माझ्या
दृष्टीने 'चौथी' हे फार महत्त्वाचे
वर्ष होते. स्कॉलरशिपची परीक्षा वगैरे किरकोळ कारणं होती, पण मुख्य कारण
म्हणजे चौथीपासूनच शाळेत 'शाईचं
पेन ' वापरायला परवानगी होती. शुभदाकडे छान निळ्या रंगाचं
शाईचं पेन होतं आणि
ते फक्त लांबूनच पाहायची
मला परवानगी होती. त्यामुळे आपले स्वतःचे पेन
असणं माझ्यासाठी फारच महत्त्वाचं होतं
आणि त्यासाठी चौथीपर्यंत थांबायला लागणार होतं. चौथीच्यावर्षी पुस्तक खरेदीबरोबर पेनचीही खरेदी झाली.
शाळेत
पेन वापरायच्या आधी 'बोरु लेखन'
होते. दोन रेघा असलेली मोठी
वही आणि प्रत्येक पानावर
मोठ्या आकारातले एक अक्षर. गुळगुळीत
बांबूचा बोरु छान टोकदार
करायचा. मग शाईच्या दौतीत
बुडवून अक्षरे काढायची. रोज एक पान
लिहायचे. कॅलिग्राफीचे प्राथमिक धडेच होते ते.
पण वर्षभर बोरु लेखन का
नव्हते ते आता आठवत
नाही.
घरी
कपाटात एका छोट्या पेटीत
शाईची दौत, काळं टोपणवाला
काचेचा ड्रॉपर ,शाई टिपायला खडूचा
तुकडा, शाई पुसायचे छोटे
फडके असा सगळा इंतजाम
होता. शुभदाने ड्रॉपरने पेनात शाई कशी भरायची
त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. नवीन पेनमध्ये शाई
भरली की नीबमधून बाहेर
यायला थोडा वेळ लागतो
पण एकदा का पेन
लिहू लागले की मग लिहितच
रहावे असे वाटते. आधीच
मला सतत लिहायची फार
हौस. माझे बाबा मला
गंमतीने 'तू मोठेपणी कारकून होणार' असं म्हणत असत.
शाईचं पेन मिळताच मी
पानंच्या पानं भरून लिहायला
लागले. माझ्या मधल्या बोटाच्या वरच्या पेराला नेहमी शाईचा डाग असे. शाईच्या
पेनाचे प्रकार तरी किती असत.
बारीक किंवा जाड. कोणी म्हणे
जाड पेनाची नीब मोठी असते
(ते नीब का ती
नीब हा ही एक वाद
असे) त्यामुळे अक्षर छान येतं. शाई
किती राहिली ते कळावं म्हणून
काही पेनं मधूनच किंवा
पूर्ण पारदर्शक असत.
माझे
वडील 'पार्कर'चं पेन वापरत.
काळ्या रंगाचं पेन आणि चकचकीत
स्टीलचं टोपण. एकदम लहान नीब.
पेनमध्येच ड्रॉपर असे. त्यामुळे त्यात
जास्त शाई मावत नसे.
आम्ही कधी ते पेन
मागितलं की "हे पेन सह्याजी
रावांसाठी आहे. रोजच्या अभ्यासासाठी
नाही" असं बाबा म्हणायचे.
पण मोठं झाल्यावर तसलं
पेन घ्यायचं हे मी ठरवूनच
टाकलं होतं.
शाईच्या
पेनाचे नखरेही फार असत. मध्येच
उठेनासे व्हायचे. मग जोरजोरात शिंपडून
बघायचे. मग कधीतरी इतरांच्या
अंगावर निळी रंगपंचमी होत
असे. शाळेच्या भिंतींवर किंवा कोपऱ्यात तर हमखास ही
चित्रकला दिसायची. कधीतरी पेन कागदावर ठेऊन
हळूच एखादा आटा सैल करायचा
मग शाई ठिबकू लागायची.
मग ते शाई पडलेले
पान दुमडून 'फ्री हॅन्ड' ड्रॉइंग
करून घ्यायचे. कधीतरी पेनच्या नीबच्या खाचेतून ब्लेड वर खाली फिरवायची,
म्हणजे कचरा निघतो अशी
एक समजूत. कधी कधी पेन
अचानक गळायला सुरुवात होई, मग व्हॅसलिन
लावायचं. कधी पेनाचे आटे
किंवा टोपण घट्ट बसलं
की रबर बँड लावून उघडायचं
असलेही उद्योग असत. गळक्या पेनाची
करामत युनिफॉर्मवरच्या किंवा मुलांच्या पांढऱ्या खिश्यावरच्या निळ्या ठिपक्यांच्या रांगोळीत दिसत असे.
नीब
तर किती तरी वेळा
तुटत असे. मग कोपऱ्यावरच्या
दुकानात जाऊन नवीन नीब
लावून आणायची. चंदेरी किंवा सोनेरी रंगाची नीब एखादी सोन्याची
वस्तू घेतल्यासारखी पारखून घेत असू. दुकानातला
मुलगा सफाईने मोडकी नीब हळूच दाबून
काढत असे आणि नवीन
लावून देत असे. पुढे
मग आम्हालाही घरीच निब बदलता
यायला लागली. दुकानात नवीन नीब लावली
कीउगाच दोन चार रेघोट्या
ओढून बघायचं, कधीतरी बरोबरच्या मैत्रिणीला पण लिहून बघायला
सांगायचं. काही दुकानात ५-१० पैश्याला शाई
पण भरून मिळत असे.
आठवी-नववीत मध्येच कधीतरी वेगवेगळ्या रंगाची शाई वापरायची टूम
आली. कुणी जांभळी शाई
वापरत तर कुणी काळपट
निळी. हिरव्या -लाल शाईच्या छोट्या
दौती मिळत. दहावीचा
पेपर काळ्या शाईने लिहिला की परीक्षकांचे मत चांगले होते
अशी उगीचच एक समजूत होती.
पण मला मात्र अजूनही
निळ्या रंगाचीच शाई फार आवडते.
वाचताना त्यात एक शांतपणा जाणवतो.
आम्ही 'कॅम्लिन' ची निळी शाई
वापरायचो तर बाबा 'पार्कर'ची. 'पार्कर'च्या
बाटलीचा बॉक्स, आकार, शाईचा वास यातून तिचा
काहीसा उच्च दर्जा लक्षात
यायचा. तो काहीसा वेगळा
निळा रंगही मला खूप आवडायचा.
शाळेतून
कॉलेजला गेल्यावर शाईच्या पेनाची जागा बॉलपेनने घेतली. शाळेत
असताना बॉल पेन अजिबात
वापरायला मिळत नसे. दाबून
लिहिल्याने अक्षर बिघडते असा एक समज.
पण बॉल पेन सोयीचे
असे. टोपण पडलं, नीब
मोडलं वगैरे भानगड नाही. रंगीबेरंगी प्लास्टिकची पेनं, खिशाला अडकवायला स्टीलची क्लिप, पुढच्या - मागच्या भागाच्या मध्ये एक स्टीलची रिंग,
आत रिफील आणि त्याच्यावर एक
स्प्रिंग. टोपणावर क्लिक केलं की लिहायला
सुरुवात. 'Use and Throw' पेनं तेव्हा
नसल्याने संपलेलं रिफील टाकून,२५ पैश्याचं नवं
रिफील घालून परत तेच पेन वापरायचं.
स्प्रिंग मात्र बरेचदा इकडे तिकडे फटकन
उडून गोंधळ उडवून द्यायची. एरवी सोयीच्या असणाऱ्या
ह्या पेनाची रिफील मात्र जर का गळायला
लागली तर तो सगळा चिकट मामला निस्तरताना नाकी
नऊ यायचे. त्या शाईचे कपड्यांवरचे न जाणारे डाग लिंबाचा रस लावून घासून घासून घालवायला
बरीच मेहनत करावी लागे.
बॉलपेनने डाव्या
हातावर मैत्रिणीबरोबर 'जॉली' काढणे हा ही एक खेळ होता. रोज तो गोल गिरवून आपली मैत्री
किती घट्ट आहे हे सिद्ध करायला लागत असे.
भाऊबीजेला
किंवा वाढदिवसाला मुलींना भेटवस्तू काय द्यायची असा
प्रश्न कुणाला फारसा पडत नसे. पण
बिचाऱ्या मुलांना ठराविक पर्याय असायचे. मग मुंजीत किंवा
इतर काही निमित्ताने शाईचं
पेन आणि बॉल पेनचे
भरपूर सेट जमा होत.
त्यातही पूर्ण सोनेरी किंवा चंदेरी रंगाचा सेट म्हणजे भारीच.
ती पेनं मग अगदी
जपून वापरायची. आणि मग अशी
खूप दिवस ठेवून दिली की
बापडी बॉल पेनं तर वाळूनच
जायची. अजून एका पेनाचं
मला आकर्षण होतं ते म्हणजे
एकाच पेनात लाल, काळं, निळं
आणि हिरवं रिफील असायचं आणि चक्राकार पद्धतीने
हवी ती शाई वापरायची.
आज इतक्या प्रकारची पेनं मिळतात पण
लिहिणंच कमी झालंय आणि
त्याबरोबर शाईतला शब्दात उतरलेला ओलावाही…
पण आजही दहावीच्या
वर्षात शाईच्या पेनाने लिहिलेले माझे निबंध, मराठीची
उत्तरं, शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेतील भाषणं माझ्याकडे आहेत. इतकी वर्षं झाली
तरी कागद तितकाच छान
आणि शाई जरासुद्धा उडालेली
नाही. त्या शाईच्या अक्षरांवरची
आणखी एक अपूर्वाईची खूण
म्हणजे सु.द. तांबेसरांचं
अक्षर. कधीही पुसल्या ना जाणाऱ्या आठवणी
आज शाईच्या पेनाच्या निमित्ताने …
p.c. Google
वा वैशाली पाS र तिथेपर्यंत जाऊन आले गं,मजा आली खूप वाचताना!लिहीत रहा!
उत्तर द्याहटवाछोट्या छोट्या गोष्टींनी आपलं भावविश्व समृद्ध केलेलं असतं...ही लेखमाला वाचताना तू परत त्या शाळेच्या दिवसात तर नेतेसंच...but, inexplicably it just helps to get in touch with inner self... खूप छान..
उत्तर द्याहटवाशाईचे पेन हे एक वेगळेच रसायन आहे. एक छोटी त्रिकोणी नीब असते. पेन पण जरा ढब्बू असते मला शाळेत त्या पेनचे attraction होते कारण माझ्याकडे नव्हते आणि तेव्हा ४ पेन आणायची पण fashion नव्हती . आहे त्या पेनने लिहा असे असायचे. ९ वी नंतर विस्मरणात गेले शाईपेन . मी ४ वर्षांपूर्वी आणली हवी ती शाईपेन .
उत्तर द्याहटवाहेच सारे अनुभव आणि शाई च्या पेन वापरायची हौस सगळे नॉस्टॅल्जिक feeling... खूप छान लेख लिहिला आहेस तू.. पाठीमागे बसणार्या मैत्रिणीच्या पेनचे शाई चे डाग कायम च पांढर्या uniform वर पडायचे... मग वादा वादी... सगळे आठवले
उत्तर द्याहटवाखूप खूप छान...अतिशय सुंदर आठवणी जाग्या झाल्या...
उत्तर द्याहटवाTuza likhan jasa sunsar ahe tasach tuza akshar pan khup sundar ahe. Tujhya lekhanatala ankhi ek morpees. Mastach!
उत्तर द्याहटवाखूप छान मॅडम! शाळेतल्या जुन्या विस्मृतीत जाणाऱ्या या गोष्टी आठवले की मन थोडसं हळवं होता आणि आठवणीत रमत तसंच यांचं सुद्धा स्टेशनरी तुन आणलेला रिफिल न होणाऱ्या पेनात काही आपलेपणा वाटत नाही, जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाईपेन मध्ये होता. वरच्या वर्गातील मुले शाईपेन वापरायचे, तेव्हा त्याचे प्रचंड अप्रूप वाटायचे. त्यावेळी शाईचा पेन या मोठे व्हायच्या खुणा होत्या.खूप छान लेख शाईचे पेन .
उत्तर द्याहटवाअगदी विस्मृतीत गेलेलं शाई पेन या निमित्तानं परत आठवलं. माझ्याकडे अजूनही माझं शाळेतलं शाई पेन मी जपून ठेवलं आहे.बोरूचा लेखन सराव सोडला तर सगळ्या आठवणी अगदी जशाच्या तशा आहेत. चौथीत भेट झालेलं शाईचं पेन मनात घर करून आहे हे खरं.
उत्तर द्याहटवाशाईच्या शब्दातला ओलावा👌👌आत्ता वाचला ग लेख..सगळ्या आठवणी same.. एक फक्त पेन साफ करण्याचा कार्यक्रम असायचा..पाण्यात सगळं पेन मोकळं करून बुडवून ठेवायचं..मग त्याला कोरड करून,शाई भरून परत सुरू केलं की नवीन पेन असल्याचं कौतुक उमटायच चेहऱ्यावर..
उत्तर द्याहटवा३ रीत च डोहाळे लागायचे पेनाचे.😊
शाईच्या शब्दातला ओलावा👌👌आत्ता वाचला ग लेख..सगळ्या आठवणी same.. एक फक्त पेन साफ करण्याचा कार्यक्रम असायचा..पाण्यात सगळं पेन मोकळं करून बुडवून ठेवायचं..मग त्याला कोरड करून,शाई भरून परत सुरू केलं की नवीन पेन असल्याचं कौतुक उमटायच चेहऱ्यावर..
उत्तर द्याहटवा३ रीत च डोहाळे लागायचे पेनाचे.😊
सुंदर लेख! शाईचे पेन आणि ते वापरणे व सांभाळणे ही शालेय जीवनातील एक छान आठवण ताजी झाली. शब्दचित्र उभे करण्याचा हातखंडा आहे हे पुन्हा सिद्ध झाले! लिहीत रहा! 👌👍
उत्तर द्याहटवाखूप छान लेख आहे.नीब पासून जॉली पर्यंत कितीतरी आठवणी जाग्या झाल्या. दहावीतले निबंध असतील तर वाचायला आवडतील.तांबे सरांच्या वर्गातील लेख आठवणीत आहेत.
उत्तर द्याहटवाVaishali, you have such a beautiful flow in writing. The fountain pen indeed was a treasured possession and you brought back memories.
उत्तर द्याहटवाChan 👌🏻
उत्तर द्याहटवाKhoopach chhan
उत्तर द्याहटवा