शुक्रवार, ७ जुलै, २०१७

तारा बापट बाईंच्या स्मृतीस अभिवादन करून ...

२०१३ साली आदरणीय तारा बापटबाईंच्या पुस्तक प्रकाशनानंतर मी एक लेख लिहिला होता आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाईंकडे तो  घेऊन गेले. बाईंनी नंतर सावकाश वाचून मला फोन केला आणि म्हणाल्या "अगं , लेखापेक्षा गुरुपौर्णिमेला बाईंना देता आला म्हणून तुला झालेला तुझ्या चेहेऱ्यावरचा आनंदच मला इतका आवडला . अशीच लिहीत रहा "
आज बाई शरीरानं आपल्यात नसल्या तरी त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी आहे. 
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तोच लेख प्रकाशित करत आहे .




       गेल्या महिन्यात आॉफिसमध्ये 'एचआर' ने एक कार्यक्रम आयोजित केला होता. स्त्रियांमधले नेतृत्वगुण, त्या अनुषंगाने काही यशस्वी महिला पाहुण्यांच्या मुलाखती, ऑफिसमधल्या काहीजणींचे अनुभव असे काहीसे कार्यक्रमाचे स्वरूप होते. मलाही त्यात भाग घेण्यासाठी बोलावल्याने काही दिवस माझी तयारी चालू होती. Leadership Development वरची पुस्तके, इंटरनेटवर असलेली निरनिराळ्या प्रकारची माहिती आणि माझा गेल्या काही वर्षांचा corporate जगातला प्रवास, अनुभव असे सगळे एकत्र करून एक गोषवारा तयार करत असतानाच जूनच्या संध्याकाळी एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचा योग आला.


माझ्या शालेय शिक्षिका आणि कायमच्या मार्गदर्शक, म्हणजे आमच्या लाडक्या तारा बापट बाई यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा. ८७व्या वर्षी डाव्या हाताने, आयुष्यभरातल्या आठवणी लिहून त्या प्रकाशित करणे म्हणजे खरोखरच 'विशेष' गोष्टच होय. बाईंचे कुटुंबीय, विद्यार्थिनी, बागेत फिरायला येणा-या मैत्रिणी, शाळेतल्या सहकारी शिक्षिका, सगळीच बाईंच्या प्रेमाची माणसं कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.


त्यातल्या काही जणांनी त्यांची मनोगतं व्यक्त केली. आणि ती सारी ऐकताना जाणवलं, 'अरे, आपण गेले काही दिवस ज्या नेतृत्वगुणाबद्दल इतकं वाचतोय, विचार करतोय, त्याचं मूर्तीमंत उदाहरण तर इथे समोरच आहे. रॉबिन शर्माच्या  ‘Leader with no title philosophy’ मध्ये समावेश करता येईल असेच व्यक्तिमत्व!!


बाईंची आणि माझी ओळख पाचवीपासूनची. बाई आम्हाला मराठी शिकवायला होत्या. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी आम्हाला पावसावर निबंध लिहायला सांगितला होता. आम्ही काही मुली इतर लहान प्राथमिक शाळांमधून 'रेणुका स्वरूप'मध्ये आलो होतो. त्यामुळे सुरुवातीला जरा बुजरेपणा होता. अश्याच एका मुलीचा निबंध खूप छान झाला होता.  तिच्या निबंधाचे आणि हस्ताक्षराचे बाईंनी वर्गात कौतुक केले आणि तिला फुलस्केपवर निबंध लिहून नोटीस बोर्डावर लावायला सांगितला. एक छोटासा प्रसंग. पण त्या प्रसंगाने त्या मुलीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. 'Motivation','Appreciation' हे नेतृत्वगुण तरी अजून वेगळे काय असतात ?


Vision' आणिGoal' या शब्दांचा दूरान्वये संबंध नव्हता आणि अर्थही जेव्हा कळत नव्हता त्या काळात बाईंनी नेहमी 'सर्वोत्तम' कामगिरीचेच लक्ष्य आमच्यासमोर ठेवले. मग ती स्कॉलरशिपची परीक्षा असो, आंतरशालेय निबंध स्पर्धा असो किंवा पूना गर्ल्स असोसिएशनची डॉज बॉलची  मॅच असो . बाईंच्या शब्दातच सांगायचे झाले तर, 'आपल्या सगळ्या मुली हुशार आहेत. मेहनत घेतली तर नक्की 'top'लाच जाणार.' आणि मग हे लक्ष्य साध्य करण्यासाठी Hardwork आणि Smartwork दोन्ही करायची सवय बाईंनी लावली. गणितं पटकन सोडवायच्या तर कितीतरी युक्त्या त्यांच्याकडे असायच्या.

Lead from front, Lead with Example' ही अजून एक Leadership Quality. मुली डॉजबॉलची प्रॅक्टिस करत आहेत आणि बाई Teachers’ Room मध्ये आहेत असे कधी आठवत नाही. मी स्वतः खेळत नसले तरी चिंचेच्या झाडाखाली उभे राहून जातीने मुलींची प्रॅक्टिस घेणा-या बाई आठवतात.

तीच गोष्ट गणिताची. काळ-काम-वेगाची त्रैराशिके, नाना प्रमेयं आणि सिद्धांत बाईंनी इतके 'पक्के' शिकवले की, --, -१२-१३ अशी काटकोन त्रिकोणाची गणितं आजही पटापट करता येतात. 'रावळे पाटील'सारख्या अवघड पुस्तकातील एकेक गणित बाईंनी आमच्याकडून सोडवून घेतले.
एखादे गणित आपण वेगळ्या पद्धतीने सोडवले तर बाईंना त्याचे विशेष कौतुक असे. एखादे गणित जर कोणालाच आले नाही तर दुस-या दिवशी आल्या आल्या बाई ते सोडवून दाखवणार. एकूणच शिक्षणाबद्दल बाईंना एक विलक्षण झपाटलेपण आहे.


गणितासारखा अवघड विषय सोपा करून शिकवतानाच, मराठीची गोडीही बाईंनी लावली. इतर बाहेरचे उतारे वाचणे, महत्वाच्या मुद्यांना अधोरेखन, निबंधात सुभाषिते किंवा कवितांच्या ओळींचा समावेश अशा अनेक सवयी बाईंनी आम्हाला लावल्या. आणि म्हणूनच आज 'IT क्षेत्रात काम करत असताना 'Documentation' चा जितका इतरांना बाऊ वाटतो तितका मला वाटत नसेल.

'Creating opportunity for people' हा आणखी एक महत्त्वाचा नेतृत्व गुण. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातून शाळेत मुली येत असत. एखादी हुशार असून मागे राहणारी असेल तर तिला तिच्या आवडीचे काम, वर्गातली एखादी जबाबदारी देऊन प्रोत्साहित करणे तसेच एखादी आगाऊपणे वागत असेल, म्हणजे आजच्या भाषेत 'Attitude' दाखवत असेल तर तिला वेळीच शांतपणे समज देणे (Direct Feedback) हेही आम्ही अनुभवले आहे. बाई आवाज चढवून कधी कोणाला रागावल्या नाहीत तरीही स्पष्ट, शांत पण ठाम शब्दात त्या कोणाचे काही चुकले तर कानउघडणी करत असत.
Recognition and due discipline when necessary हे Leadership Principle बाई किती सहजपणे फॉलो करत असत . 

        'Mentoring and Relationship Building' हा अजून एक महत्वाचा नेतृत्व गुण.   वी झाल्यावर,  आम्ही ८वीत दुपारच्या शाळेत गेलो. पण एखादी खास गोष्ट घडली किंवा एखाद्या स्पर्धेसाठी मदत हवी असली तर आवर्जून तारा बापट बाईंना भेटायचे. त्या नक्की मदत करणार ही खात्री. काही वर्षांपूर्वी माझी मुलगी दहावीत गेली. मराठीसाठी कोणचे मार्गदर्शन घ्यावे का? असे विचारावेसे वाटताच पहिला फोन बाईंनाच केला हाता. मला फारसे आठवत नाही पण आजच्या मुलींना येतात तसे "Teenage Problems'  आम्हाला फार आले नाहीत कारण शाळेत असे सांभाळून घेणारे, मार्गदर्शन करणारे, समजावून सांगणारे Mentors होते.


       परवा मनोगतं ऐकताना हे ही जाणवले की बाईंबरोबर ज्यांचे ज्यांचे नाते जडले ते आयुष्यभरासाठीच. त्या नात्याला वयाचे, काळाचे, स्थळाचे कसलेच बंधन नाही. प्रत्येकाबरोबरचे त्यांचे नाते तितकेच ताजे, टवटवीत आणि हवेहवेसे वाटणारे आहे.


बाईंच्या आठवणींचे पुस्तक वाचल्यावर जाणवते कीPositive Attitude’ अजून वेगळा तरी काय असतो ? वाईटातून चांगले शोधायची वृत्ती (Converting Obstacles into Opportunities). त्यामुळेच त्या दैवगतीने आलेल्या संकटांचा सामना करू शकल्या. सतत नवीन वाचायची सवय, नवीन शिकायची इच्छा यामुळे बाईंच्या विचारात कधी 'साचलेपणा' आला नाही. बदलत्या काळाशी, बदलत्या परिस्थितीशी त्या सहज जुळवून घेऊ शकल्या. आणि म्हणूनच विद्यार्थिनींच्या 'प्रत्येक' पिढीला त्या तितक्याच जवळच्या, तितक्याच आपल्या वाटत राहिल्या.


Learning from Team Members' हे Leader  चे अजून एक वैशिष्ठ्य. वयाचा, अनुभवाचा कुठलाही मोठेपणा दाखवता बाई जेव्हा मला म्हणाल्या की, 'अगं, पुस्तक छापायच्या आधी तुला एकदा दाखवायचे होते. तुझ्या काही सूचना असतील तर....' बाईंचे हे बोलणे ऐकून मला लाजल्यासारखेच झाले. आपल्यापेक्षा पाच-सहा वर्षांहून लहान टीम मेंबरने काही नवीन सूचना केल्या तर सहजपणे स्वीकारू न शकणारे अनेक जण अवती-भवती नेहमी दिसत असताना, बाईंचे असे विचारणे म्हणजे अजून आपल्याला किती लांबचा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव करून देणारेच होते.


Conviction' and ‘Credibilityहे अजून दोन महत्वाचे नेतृत्व गुण.

आपल्या जीवनध्येयाबद्दल पूर्ण सुस्पष्टता आणि ठाम जीवनमूल्ये. एकदा ही विचारांची दिशा निश्चित असल्यावर त्या मार्गाने चालत राहणे हे वाटते तितके सोपे नाही. बाईंना शाळेत कधी पर्यवेक्षकाची जागा मिळाली नाही. त्याची कारणे काहीही असतील पण बाईंनी ती कधीच कोणाशी बोलून दाखवली नाहीत. मी म्हटले तसे बाईंना कोणत्या 'Title' ची गरजच नव्हती. शाळेतल्या मुलींना, आसपासच्या किंवा घरी शिकायला येणा-या मुलांना, नातवंडांना, जितक्या जणांना जितक्या चांगल्या प्रकारे शिकवून पुढे आणता येईल तेवढे उत्तम शिक्षण देत राहणे हाच बाईंचा जीवनध्यास आहे. बाईमध्ये शिक्षणाबद्दल जबरदस्त 'passion' आहे आणि त्यांच्या सहवासात येणा-या प्रत्येकामध्ये ती सहजपणे उतरत राहते. मला वाटते, तारा बापट बाईंचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हा एकच 'शिक्का'आमच्यासाठी पुरेसा आहे.


‘The role of a leader is to grow Big people. The development of people is the key’ बाईनीआयुष्यभर तेच केले . कुठलेही क्षेत्र घ्या. तिथे बाईंची यशस्वी विद्यार्थिनी नाही असे सापडणारच नाही आणि बाईंची शिकवण आणि संस्कार इतके घट्ट रूजले आहेत की मी निश्चितपणे सांगू शकते की भले बाईंची विद्यार्थिनी एखाद्या कंपनीची CEO जरी असली तरी तिचे पाय कायम जमिनीवरच असतील.


बाईंकडून शिकण्यासारखे खूप आहे.
         गणित, मराठीसारख्या शालेय विषयांच्या पलीकडले खूप काही.
         जे काही करायचे ते मनापासून.
         सर्वोत्तम कामगिरी करायची असेल तर मेहनतीला पर्याय नाही. जगात पाय ओढणारे                             खूप असतील पण आपण आपल्या   वाटेने जात रहायचे.
     भुंगा ज्याप्रमाणे फक्त मधुकण वेचतो, त्याप्रमाणे प्रत्येक माणसामधले चांगले ते बघायचे, चांगले ते उचलायचे. चांगलेच विचार करायचे आणि चांगलेच बोलायचे 
         हे सगळे लिहायला खूप सोपे पण आचरणात आणायला अतिशय कठीण आहे. पण बाई ते जगत आहेत.


आज ८७व्या वर्षी डाव्या हाताने पुस्तक लिहिण्याइतकी जबरदस्त इच्छाशक्ती, जगण्यातली उमेद, सर्वांवर भरभरून प्रेम करण्यातला त्यांचा आनंद आणि समाधान.....


बाई, खरंच अजून खूप काही शिकायचं आहे तुमच्याकडून. हा आपला 'तास' असाच चालू ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!!!


वैशाली फाटक
जुलै २0१३

५ टिप्पण्या:

  1. वैशाली फार छान आणि मनापासून लिहतेस तू.विचारांची सुस्पष्टता आणि मांडणी अुत्तम!Keep writing....great going girl...thumps up..

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. Very well written... I was fortunate to get guidance from bai... I can relate 100% to what you have captured beautifully... every guru Purnima, we used to visit Bapat bias home for several years after our school years...

    Where can I get a copy of her book...

    Thanks again.. vicharaana shabda Diya baddal..

    उत्तर द्याहटवा
  4. Very well written... I was fortunate to get guidance from bai... I can relate 100% to what you have captured beautifully... every guru Purnima, we used to visit Bapat bias home for several years after our school years...

    Where can I get a copy of her book...

    Thanks again.. vicharaana shabda Diya baddal..

    उत्तर द्याहटवा