गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

माझी आजी






आज मी लिहिणार आहे माझ्या आजी बद्दल .


श्रीमती लक्ष्मीबाई   शिधोरे . माझ्या आईची आई . तिला आम्ही सगळे आजी म्हणता नुसतं 'जी' असं म्हणत असू. माझ्या सर्वात मोठ्या मामेभावाने हे नाव तिला दिले आणि मग तिला तेच आवडायला लागले .


जीचं आयुष्य म्हणजे खरोखरंच ' वाट वळणाची '


१९०४ साली कोकणात तिचा जन्म झाला. वडील पेशाने डॉक्टर . सहा बहिणी आणि एक भाऊ . खाऊन पिऊन सुखी कुटुंब . जीला शाळेत जायची फार इच्छा होती पण त्या काळच्या रितीनुसार त्यांना घरीच पंतोजी शिकवायला येत . चौथी पर्यंत ती घरीच शिकली आणि आईकडून शाळेत जायची परवानगी मिळेल अशी आशा वाटत असतानाच वयाच्या चौदाव्या वर्षी तिचं लग्न ठरलं.मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये , मला खूप शिकायचं आहे” असा तिने हट्टही करून बघितला पण त्याचा काही उपयोग झाला नाही .


माझे आजोबा देवासचे . तिच्याहून वयाने बरेच मोठे होते. आधीच्या लग्नाचा एक लहान मुलगाही होता. खूप मोठं घर , सासू-सासरे , दीर, एक दोन परत आलेल्या नणंदा . जी हळूहळू त्या वातावरणात रुळू लागली . माझे आजोबा सर्जन होते. खरोखर देव माणूस . जीला वाचनाची आवड आहे हे समजताच ते तिच्यासाठी पुस्तकं आणू लागले . रात्री घरातले सगळेजण  झोपले की तिला रोजचे वर्तमानपत्र वाचायला मिळत असे.


आजोबांची खाजगी प्रॅक्टिस होती. पण त्या बरोबरच  देवास संस्थानच्या राजाचे सर्जन म्हणून त्यांची नेमणूक झाली. परंपरेनुसार मानाचा साडे  तीन पोशाख म्हणजे  अंगरखा, शेला, फेटा, तलवार असा संस्थानचा पोशाख त्यांना मिळाला होता. आपण जे एरवी पुस्तकातून वाचतो ते सगळं राज वैभव जीने स्वतः बघितलं . राजघराण्यातले शाही विवाह सोहोळे , दसरा , रंग पंचमीसारखे शाही सण आजोबांबरोबर तिलाही अनुभवायला मिळाले . खऱ्या चांदीच्या  तारांचे काम असलेले शेले, उंची रेशमी साड्या , आजोबांचा अंगरखा, तलवार , नक्षीकाम केलेलं तबक  अशा त्या काळाची साक्ष देणाऱ्या वस्तू आम्ही जपून ठेवल्या आहेत.


एकीकडे इतकं सगळं राजवैभव आणि मान मरातब मिळत असताना वैयक्तिक आयुष्यात तिला फार मोठ्या आघातांना सामोरं जावं लागलं . वेगवेगळ्या कारणांनी तिची नऊ मुलं एका पाठोपाठ काही वर्षात दगावली . काही जन्माला येताच तर काही चार-पाच वर्षांची होऊन लळा लावून गेली . एका आईसाठी किती प्रचंड दुःख !!! कल्पनाही करवत नाही.


पुढे आजोबा इंदोरला स्थायिक झाले. तिची नंतरची पाचही  मुलं जगली. आता कुठे सगळं व्यवस्थित सुरु आहे असं वाटत असतानाच आजोबांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि फारसे काही उपचार करण्यापूर्वीच ते हे जग सोडून गेले. त्यावेळी जीचं वय होतं फक्त अडतीस वर्ष आणि पदरात दीड वर्षांपासून चौदा वर्ष वयातली पाच मुलं.
समोर जणू काळोखच पसरला . या आघातानं ती काही काळ नक्कीच डगमगून गेली पण कोलमडली मात्र नाही.


जी मुळातच अतिशय चाणाक्ष बुद्धीची आणि धोरणी . मध्यप्रदेशात राहिलो तर आपल्याला नातेवाईकांवर अवलंबून राहायला लागेल , मुलांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या फार संधी मिळणार नाहीत हे तिच्या लक्षात आलं  आणि त्यासाठी इंदोर कायमचं सोडून मुंबईला जायचं असा अतिशय धाडसी निर्णय तिने त्या काळात घेतला.
आजोबांचा दवाखाना विकून तिने बाकीची आवराआवरी केली आणि नातेवाईकांचा रोष पत्करून डोंबिवलीला बिऱ्हाड हलवलं . इंदोर -देवासच्या मोठ्या घरांमधून ती डोंबिवलीला चाळीत राहायला आली . पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत तिचा स्वतःवर आणि स्वतःच्या मुलांवर पूर्ण विश्वास होता .

पुढे मुलं चांगली शिकली , स्वतःच्या पायावर उभी राहिली . जीला थोडा वेळ मिळू लागला आणि तिने डोंबिवलीला भगिनी मंडळ सुरु केलं . डोंबिवली तेव्हा इतकं मोठं नव्हतं . बऱ्याच घरी जाऊन , तिथल्या महिलांशी बोलून तिने सदस्य जमा केले . मंडळात वेगवेगळे उपक्रम सुरु केले . महिलांना बोलतं केलं . नामवंत लोकांना बोलावून व्याख्यानं , चर्चा सत्र आयोजित केली . स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी जाऊन, त्यांना भेटून त्यांचाही  सत्कार व व्याख्यान डोंबिवलीत पहिल्यांदाच तिने आयोजित केले.
पुढे माझ्या मामाच्या नोकरीच्या निमित्ताने ती दादर आणि मग विलेपार्ल्याला राहायला आली. मामीची नोकरी चालू असताना घरची जबाबदारी सांभाळली .


अर्थात जीच्या आयुष्याची ही प्रेरणादायी कहाणी आम्हाला जरा मोठे झाल्यावरच समजली . तो पर्यंत आमच्या दृष्टीने ती फक्त एक प्रेमळ आणि तितकीच शिस्तीची आजी ...


ती आमची सगळ्यांची खूप काळजी करायची . बहुदा तिची मुलं गेल्याने मुलांबाबत ती  जरा जास्तच हळवी होती . 'काळजी ' या शब्दातच 'जी ' असल्याने तिला काळजीपासून वेगळे करता येत नाही असं म्हणून आम्ही तिला चिडवायचो . प्रेम सगळ्या नातवंडांवर पण त्यातही काही जास्त  लाडकी होती . त्यांना तिच्या कपाटातला खास लाडू वगैरे मिळत असे. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सगळी मुलं जमलो की  दुपारी चहाबरोबर प्रत्येकाला दोन-दोन बिस्किटं देऊन ती डबा उचलून ठेवत असे . उकरपेंडी , म्हैसूरपाक, गोडे बटाटे नावाचा तिखट रस्सा  असे तिचे काही खास पदार्थ होते .


चौदा बाळंतपणं होऊनही तिची तब्येत चांगली होती . चणीने ती अगदी लहान . पण कामाचं उरक होता . रक्तदाब , मधुमेह काहीही नाही.  केस काळे , दात व्यवस्थित . "मी लहानपणी बिस्किटं न खाता सुकामेवा खाल्ला म्हणून मी तुमच्यापेक्षा जास्त फिट आहे " असं ती आम्हा सगळ्यांना चिडवत असे.


तिचा दिनक्रम अगदी शिस्तीचा असे. रेडिओवरच्या सकाळ-संध्याकाळच्या बातम्या ऐकणं आणि नंतर टीव्ही आल्यावर मराठी बातम्या पाहणं हा महत्वाचा कार्यक्रम. तेव्हा कोणी मध्ये बोललेलं तिला चालत नसे. रोजचा पेपर वाचून आणि बातम्या ऐकून ती स्वतःला एकदम updated ठेवत असे . ती जायच्या काही वर्ष आधी तिची दृष्टी गेली होती पण तिच्या बातम्या ऐकण्याच्या उपक्रमात कधी खंड पडला नाही . राजकारण, खेळ, सिनेमा सगळ्याची तिला इत्यंभूत माहिती असे आणि म्हणूनच ती कोणाशीही कुठल्याही विषयावर आरामात गप्पा मारू शकत असे .


काळाप्रमाणे ती स्वतःला बदलत गेली . नऊवार साडीतून ती ज्या सहजपणे पाचवारीत आली त्याच सहजपणे तिने आधुनिक रितीभाती आत्मसात केल्या . मला वाटतं 'Gender Diversity, inclusivity ' हे शब्द जरी तिला माहित नसले तरी सगळ्या वयोगटातल्या पुरुषांशी ती अगदी आत्मविश्वासाने आणि मैत्रीपूर्वक वागायची. नमस्काराबरोबर हस्तांदोलनही करायची . तिच्या मुलांइतकंच जावयांशीही ती मोकळेपणे वागायची . माझ्या बाबांबरोबर तर तिच्या गप्पा फारच रंगायच्या .


तिच्या सगळ्या वस्तू , तिचा बटवा , तिचं कपाट सगळं व्यवस्थित असे. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी . अगदी अंधारात हात घातला तरी ती वस्तू तिथेच मिळणार . तिच्याकडे मऊ कॉटनच्या किंवा बारीक डिझाईनच्या रेशमी साड्या असत. अगदी इस्त्रीची घडी केल्याप्रमाणे कपाटात एकावर एक रचून ठेवलेल्या असत .


पुण्याला ती थंडीत आमच्याकडे महिनाभर राहायला येत असे . मग आल्यावर इथल्या नातेवाईकांकडे भेटी . बाबा तिच्यासाठी ड्रायव्हर ठरवत . ३ वा जायचं असलं तर ती अर्धातास आधीच तयार होऊन बसायची. सिनेमाला जायला, हॉटेलमध्ये जेवायला जायला  तिला आवडायचे आणि हॉटेलसुद्धा चांगले , जिथे 'पांढऱ्या कडक पोषाखातले' वेटर्स असतात किंवा जिथे live  band आहे अशा ठिकाणी किंवा कॅम्पमध्ये फिरायला जायला तिला मनापासून आवडायचे . एकेकाळी ती सरदार पत्नी होती आणि आयुष्यभर ती त्याच रुबाबात राहिली . She was Royal!!!


तिला नवीन नवीन  गोष्टी शिकायची फार हौस . आम्हा नातवंडांकडून इंग्लिश बोलायला शिकली . मी इंजिनीरिंगला असताना ती माझं मैत्रिणींशी फोनवर चाललेलं बोलणं ऐकून मला शंका विचारत असे. Contour Diagram कशाला काढतात , कसा काढतात सगळं तिला समजून घ्यायचं असे . तिला शाळेत जायला मिळालं नाही आणि ती जरा आधीच्या काळात जन्माला आली म्हणून नाहीतर ती त्या काळची 'आय सी एस' च झाली असती .

तिच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती होती . माझ्या भावाच्या मुंजीच्या चार  दिवस आधी तिला mild heart attack आल्याने हॉस्पिटलमध्ये ठेवले होते . पण “माझ्या सर्वात धाकट्या नातवाची मुंज आहे . मी जाणार म्हणजे जाणारच” असा हट्ट करून ती दोन दिवसांसाठी घरी आली आणि मुंजीला  व्यवस्थित हजेरी लावून परत हॉस्पिटलमध्ये दाखल झाली . सगळे जण तिच्या या वागण्याने काळजीत असताना ‘मला काहीही होणार नाही’ हा जबरदस्त विश्वास तिच्यात होता . Very strong will power and self belief!!!


"तुम्ही आत्मचरित्र का लिहीत नाही ?" माझ्या बाबांनी एकदा तिला विचारले आणि ती ७६व्या वर्षी लिहायला लागली . रोज सकाळी सगळं आटपून ती २-३ तास सलग बसून लिहीत असे . कधी कधी जुन्या प्रसंगांचा क्रम पुढे मागे होई . मग माझे आई-बाबा तिला प्रश्न विचारून, तिला परत सगळे आठवायला सांगत . लिखाणात कधी फेरफार करावा लागे . पण तिने जिद्दीने आणि चिकाटीने ते लिहून पूर्ण केले . ' वाट वळणाची ' हे तिचे आत्मचरित्र.  नंतर  तिची दूरदर्शनवर त्या पुस्तकाच्या संदर्भात मुलाखत पण झाली. एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ठरवली. मग काय वाटेल ते होवो केल्याशिवाय राहणार नाही.


तिचं अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे तिने सगळं कुटुंब एकत्र बांधून ठेवलं . सगळे मामा -मावश्या आपापल्या घरी असले तरी सणाच्या निमित्ताने आम्ही भेटत असू . आठवड्यातून जीला त्यांनी नियमित भेटायला यावं असा तिचा अलिखित नियम  होता .आम्ही पुण्यात असल्याने माझ्या आईबरोबर पत्राने संपर्क ठेवत असे . तिच्या भाषेत सगळ्या ' खबरा -धबरा ' कळल्या म्हणजे तिला बरे वाटे. आता ती नसली तरी आम्ही सगळे अजूनही तसेच एकत्र आहोत. आमच्या कुटुंबात येणाऱ्या जावई आणि सुनाही ह्यात छान सामील झाले आहेत . अजूनही आम्ही राखी पौर्णिमा फार उत्साहात साजरी करतो . त्यामुळे आमची पुढची पिढीही तशीच जवळ आहे.जी हा आम्हा सगळ्यांना कायमचं जोडून ठेवणारा समान धागा आहे. 

मुत्सद्देगिरी हा तिचा अजून एक गुण . कधी , कोणाशी काय आणि किती बोलायचे हे तिला ठाऊक होते . राजकारणात गेली असती तरी यशस्वी झाली असती .
ती काळजी करायची म्हणून आम्ही काही गोष्टी, जसे कोणाचे आजारपण, वगैरे तिला सांगायचो नाही  . पण ती वेगवेगळ्या लोकांना , निरनिराळे प्रश्न विचारून सगळी  माहिती एकत्र करून, तिचा स्वतःचा  Data Analytics  algorithm वापरून बरोबर आम्हाला पकडायची. फार हुशार होती ती !


लहानपणी मी फारशी तिच्या मर्जीतले नव्हते ,पण जसजशी मोठी होत गेले तश्या आम्ही जास्त जवळ येत गेलो . मला जाणवलं की काही बाबतीत मी तिच्यासारखीच आहे . तिची इच्छाशक्ती , निर्णयक्षमता , जोखीम घेणं , सतत काहीतरी उपक्रम करत राहणं ,  चिकाटी , स्वतःवरचा विश्वास थोडंफार काहीतरी माझ्यात आलं आहे .


आयुष्यात इतके सगळे अवघड प्रसंग येऊनही ती कधी हताश , निराश झाली नाही . ती ९० वर्षांची होऊन गेली . काही वर्ष तिची दृष्टी गेली होती . माणसांचे चेहेरेही दिसत नसत . पण ‘मला जगायचा कंटाळा आला’ असं ती कधीही म्हणाली नाही . तिने  स्वतःवर आणि जगण्यावर खूप मनापासून प्रेम केले. जुन्या आठवणींना मागे टाकून पुढचं जीवन आनंदात घालवलं .


कधीतरी माझ्या मनाला मरगळ आली , अवघड निर्णय घेताना अडखळायला झालं की मी फक्त जीला आठवते आणि माझी सगळी  ऊर्जा मला परत मिळते . दुर्गेचा अवतार धारण करून आयुष्यातल्या सगळ्या लढाया जिंकलेली ही माझी आजी माझी 'रोल मॉडेल 'आहे . तिचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच आणि तो कायम तसाच राहील ही खात्रीही!!


 


-वैशाली फाटक
सप्टेंबर २२,२०१७


 

३ टिप्पण्या: