१७ एप्रिल २०१२ ची आज आठवण झाली म्हणून..
शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय होता ' जगण्यात काय मौज आहे '. वयाच्यामानाने विषय जरा जडच होता आणि म्हणून मग माझे बाबा आणि शाळेतल्या बाईनीच भाषण तयार करून दिले होते.पंचतन्त्रातल्या गोष्टींपासून , खलील जिब्रान सारख्या तत्ववेत्त्याचे विचार , रोजच्या जगण्यातल्या छोटया छोटया गंमती असं बरंच काय काय होतं. पण स्वतः काहीच अनुभवलं नसल्यानं लिहून दिलेलं भाषण पाठ करून उत्तम प्रकारे सादर करणं एवढाच काय तो माझा सहभाग.
आज हे सगळं पुन्हा आठवायचे कारण म्हणजे या वर्षी नव्याने झालेला साक्षात्कार , कि जगण्यात खरंच खूप मौज आहे ....
१७ एप्रिल २०१२. सकाळपासून माझा उजवा डोळा खूप बारीक झाला होता. नंतर ऑफिसला जाताना वाटलं कि आपला ओठही उजव्या बाजूने जरा सुजल्यासारखा वाटतोय . डॉक्टरांना विचारून एक अलर्जीवरची गोळी घेतली. पण दुपारनंतर जीभ हळू हळू जड झाली . फोनवर बोलताना जाणवायला लागलं कि आपले शब्द नीट येत नाहीयेत .बधीर झाल्यासारखं वाटतंय. तोपर्यंत उजवा डोळा जरा जास्त उघड मीट करायला लागला होता . सगळ्यांनी चेष्टा करायला सुरूवात केली, 'आता या वयात कोणाला डोळा मारते आहेस !! '
संध्याकाळी डॉक्टरांकडे जाताना गाडी लावली पण चालताना नकळत
सोनियाचा हात घट्ट
धरला . आपले रिफ्लेक्सेस स्लो झालेत कि काय? डॉक्टरांनी तपासले आणि सकाळपासून जी शंका वाटत होती ती खरी ठरली. फेशिअल पेरालेसीस ...बेल्स पाल्सी . डाव्या कानातून फेशिअल नर्वला व्हायरल इन्फेक्शन झाले होते . काळजीचे कारण नाही पण बरे होण्यास वेळ
लागणार , कमीत कमी सहा आठवडे ...
दुसऱ्या दिवशीपासून चेहेरा अजूनच बदलायला , डी-फॉर्म व्हायला लागला. तोंड उजव्या बाजूला पूर्ण वाकडे झाले होते. डावी भुवई वर उचलली गेली होती. उजवा डोळा सतत उघड झाप करत होता आणि डावा डोळा बंद करता येत नसल्याने त्यातून अखंड पाणी वाहत होते. ऑफिसमधल्या सगळ्यांना मेल करायला बसले आणि लक्षात आले कि आपल्याला स्क्रीनकडे बघताच येत नाहीये . डोळा ड्राय झाल्याने मोबाईलच्या स्क्रीनवर बघितले तरी डोळ्यात खुपल्यासारखे होऊन जास्तच पाणी यायला लागले होते . तोंडही दुखायला लागलं होतं आणि जरासं बोलताना देखील त्रास होत होता. डोळे बंद...तोंड बंद... चला , म्हणजे आता पुढचे काही दिवस मनातल्या मनात फक्त स्वतःशीच बोलायचे...
पूर्वी एक मुंगी आणि हत्तीची गोष्ट वाचली होती. एकदा हत्ती आणि मुंगीचे भांडण झाले. हत्तीला वाटले, एवढीशी मुंगी, तिला काय एवढा भाव द्यायचा !! एक फुंकर मारली तर उडून जाईल . पण मुंगी होती भलतीच खट . ती हत्तीच्या कानात शिरून जोरात चावली आणि हत्तीला पळता भुई थोडी झाली. तसंच काहीसं माझं आणि फ़ेशिअल नर्वच झालं . केसापेक्षाही बारीक ही नर्व , पण पूर्ण सहा ठिकाणचे स्नायू ताब्यात ठेवते.
स्वतःबद्दल , स्वतःच्या सगळ्या शारीरिक , मानसिक क्षमतांबद्दल उगीचच केवढा
आत्मविश्वास असतो आपल्याला ! पण जेव्हा आपले शरीरच असा असहकार पुकारते तेव्हा सगळा अभिमान क्षणार्धात गळून पडतो .... साधी डोळ्याची पापणी मिटणे सुद्धा आता माझ्या हातात राहिले नव्हते.....
माझ्या सुदैवाने माझी ट्रीटमेन्ट लगेच सुरु झाली.
नर्व
स्टिंम्युलेशन म्हणजे ज्या सहा ठिकाणी नर्व काम करत नाहीये तिथे शॉक देऊन स्नायूंचे काम हळू हळू
पूर्वपदावर आणायचे. कपाळावर पहिल्यांदा शॉक दिला आणि 'डोळ्यासमोर काजवे चमकणे' म्हणजे काय याचा शब्दशः अनुभव घेतला .
कपाळावर, भुवईच्याशेजारी , डोळ्याखाली, गालावर , ओठांच्याशेजारी आणि हनुवटीवर अशा सहा ठिकाणी पाच पाच मिनिटे शॉक घ्यायचा. हळू हळू त्याचीही सवय झाली. पण ओठाशेजारील आणि हनुवटीवर शॉक घेताना खूप दुखायचे. देवाने खरंतर चांगल्या गोष्टीसाठी दिलेल्या तोंडाचा उपयोग आजवर
कशाकशाला नावं ठेवायला केला म्हणून ही
शिक्षा मिळतेय असंही कधीतरी वाटून मनातल्या मनात माफी
मागणे चालू ठेवले .
लहानपणी मी अजून एक खेळ स्वतःशीच खेळत असे. तो म्हणजे रात्री बाहेरून घरी येताना गाडीत डोळे मिटून बसायचे आणि मग ठरवायचे आता गोळीबार मैदान आले असणार, आता स्वारगेट , आता पेशवेपार्क आणि मग हळूच डोळे उघडून आपला अंदाज चूक कि बरोबर ते बघायचे. या खेळात वेळ मस्त मजेत जायचा . आता तोच खेळ परत खेळायला सुरुवात केली . टिळक रोड ते कोथरूड . रिक्षात खूप वेळ आणि मग तेवढीच मजा....डोळ्यावरची पट्टी बाजूला करून रस्त्यावरच्या पाट्या बघायच्या आणि आपण कुठे आहोत ते ठरवायचे.... कर्वे रोडवर इतक्या इंटरेस्टिंग पाट्या आहेत हे नव्यानेच कळले.
माहितीतल्या काही लोकांना पूर्वी असेच होऊन ते आता पूर्ण बरे झाल्याचे बघितले होते. त्यामुळे आपणही नक्की बरे होणार याची खात्री होती. तरीही एकदा मात्र अगदी मनापासून वाईट वाटले होते.
सकाळी उठल्यानंतर गरमागरम चहा म्हणजे माझा वीक पॉईन्ट. दिवसातला खरा आनंद ... आजारी पडल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ब्लड टेस्ट करून आले. आता शांतपणे चहा घ्यावा म्हणून बशीतून चहा पिऊ लागले तर प्रत्येक घोट बाहेर उडू लागला. साध्या चहा पिण्याच्या आनंदाला आता आपण मुकलो असं वाटून रडूच यायला लागलं. पाणी, चहा , सरबत काहीही पिणे सोपे राहिले नाही. चार लोकांसमोर तर नाहीच नाही. खाल्लेल्या घासावर काहीच नियंत्रण नसल्याने तो तोंडात फिरत असे. एक दोन दिवसांनी आपल्याला कुठल्याप्रकारचे खाणे सोपे पडते ते कळायला लागले.
फिजिओथेरपी आणि न्युरोथेरपी अशा दोन्ही ट्रीटमेंटचा मला चांगला उपयोग होऊ लागला. डॉ. बापोरीकर , माझे फिजिओथेरपिस्ट म्हणजे मूर्तीमंत उत्साह ! सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत दुपारचा काही वेळ वगळता त्यांच्याकडे अखंड पेशंट्स येत असतात. नाना प्रकारच्या व्याधी , कोणाला गुडघेदुखी, कोणाला पाठदुखी , कोणाला मानेचा त्रास. पण डॉक्टरांचा स्वभावाच इतका उमदा कि कोणाला तिथे चेहेरा पडून बसायची हिंमतच नाही होणार. नुसत्या मशीन ट्रीटमेंटपेक्षा पेशंटशी बोलून , त्यांचे इतर प्रॉब्लेम्स समजून घेऊन उपचार केले तर त्याचा जास्त चांगला उपयोग होतो हे डॉक्टरांना माहित असल्याने ते सतत पेशंट्सनना बोलते करत असतात, त्यांचा धीर वाढवत असतात. ' काळजी करू नका, काळजी घ्या' हे सोप्या शब्दात पटवून देत असतात. मी जायचे त्या वेळेला तिथे बहुतेक सगळे आजी आजोबा असायचे , पण स्वतःचा नंबर येईपर्यंत मस्त टाइमपास करत असायचे. मोनिका नावाच्या , जवळपास ८० वर्षाच्या एका तरुण आजीची माझी तिथेच ओळख झाली. केस पूर्ण पिकलेले , सुरकुतलेला गोरापान चेहेरा, प्रसन्न हसू आणि डोळ्यात एक मिश्कीलपणा. ट्रीटमेन्टसाठी येताना पण एकदम टकाटक येणार. नवरा नाही, मुलं नाहीत, स्वतःचे इतर कोणी नातेवाईक नाहीत. घर सांभाळायला आणि आजीची काळजी घ्यायला एक बाई आणि आजीला सगळीकडे फिरवणारा एक रिक्षावाला. पण रसरशीत जीवन काय असतं ते मोनिका आजीकडून शिकावं . ट्रीटमेन्ट चालू करायला आल्या तेव्हा त्यांना चार पावलं चालणं ही शक्य नव्हतं पण दुर्दम्य इच्छाशक्ती आणि डॉक्टरांना पूर्ण सहकार्य यामुळे ५-६ आठवड्यात त्या बऱ्यापैकी चालू लागल्या पण एवढयावरच त्यांचं समाधान नव्हतं , त्यांना डान्स करायचा होता. बहुदा घरी एकट्याच असल्याने त्या बोलायची सगळी हौस दवाखान्यात पुरी करून घेत. ' God bless you , लवकर बरी होशील तू ' असं म्हणून रोज मला विश करत.
'चलो कंपनी फटाफट ' असं म्हणून या रूम मधून त्या रूममधल्या पेशंट्सकडे जाणारे डॉक्टर आणि त्यांच्या सदैव हसतमुख दोन मदतनीस यांनी दोन महिन्यांचे वेदनादायी उपचार अक्षरशः सुखावह केले.
दुसरा उपचार म्हणजे न्युरोथेरपी . अभय पाठक यांना पूर्वीपासून ओळखत असल्याने त्यांना फोन केला, 'मला बोलता येत नाहीये. पण लगेच मला वेळ द्या' असं म्हटल्याबरोबर त्याच दिवशी दुपारपासून त्यांनी उपचार सुरु केले. शरीराच्या विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन, सगळ्या ग्रंथींची कामे सुरळीत करून, हळू हळू शारीरिक व्याधी बरी करणे अशी साधारण ही ट्रीटमेन्ट असते. 'तुमचं शरीर तुम्हाला खूप छान साथ देतंय, मी तुमच्या प्रगतीवर खूष आहे' असं म्हणून ते माझा उत्साह कायम ठेवत असत. अर्ध्या तासाच्या वेळात स्ट्रेस कमी करण्यापासून वेगवेगळ्या पाककृतीपर्यंत विविध विषयांवर गप्पा व्हायच्या .बरेच दिवसात वडिलकीच्या नात्याने मला कोणी रागावले नव्हते , ते काम अभय पाठकांनी केले.
आपण कधीतरी, कोणाला तरी केलेली मदत, कुठल्या ना कुठल्या रूपाने खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे परत येते असं म्हणतात . डॉ बापोरीकर आणि अभय पाठकांची ट्रीटमेन्ट घेताना माझी ही समजूत पक्की झाली.
या दीड-दोन महिन्यांच्या आजाराने खूप काही दिले.....
या काळात मी 'स्वतःला' खूप वेळ देऊ शकले. कारण बराचसा संवाद मनातल्या मनात आणि स्वतःशीच….
काहीही , म्हणजे अक्षरशः काहीही न करता मी राहू शकेन अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. पण वेळ आली तर आपण तासनतास नुसते बसून राहू शकतो हे समजले. कदाचित मेंदूला सुद्धा ही सक्तीची विश्रांती हवीशी वाटत असेल. ड्रायविंग करायला मला आवडते , पण जवळ जवळ तीन महिने मला गाडी चालवायची इच्छाही झाली नाही. जेव्हा पूर्ण बरे वाटले, तेव्हा आपोआप माझे ड्रायविंग सुरु झाले. शरीराची आणि मनाची नेमकी गरज ओळखून त्याप्रमाणे उपचार करणे किती महत्त्वाचे आहे ते पटले.
या आजारामुळे नात्यांमधली श्रीमंती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली …
एका फोनसरशी मदतीला येणारी सगळी सासर माहेरची माणसे , हक्कानं घरी राहायला आलेली आई, पूर्वी ज्यांना टू व्हीलर वर मागे बसवून हिंडवले, ती सगळी भाचे-पुतणे मंडळी केव्हाही माझ्यासाठी गाडी घेऊन यायला तयार. म्हातारपणीची चिंता नको, काळजी घेणारी पुढची पिढी छान तयार झाली आहे, या विचारानीसुद्धा बरे वाटले.
'आजपासून मी कामाला येऊ शकत नाही ' असा छोटासा मेल टाकून पूर्ण टीमच्या जीवावर मी निश्चिंत!!! इतकी छान टीम आणि काळजी घेणारे सहकारी मित्र -मैत्रिणी केवळ नशीबानेच मिळतात …
माझ्या आजारात माझी मदतनीस झालेली सोनिया. माझे फोन अटेंड करणे, मेसेजेस बघून रिप्लाय करणे, मला विचारून सिस्टीम मधली अप्प्रुव्हल्स करणे सगळे बिनबोभाट चालू होते.
'वाहिनी तुम्हाला कामाची लई हौस, आता बरं होइपर्यंत बिनघोर आराम करा ' अशी प्रेमळ दटावणी करणाऱ्या माझ्या कामाच्या बायका
आणि...
या सगळ्या आजारात खंबीरपणे माझ्याबरोबर असलेला संजू ....'चेहेऱ्या' पलीकडच्या 'वैशाली' वरही तितकंच प्रेम करणारा.. .
आपला चेहेरा म्हणजे आपली जन्मापासूनची ओळख. कुणाच्या नावाच्याही आधी लक्षात राहतो तो चेहेरा. आपले सगळे हावभाव, आपलं हसणं, आपलं बघणं या सगळ्यातून आपण व्यक्त होत असतो. चेहेरा म्हणजे संवादाचं पाहिलं माध्यम !
पण जेव्हा सकाळी उठल्यावर आरशात वेगळाच चेहेरा दिसतो , तेव्हा काय वाटतं ते शब्दात मांडणं कठीण आहे . जेव्हा माझं वाकडं तोंड हळू हळू सरळ होऊ लागलं आणि एकेदिवशी सकाळी ब्रश करताना माझेच डावीकडचे खालचे दोन दात मला दिसले तेव्हा झालेला आनंद सोनियाला पहिला दात आला तेव्हा झालेल्या आनंदापेक्षा नक्कीच कमी नव्हता. स्वतःचेच दात परत नव्याने आल्यासारखे पाहणं यातली गंमत काही औरच ...
या सगळ्या आजारात माझ्या घरच्यांनी मला काही ' विशेष' झालंय असं वाटू दिलं नाही.चेहेरा इतका 'वेडावाकडा' असतानाही एका भाच्याच्या मुंजीला मी नटून थटून तासभर हजेरी लावून आले. माझ्या
' विचित्र' दिसण्याचा कोणी बाऊ केला नाही. जी काय चेष्टा करायचो ती आम्ही सगळे मिळून करायचो आणि सगळेच हसायचो. हे खूप महत्वाचे आहे. एखाद्याने सहज म्हणून केलेली 'कॉमेन्ट' ही अशा अवस्थेत पुरेसा न्यूनगंड निर्माण करू शकते.
या आजाराने जीवन किती
अशाश्वत आणि क्षणभंगूर आहे त्याची लखकन जाणीव झाली.
अनेक गोष्टींबद्दल नकळत
बाळगलेला अभिमान, अहंकार यातला फोलपणा कळला .
मनावरचे अनेक चष्मे दूर
झाले. डी फॉगर सुरु केल्यानंतर धूसरपणा कमी होत होत गाडीच्या
काचेतून स्वच्छ दिसू लागतं तसाच काहीसा अनुभव आला.
'फर्गेट ' आणि ' फर्गिव ' या दोन शब्दांचे
महत्व पटले. कळत- नकळत घडलेल्या अनेक
चुकांबद्दल
स्वतःलाच माफ करू टाकले. कटू आठवणी, मनावर ओरखडा उमटवून
गेलेले शब्द, कधीतरी झालेले
गैरसमज ....जेवढं म्हणून पुसून टाकता येईल तेवढं पुसून मनाची पाटी स्वच्छ करायचा प्रयत्न केला .आणि या सगळ्यानंतर एक हलकेपणा आला . प्रसंग तेच पण माझा दृष्टीकोन बदलला. डोक्याला ताप न करता आहे त्या गोष्टीत आनंद कसा मिळविता येईल ते बघू लागले .
हाती पायी धडधाकट असताना, प्रेमाची सगळी माणसे जवळ असताना, सगळी परिस्थिती अनुकूल असताना फालतू गोष्टीवरून 'मूड ऑफ ' करून घेणं , निरर्थक गोष्टींवरून रडत-कुढत बसणं किती वेडेपणाचे आहे ते कळले.
जगणं खरंच खूप सुंदर आहे याचं भान आलं …..
जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळत असते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आणि मग एरवी साधी वाटणारी गोष्टही जेव्हा करता येत नाही, तेव्हा समजतं की आपण किती काय काय हरवलंय ते.
खरंच केवढा आनंद आहे आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा ..
तासनतास, कॉफीचे घोट घेत पुस्तकं वाचत बसणं , गोलमाल किंवा हेराफेरीसारखा सिनेमा पुन्हा पुन्हा टि व्ही वर लागला तरी दर वेळेस तितकाच एन्जॉय करणं , अमेरिकेतल्या भाचीशी कधीतरी स्काईप वरून गप्पा मारणं आणि दोन्ही डोळे चांगले असताना कधीतरी 'डोळा मारून' हसणं !!!
खरंच खळखळून हसण्यात सुद्धा केवढी गंमत आहे. मला जरा जास्तच हसू येते आणि हसायला आले कि बराच वेळ थांबतच नाही . या हसण्याचा कधी त्रास होईल असे वाटले नव्हते . पण जेव्हा थोडे हसतानाही तोंड दुखायला लागले तेव्हा म्हटले आता काही खरे नाही , निदान पूर्वीसारखे हसण्यासाठी तरी लवकरात लवकर बरे झाले पाहिजे.
तीच गोष्ट पहिल्या पावसात भिजण्याची आणि धुक्यातल्या सकाळी फिरायला जाण्याची . काही दिवस थंडी पावसापासून जपायचे असल्याने ती मजा यंदा करता आली नाही.
आणखीही बऱ्याच गोष्टी काही दिवस ‘मिस’ केल्या. जसं ...
ऑफिसच्या मधल्या कॅन्टीनमध्ये चहा घेत केलेल्या चर्चा ..
जुनी गाणी ऐकत आणि म्हणत नांदे चांदेच्या रस्त्याने हिंजवडीला लॉंग ड्राईव्हला गेल्यासारखे ऑफिसला जाणं ..
'वैशाली'तले सांबार ,
कल्याणची चटकदार भेळ आणि पाणीपुरी ....
मैत्रिणींबरोबर रात्रभर मारलेल्या गप्पा ....
पावसात भिजणं , आणि मग घरी येउन गरमागरम
भजी खाणं ..
जरी सुगरण नसले तरी घरच्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ करून त्यांना खूष करणं ..
पूजा पार्क मधल्या मंदिरातली संध्याकाळची आरती .... आणि असं बरंच काही...
आता पुन्हा या गोष्टी करताना पूर्वीपेक्षा नक्कीच जास्त मजा येते !!आता उगवणारी प्रत्येक सकाळ , प्रत्येक दिवस नवा उत्साह घेऊन येतो. खिडकीतून बाहेरची झाडं , उगवता सूर्य पहात घेतलेला चहा आणखीनच तरतरी देतो
.कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी 'आजच्या' दिवसाइतका चांगला दुसरा कुठलाही दिवस नाही हे कळल्याने , पुढे कधी तरी वेळ मिळाल्यावर करू म्हणून बाजूला ठेवलेल्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे .
एखाद्या दिवसातला सगळा ताण , क्लेशदायक विचार दिवस संपतानाच मनातून संपवून टाकायची हळू हळू सवय करून घेतेय.
कधीतरी मनावर ‘मळभ’ आलंच तर त्ते पटकन दूर सारून मोकळा श्वास
घ्यायला शिकतेय .गेलेला 'काल ' आणि येणारा ' उद्या' यांचा फारसा विचार न करता ' आज' मस्त जगून घेतेय ….
खरंच , आयुष्यातलं खूप मोलाचं असं काहीतरी या वर्षी
हाताशी आलंय .
सरत्या वर्षाला निरोप देताना मनात परमेश्वराबद्दल अपार कृतज्ञतेची भावना आहे.
जगातल्या चांगुलपणावरचा माझा विश्वास खरा ठरवल्याबद्दल ....
डोळ्यावरची झापडं दूर करून नवी दृष्टी दिल्याबद्दल....
माझा स्वतःशीच कमी होत चाललेला संवाद पुन्हा घडवून आणल्याबद्दल.....
आणि, खऱ्या अर्थाने ' जगणं साजरं ' करायला शिकवल्याबद्दल ....
आता नवीन वर्षाचा संकल्प एकच, मस्त जगायचं ,
मजेत जगायचं !!!वैशाली फाटक
डिसेम्बर , २०१२
खूप सुंदर लिहिलयस!
उत्तर द्याहटवाआणि मनापासून.
असे अनुभव सगळ्यांना येत असतील पण त्यातून आपलं जीवन समृद्ध कसं करायचं हे तुझ्या लेखावरून समजतंय.