एका
गावातला एक लहान मुलगा.
अगदी उत्सुकतेने जत्रेची वाट पाहायचा. गावात
वर्षातून एकदा भरणारी जत्रा. आई त्याला दरवर्षी घेऊन जात असे. तऱ्हतऱ्हेच्या खेळण्यांची दुकानं, पिपाण्या ,शिट्ट्या,
पिसांच्या टोप्या, बासऱ्या, रंगीत चष्मे, गलोल, चमकत्या तलवारी, गदा, गुलाबी रंगाचे
'बूढ़ी के बाल'. थोडंसं पुढे गेलं की की एक फोटो काढून मिळणारं दुकान. चांद्रयान, राजवाडा, दाट जंगल असे देखावे आणि त्याच्यासमोर
उभे राहून दोन मिनिटांत फोटो. आणि मग एक आरश्यांचे
दालन. आरश्यात बघितलं की कधी खूप उंच, कधी
जाड, कधी चित्रविचित्र चेहेरे दिसत. मुलाला ही
जत्रेतली गंमत दरवर्षी अनुभवायची असे. त्या वर्षीही तो असाच आईबरोबर जत्रेत
गेला. नेहमीप्रमाणे बारीक-सारीक खरेदी झाली. पिपाण्या,टीप -टीप वाजवून झाले. अजून थोडं पुढं गेलं की 'मेरी गो राऊंड
', चक्रातले पाळणे. आता पर्यंत तो कधीच चक्रात बसला नव्हता. थोडासा हट्ट करून त्याने
आईकडून पैसे घेतले आणि तिचा हात सोडून तो धावत सुटला.
स्वतःशीच गिरकी घेत गोलगोल फिरणाऱ्या
कपबश्या, मेरी -गो -राऊंडचे वर खाली होत पळणारे हत्ती घोडे, हळूहळू वाढत जाऊन आता चक्कर येईल की
काय असं वाटणारा वेग, चक्राचा पाळणा वर जाताना वाटणारी धडधड आणि उंचावरून खाली
येताना पोटात येणारा गोळा.
सगळं त्याला खूप खूप आवडलं होतं. किती मजा !!
एकामागून
एक फेऱ्या घेण्यात तो रमून गेला. किती वेळ गेला कुणास ठाऊक आणि अचानक त्याला आईची आठवण
झाली. आई कुठे गेली? आपण धावताना आईचा हात कधी सोडला तेच त्याला आठवेना. चक्रातून फिरताना आसपासच्या गर्दीत आई
कुठे दिसते का? लांबवर कुठे उभी आहे का? त्याची नजर शोधू लागली. पण वेग इतका जास्त
होता की नुसतेच रंग दिसत होते. तो कावरा बावरा झाला. कधी एकदा हे चक्र थांबतंय असं
झालं. पाळण्यातून उडी मारून लगोलग आईकडे धावावं असं वाटायला लागलं. दरवेळेस पाळणा खाली आला की त्याला वाटे
आता संपली चक्कर, पण परत वेग पकडून चक्र उंच जाऊ लागे. आता मात्र त्याला रडू यायला
लागलं. चक्रातून फिरण्याची सगळी मजाच निघून गेली.
फिरत्या कपबश्या, मेरी -गो-राऊंड, आवाज करणारी खेळणी .. काही काही नकोसं झालं.
त्याला फक्त आई हवी होती. फक्त
आई. मायेनं कुरवाळणारी, घट्ट हात धरून आधार देणारी. तिचं फक्त 'असणं'च त्याला त्या
क्षणी फार फार महत्त्वाचं होतं. फक्त तेवढंच महत्त्वाचं होतं...
परवा 'कविश्रेष्ठांच्या शब्दकळा' हा
ज्येष्ठ कवी -कवयित्रींच्या कवितांवरचा दृक श्राव्य कार्यक्रम पाहताना, ऐकताना माझीही
अवस्था त्या जत्रेतल्या मुलासारखीच झाली. मनाच्या
आत खोलवर जाणारे पं अभिषेकींचे " हे सुरांनो
चंद्र व्हा ","जिवलगा कधी रे येशील तू " अवीट गोडीचा आशा भोसलेंचा
आवाज आणि सुधीर फडक्यांच्या चेहेऱ्यावरचे कौतुक, हृदयनाथांचे "ती गेली तेव्हा
रिमझिम " ऐकताना घशात आलेला आवंढा, महानोरांची 'आई’ वरची कविता, कुसुमाग्रज, विंदा,
बा भ बोरकर, सुधीर मोघे, सुरेश भट, इंदिरा संत, रॉय किणीकर या सगळ्यांच्या काळजाला
हात घालणाऱ्या , अर्थवाही कविता आणि आशयघन शब्दांना सुरांचे कोंदण.
त्या
स्वरांबरोबर माझं मन नकळत भूतकाळात गेलं आणि मी स्वतःलाच विचारत राहिले, "कसा
सोडला आपण सुरांचा घट्ट पकडलेला हात ? शब्द -लय -ताल कुठे मागे सोडून आलो आपण
?"
Digital,
Automation, Robotics, 5G, Machine Learning, Future Skilling, Blockchain,
Virtual Reality …. सगळी लखलखती , मोहवणारी खेळणी . दरवर्षी नवीन जत्रा, नवीन खेळ.
आपण स्वतःलाच ओळखू शकणार नाही असे आकार आणि चेहेरे दाखवणारे आरसे, खोट्या चंद्रावरचे
विजयी मुद्रेचे फोटो, स्वतःचेच ढोल आणि पिपाण्या. आणखीनच वेगवान 'मेरी गो राऊंड ',
एकमेकांशी वेगाची स्पर्धा करणारे हत्ती -घोडे, दरवर्षी जास्तच मोठे , उंचचउंच होत जाणारे
चक्र ....
आणि या जत्रेत हरवलेली 'मी'...
सुरांचा,
तालाचा हात सुटला म्हणून सैरभैर झालेली ….
पुन्हा पुन्हा तो हरवलेला गाता गळा शोधू पाहणारी …. कवितांना, शब्दांना घट्ट धरून ठेवू
पाहणारी..
जत्रेच्या कोलाहलातून, आभासी दुनियेतून पुन्हा एकदा घराच्या अंगणात, तुळशी
वृंदावनाच्या कट्ट्यावर बसून ' मिराज़ -ए -गज़ल '
गुणगुणावेसे वाटणारी ....
आता
ते अंगणही नाही आणि ते तुळशीवृंदावनही.
पण…
पण
कपाटात कवितांची सगळी पुस्तकं
तशीच आहेत. आणि गाण्याची
जुनी डायरी आणि नोटेशन्सही. जुन्या कॅसेट्स खराब झाल्या तरी गाणी तशीच आहेत.
ते
शब्दही अजून तितकेच खरे आणि मनाला भिडणारे आहेत. ते काव्य अमर आहे. अक्षय आहे
जे
सगळे स्वर्गीय सूर आणि संगीत ऐकत मोठे झालो ते चिरंतन आहे.
ते
जसे आणि जिथे आहेत तिथे कायम आहेत, ठाम आहेत. कदाचित माझ्या नजरेपासून दूर गेले असतील
पण ते अजरामर आहेत.
आणि ते तिथे तसेच आहेत हे जाणवून माझं मन परत शांत, निश्चिन्त झालंय.
जत्रेतल्या
चक्राचा पाळणा ठराविक फेऱ्यांनंतर थांबला. मुलाने पटकन बाहेर उडी मारली आणि समोर बघतो
तर काय ... आई त्याची वाट बघत उभीच होती. तो धावत जाऊन तिला बिलगला. " कुठे गेली
होतीस मला सोडून ?" असं तिलाच विचारू लागला. आईनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला जवळ घेत नेहमीसारखीच समजूतदारपणे हसली. काहीही न बोलता .....
वैशाली फाटक
२७
एप्रिल, २०१९
अप्रतिम.. मी पण आता शोधते, मी काय सोडून आले आहे मागे, खेळण्यांच्या मोहात...
उत्तर द्याहटवाAprateem
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिलंय वैशाली
उत्तर द्याहटवाVery true Vaishali. Today only I was playing songs on gramophone, records like 'lavite me niranjan', 'jayostute' and many more made me feel like where are we today.
उत्तर द्याहटवावा फारच छान...
उत्तर द्याहटवाते असणार आहे चिरंतन....
गवसलं वाटताना निसटणारं
हरवले ते गवसून देणारं...
अक्षय आनंद देणारं....
काव्यही...जत्राही
खूप सुंदर लेख वैशाली. तुझ्या नवीन लिखाणाची नेहमीच उत्सुकता असते. असेच सुंदर आणि अधिकाधिक वाचनानुभव देत रहा
उत्तर द्याहटवामस्त ग . अगदी माझ्या मनातल्या गोष्टी वाचते आहे असं वाटलं. खरंच रोजच्या धावपळीत कितीक आवडीच्या गोष्टी राहून जातात मागेच. खूप छान शब्दबद्ध केलयस 👌👌
उत्तर द्याहटवाWhat a concept and very well written. Very thought provoking as well. Thanks for sharing. Getting a message from a childhood friend was a bit like finding mom when the wheel stops.
उत्तर द्याहटवाFor some reason I recall you singing "Asa Bebhan ha wara" to this date - there were two other songs as well
सुंदर लिहिले आहे. आता सापडले आहेच तर पुन्हा हरवू नका देऊ.
उत्तर द्याहटवाKhup sunder. Kharach vichar karnya saarkhe aahe....
उत्तर द्याहटवाWow Vaishali !! So so beautifully written !! I could visualise every detail like watching a painter paint a picture.
उत्तर द्याहटवाIAs a child I have often gone to Jatra with my mother, and although it was a powerful metaphor....your narrative brought back a part of my childhood . Thank you :)
अप्रतिम..
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिलंय वैशाली... हेच तर सत्य आहे... प्रत्येकाच्या आयुष्यात ही जत्रा असतेच... फक्त कुठे थांबायचं आणि पुन्हा राहिलेल्या जुन्या धाग्यांमध्ये परत फिरुन रमायचे हे जमले पाहिजे...आणि मला खात्री आहे तू पुन्हा एकदा गाणं सुरु करशील
उत्तर द्याहटवासुंदर लेख!, कृत्रिम, आभासी, धकाधकीच्या या जीवनात सूर, ताल, लय आणि संगीत नसतं तर? कल्पनाच करवत नाही! या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचे आपण कायम ऋणी आहोत! तुमच्या आवडत्या ताला सुरांची साथ तुम्हाला अखंड लाभो हीच सदिच्छा!
उत्तर द्याहटवाअप्रतिम ...किती सुंदर शब्दांमध्ये अगदी अचूक वर्णन केला आहेस
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख वैशाली. तू शाळेत गायलेली नाट्यगीते मला अजूनही आठवतात. तू लिहितेस छान आणि गातेस पण छानच.
उत्तर द्याहटवाशेवट वाचताना डोळे पाणावले...आई ही आई असते...म्हणतात ना...घार फिरते आकाशी...मूलं रमतात आपल्या विश्वात... पण आईचं लक्षं पिल्लांपाशीच...एका परीने संगीताला तुम्ही आई म्हणताय...किती चपखल उपमा आहे...मनाला शांतता, विसावा देणारी...वैतागलेल्या मनाला शांत करणारी...आई / सरस्वती / संगीत - गौतम (अमितचा मित्र)
उत्तर द्याहटवाशेवट वाचताना डोळे पाणावले...आई ही आई असते...म्हणतात ना...घार फिरते आकाशी...मूलं रमतात आपल्या विश्वात... पण आईचं लक्षं पिल्लांपाशीच...एका परीने संगीताला तुम्ही आई म्हणताय...किती चपखल उपमा आहे...मनाला शांतता, विसावा देणारी...वैतागलेल्या मनाला शांत करणारी...आई / सरस्वती / संगीत - गौतम (अमितचा मित्र)
उत्तर द्याहटवाफार सुंदर लिहिले आहे वैशाली, आता सुरांची साथ मुळीच सोडू नकोस
उत्तर द्याहटवानेहेमी प्रमाणेच सुंदर आणि हृदयस्पर्शी लेख. पु.लं.चं व्यक्ती आणि वल्ली मधलं वाक्य आठवलं... "पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल".
उत्तर द्याहटवावैशाली,
उत्तर द्याहटवाखूप छान.
Vaishali khoop chhan lihila aahes..
उत्तर द्याहटवा