बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

माझी आई


माझी आई

परवा अगदी सहज डोक्यात विचार आला की नवरात्रीला आपण सरस्वती, दुर्गा , काली, महालक्ष्मी अशा वेगवेगळ्या रूपातल्या देवींचे स्मरण -पूजन करतो तसंच या वर्षी आपल्या आयुष्यातल्या जवळच्या स्त्री रूपांचं स्मरण केलं तर ? आणि मग विचार करताकरता इतक्या जणी माझ्या डोळ्यासमोर येत गेल्या . प्रत्येक स्त्री रूप वेगळं तरीही  माझ्यासाठी मात्रती’  खासच . मग ठरवलं जमेल तसं हे त्यांचं 'special ' असणं लिहिलं तर ..

आणि मग सुरुवात केली अर्थातच ' आई ' पासून .

 

माझी आई .

माहेरची नलिनी शिधोरे आणि सासरची कुंदा गोडबोले .

आसपासचे सगळे तिला 'शुभदाची आई ' म्हणून हाक मारायचे . मला अगदी राग यायचा आणि वाईटही वाटायचं . ती माझी पण आई आहे मग तिला 'वैशालीची आई ' का नाही म्हणत कोणी ? गेल्या वर्षी माझ्या ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाला ती आली आणि 'वैशालीची आई 'म्हणून जेव्हा कोणीतरी तिची सगळ्यांना ओळख करून दिली तेव्हा मला इतकं छान वाटलं  .

 आईमला जेव्हापासून आठवते आहे तेव्हापासून अतिशय व्यवस्थित . घरातही एकदम नीटनेटकी साडी . हातभर काचेच्या बांगडया , भांगात लाल कुंकू  आणि प्रसन्न हसू असलेला सात्विक चेहेरा . तिला मी सतत काम करतानाच पहात आले . काम करता करता ती हळू आवाजात व्यंकटेश स्तोत्र म्हणत असायची तेही आठवतंय . घरावर सतत फिरणारा हात ,स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ करून बघायची आणि सगळ्यांना खायला करून घालायची हौस . आला -गेला , पाहुण्या रावळ्यांची सरबराई करण्याचा उत्साह . फार बाहेर राहण्यापेक्षा आपण बरं , आपलं घर बरं अशी वृत्ती. 

माझी आईजेव्हा जेव्हा मी 'तोत्तोचान ' पुस्तक वाचते तेव्हा दरवेळेस नव्यानं जाणवतं की किती समंजसपणे आईनं मला हाताळलं . शुभदासारखी शहाणी , शांत मुलगी आणि तिच्यानंतर मी म्हणजे दुसरं टोक. द्वाड , मस्तीखोर, रोज काहीतरी उद्योग करणार , एका ठिकाणी पाच मिनिटं पण शांत बसणार नाही , अखंड बडबड , नको तिथे अफाट चालणारं डोकं आणि चारचौघात कोड्यात टाकणारे प्रश्न . एखादी आई वैतागूनच गेली असती .  पण आईच्या पेशन्सची कमाल वाटते.   तिनं कधीही मला 'प्रॉब्लेम चाईल्ड’न समजता, उलट माझी सगळी ऊर्जा , सगळ्या क्षमता चांगल्या प्रकारे कशा वापरल्या जातील हेच बघितलं.

 कुठल्याही साच्यात तिनं माझं बालपण , माझं कुतूहल , माझी जिज्ञासा  कोंबून बसवली नाही . खरंच फार नशीबवान आहे मी . आपल्या प्रत्येक मुलाचं वेगळेपण जाणून त्याप्रमाणे शुभदाशी,माझ्याशी  किंवा अमितशी वागण्याचं मानसशास्त्र ती कधी आणि कुठे शिकली कोण जाणे. 

 ती आम्हाला कधी जोरात ओरडल्याचं आठवत नाही . मार  तर नाहीच . पण तिच्या डोळ्यांचा धाकही पुरेसा असायचा . प्रेमळ खूप पण फाजील लाड नाहीत . अक्षर चांगलं काढलं नाही म्हणून तिने माझ्या वहीची पानं फाडलेली आठवतात . कामाच्या आणि अभ्यासाच्या बाबतीत  अजिबात तडजोड नाही . 

ती दीड वर्षांची असताना तिचे वडील गेले त्यामुळे माझ्या आजीने मुलांची जरा जास्तच काळजी घेतली . आईला कॉलेजला जाता आलं नाही,  मैत्रिणींबरोबर ट्रीपला जाता आलं  नाही.  आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी शुभदाला आणि मला करता याव्यात यावर तिचा कटाक्ष असे.

घोड्यावर बसायची आम्हाला फार भीती . पण कितीही रडलो तरी बंड गार्डनला ती आम्हाला घोड्यावरून चक्कर मारायलाच लावायची . सायकल शिकणं , पोहायला शिकणं कशापासूनच सुटका नव्हती पण आज त्यामुळेच कुठलीही गोष्ट करायचा आत्मविश्वास आमच्यात आहे. तिचा आवाज चांगला असूनही ती  गाणं शिकू शकली नाही . तिची गाणं शिकायची इच्छा तिने शुभदाला आणि मला गाणं शिकवून पूर्ण केली . लग्नानंतर बाबांच्या प्रोत्साहनाने तिने 'अमृत सिध्दी 'नाटकात छान भूमिका वठवलीच पण आम्हालाही कायम अभ्यासाशिवाय इतर अनके गोष्टी करायला उत्तेजन दिले.

मी शाळेत असताना ती रोज रात्री पोळ्या करताना माझ्याकडून निबंधाच्या एका विषयाची तयारी करून घ्यायची . मला काय काय सुचतंय ते मी आधी सांगायचं आणि नंतर ती तोच विषय अजून कसा खुलवता येईल , वेगळ्या पद्धतीने मांडता येईल ते सांगायची . ती सवय अजूनही एखाद्या प्रेझेंटेशनची तयारी करताना उपयोगी पडते .

आई अतिशय उत्तम शिवण शिवायची . अनेक प्रकारची फॅशनची पुस्तकं आणून , त्याप्रमाणे लक्ष्मी रोड किंवा कॅम्प मधून त्या प्रकारचे कापड आणून ती आमचे सुंदर कपडे शिवायची . मला राजस्थानी लाल हिरवे कापड आणून, त्याला छान घुंगरु लावून  तिने लमाणी ड्रेस शिवला होता . मी तो घालून ऐटीत मिरवत असे . पण मी मोठी झाल्यावर मला शिवण शिकवायचा तिचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरला . मशिनचे चाक उलटे फिरवून सुईत आधी घातलेला दोरा परत बाहेर काढायचे माझे कौशल्य पाहून तिने माझ्यापुढे हात टेकले . 
जसजसे मोठे होत गेलो तसतशी प्रेमळ धाकाची जागा विश्वासाने , मैत्रीने घेतली . आमचं 'वयात येणं ' इतकं सहज घडलं की त्यावेळेस काही मूड स्विंग्ज आल्याचे आठवत नाही . कुठल्या कॉन्सेलरची कधी गरज भासली नाही कारण आईशी अगदी घट्ट मैत्री होती . मनातलं काहीही सहज सांगतायेण्याइतकी मैत्री . संध्याकाळी  उशीरा नाटकाची प्रॅक्टिस संपवून मी शाळेतून चालत घरी यायचे पण तिने कधी हैराण काळजी केल्याचे आठवत नाही . आज कदाचित मीच माझ्या मुलीची जास्त काळजी करते .

कुठेही पुरोगामीपणाचा आव नाही पण आम्हाला वाढवताना तिचा आमच्या बाबतीतला दृष्टिकोन व्यापक होता .  शुभदा वक्तृत्व स्पर्धेसाठी महाराष्ट्रभर एकटी फिरायची , आमचे बरेच मित्र आमच्या घरी कायम यायचे . त्या काळाच्या मानाने आमच्यावर तिनं कुठलीच अशी बंधनं घातली नाहीत . घरात नेहमी मोकळं , विश्वासाचं वातावरण ठेवण्यात आईचा फार मोठा वाटा आहे .

पुढे पुढे आमच्यापेक्षा नातवंडातच ती जास्त गुंतत गेली . लहान मुलांची तिला अतिशय हौस . त्यांना गोष्टी सांगून भरवायला, त्यांच्याशी खेळायला, गाणी गोष्टी शिकवायला आणि थोपटून झोपवायला तिला मनापासून आवडतं . अजूनही कोणाचीही लहान मुलं ती अगदी प्रेमाने कितीही वेळ सांभाळू शकते आणि ती पण तिच्याबरोबर छान रमतात .

माझी आई ...बाबांचं मोठं आजारपण आणि त्यांचा वियोग याच्यातून सावरली असली तरी वयोमानानुसार आता थकली आहे . पण अजूनही रोजचे ठराविक खाणे, ठराविक चालणे आणि कामाची शिस्त तशीच आहे . ती आमच्याकडे दोन दिवस राहायला येणार म्हणताच आमचे घर आपोआप स्वच्छ होते 

अधूनमधून ती छान लेख लिहिते  आणि तिच्या सुजाण पालक मंडळात कार्यक्रम पण करते . सुजाण पालक मंडळ,उपासना केंद्र , दासबोध वाचन असे तिचे स्वतःचे काही उपक्रम तिने चालू ठेवले आहेत.

आपण कितीही मोठे झालो तरी हक्काने रागावणारं  किंवा मायेनं विचारपूस करणार कोणीतरी असावं लागतं .

" व्यायाम कर, वजन कमी कर " म्हणून ती  कधीतरी मला समजावत असते तर कधीतरी " अगं , किती थकतेस काम करून . डोक्याला फार त्रास करून घेऊ नकोस  आणि टॉनिकची गोळी घेतेस ना रोज ?" म्हणून माझी काळजीही घेत असते .

आता कधी कधी माझी आई तिच्या आईसारखी वागते आणि मी माझ्या आईसारखी . वयाचा परिणाम !!

पण इतकंच . बाकी माझ्यात आणि माझ्या आईत फारसं साम्य नाही. थोडाफार व्यवस्थितपणा सोडला तर मी तिचे फारसे काही गुण घेतले नाहीत.

कुठलाही पदार्थ करताना 'निगुतीनं ' करावा , आपलं मन ओतलं  की चव छान येणारच . ह्या 'निगुती 'प्रकारातही माझी विशेष प्रगती झाली नाही. बाकी काही तिच्यासारखं वागायला जमलं नाही तरी चालेल पण तिच्या हातची थोडीतरी चव माझ्या हाताला यावी असं फार वाटतं .

तिचा अजून एक महत्वाचा गुण म्हणजे संयम आणि जिभेवर ताबा . कोणालाही कधी  टोचून बोलणार नाही , ताड्कन बोलून तोडणार नाही. काही पटलं नाही तरी वाद नाही.  काही गोष्टी मनातच ठेवेल . आणि कधीतरी सोडूनही देईल

बाबा जितके शीघ्रकोपी तितकी आई शांत . बाबा रागावल्यावर कुठल्याही प्रकारचा वाद घालता नंतर शांतपणे ती तिचे म्हणणे त्यांना समजावून सांगायची . मला आत्ता कुठे हे जरा जमायला लागले आहे .

ती खऱ्या अर्थाने 'Home Maker ' आहे.  तिचे हे स्कील आजकालच्या कॉर्पोरेट, बिझीनेस स्किलच्या तुलनेत कुठेही कमी नाही. आपले घर, घरातील आपली माणसे, नातेवाईक हीच तिची कर्मभूमी. कुटुंब हेच तिचे सर्वस्व. आयुष्यभर निरपेक्ष वृत्तीने तिने सर्वांवर फक्त प्रेमच केलं . भाचरांचे , पुतण्यांचे , नातवंडांचे कौतुक . हौसेने सगळ्यांसाठी रुखवत नाहीतर बाळंतविडे . प्रत्येकाच्या फर्माइशीनुसार वेगवेगळे पदार्थ . दुसऱ्यांच्या आनंदातच तिचा आनंद . 

केवळ जाताजाता कोणाला तरी मदत करण्याचा तिचा स्वभाव नाही . जे करेल ते अगदी मनापासून . त्यात दिखावा नाही , कोणी आपल्याशी तसंच वागावं अशी अपेक्षा नाही . तिचं प्रेम आणि चांगुलपणा जणू सगळ्यांनी गृहीतच धरला आहे.

मला वाटतं आयुष्यभर तिने स्वतःसाठी असा काही विचार न करता फक्त  आमच्या सगळ्यांच्या हिताचाच  विचार केला . बाबांची ती खऱ्या अर्थानेसहधर्मचारिणी’ होती . बाबा यशस्वी डॉक्टर असले तरी खरे म्हणजे ते 'जे जे स्कूल ऑफ आर्टस्' लाच जायला हवे होते . बाबांच्या चित्रकलेला , शिल्पकलेला, लेखनाला, फोटोग्राफीला   तिने फार  खंबीर पाठिंबा दिला . तिचा भक्कम हातभार होता म्हणूनच बाबांच्या हातून अष्टविनायकाच्या प्रतिकृती घडू शकल्या. सर्वस्व अर्पण करण्याची मानसिकता, झोकून देण्याची तयारी, स्वतःच्या माणसांवर पूर्ण विश्वास  यातच तिचं वेगळेपण आहे.

 दुर्गा, काली या प्रमाणे ती कठोर, दुष्टांची कर्दनकाळ नाही ,तर  कुटुंब जपणारी 'जिवती 'आहे . सरस्वती, गृहलक्ष्मी  आणि साक्षात 'अन्नपूर्णाच  ' तिच्या रूपात मला दिसते 

मध्ये कुठेतरी वाचलं होतं की जन्म घेताना तो कुठे आणि कधी घ्यायचा  हे आपल्या हातात नसतं पण आपण आपली  ' आई ' मात्र निवडू शकतो . जन्मोजन्मी हीच आई निवडण्याचं  भाग्य मला आणि पुढच्या जन्मी मी तिची 'शहाणी ' मुलगी होण्याचं भाग्य तिला लाभो हीच प्रार्थना.

  

- वैशाली फाटक
२१ सप्टेंबर २०१७

२२ टिप्पण्या:

  1. डोळे पाणावले बघ. काकू अशाच आहेत ग😊

    उत्तर द्याहटवा
  2. जिवती वाचून मन भरून आले, खूपच हृदयस्पर्शी

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी मनापासून व्यक्त झालेली आई..उत्तम

    उत्तर द्याहटवा
  4. Aati Sunder Lekhan, Kuni tari kharach mahatla Ahe, Aai Vena Bhikari Raja Teeni Lokacha, Thank you for sharing it with us.

    उत्तर द्याहटवा
  5. Atishay Sundar!! Kharach aaisarkh nisvarthi prem kunihi karu shakat nahi aaplyavar . Thanks a lot for sharing.

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय सुरेख लेख. आई हि व्यक्तीच खूप वेगळी असते . तिच्या सारखी माया कोणीही नाही करू शकत.

    उत्तर द्याहटवा
  7. अतिशय सुंदर लिहीले आहें । खर सांगायच तर वाचताना आई सोबतच्या आठवणी जाग्या झाल्या। एक नवीन भरारी ,नवीन चेतना आणि आई बद्दल खूप काही.....जे शब्दांत बांधणे कठीण....अशा भावना दाटून आल्या। नवरात्रिचा पहिला दिवस मातेला सर्मपित ����

    उत्तर द्याहटवा
  8. मस्त! केवळ शब्दातून व्यक्तिरेखा उभारणे कठीणच, पण इथे जमले आहे!

    - विजय अर्जुनवाडकर

    उत्तर द्याहटवा
  9. Aai mhanje, Aai mhanje, AAI aaste
    Tee Dudhavarchi SAI aaste.....

    Vaishali, far bhavuk kelas.... kharach masta...!!!

    उत्तर द्याहटवा
  10. खुपच छान लिहले आहेस. माझ्याही माझ्या आई विषयी बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. तू लिहिल्या प्रमाणे कुठल्या corporate training शिवाय दिलेले धडे.....
    मॅा तुझे सलाम 🙏🏻🙌🏻

    उत्तर द्याहटवा
  11. Beautifully articulated and written from the heart!! Khupach chaan Vaishali 👌👌

    उत्तर द्याहटवा