं लहानपणही हरवून गेलं, पण तू आज परत त्या दुनियेची सफर घडवलीस 👌👍
सचित्र आणि शब्दांच्या सहाय्याने भूतकाळात फेरफटका मारता आला. अजूनही मनाचा एक अप्रकाशित कप्पा आहे व तो तितकाच जिवंत आहे याचीही जाणीव झाली. मस्त लेख.
उत्तर द्याहटवा