शनिवार, १८ जुलै, २०२०

आठवणीतल्या गोष्टी - दप्तर


           काही दिवसांपूर्वी एका मीटिंगसाठी ऑफिसला जायची वेळ आली . १७ मार्च पासून पूर्ण वेळ घरीच काम चालू होते . आता जवळपास अडीच तीन महिन्यांनी ऑफिसला जाताना शाळेचा पहिला दिवस आठवला.

पावसाची भुरभूर चालू होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नाही. पण खूप दिवसांनी रोजचा रस्ता पाहिला आणि एखादा जुना सवंगडी भेटल्यासारखे वाटले. काही दिवसांसाठी आई घरी राहायला आली असल्याने तिने डबा करून आणि भरून पण दिला होताबरोबर पाण्याची बाटली. आदल्या दिवशी रात्री इस्त्रीचे कपडे बाजूला काढून ठेवले होते , ऑफिसचा टॅग शोधून ठेवला होता , इतके दिवस बाजूला ठेवलेली लॅपटॉप बॅग पुसून  एकदम चकाचक करून ठेवली होती. मला एकदम "नॉस्टॅल्जीक " वाटायला लागलं आणि शाळेतल्या दिवसांच्या एकेक आठवणी जाग्या झाल्या .
         'दप्तर' ही अशी एक गोष्टं होती की  जी शाळेत जायला लागल्यावरच मिळायची. छोट्या गटात फक्त डब्याची पिशवी असायची. प्राथमिक शाळेपासून दप्तर. लहान आकाराचं , साधारण पाटी आणि - वह्या -पुस्तकं मावतील असं तपकिरी , निळं , करड्या किंवा अश्याच ठराविक मळखाऊ रंगाचं दप्तर. चपटा डबा किंवा कंपास पेटी ठेवायला बाहेर एक कप्पा आणि फुटपट्टी ठेवण्यासाठी खाली एक आडवा कप्पा. मला त्या कप्प्याचे फार आकर्षण होते . मी शंभरदा तरी ती लाकडाची   पट्टी ठेवायचे - काढायचे.  फारच भारी दप्तर असेल तर नावाची चिठ्ठी अडकवायला एक छोटा प्लास्टिकचा कप्पा असे आणि ज्याच्याकडे असे दप्तर असेल तो फारच भाव खायचा.
       मी 'जिजामाता बालक मंदिर ' या छान छोट्या प्राथमिक शाळेत होते. भरत नाट्य मंदिरासमोर डॉ ढमढेऱ्यांच्या वाड्यात शाळा भरायची. बसायला सतरंजीच्या लांबच लांब पट्ट्या घातलेल्या असत. दिवसभर बहुधा मांडीवर किंवा पुढ्यात दप्तर ठेवायचो.  
           पुढे पाचवीत मोठ्या शाळेत गेल्यावर मोठे खाकी रंगाचे दणकट दप्तर आणले. एकदा आणले की ४ वर्ष तरी टिकावे ही अपेक्षा. हातात धरायचे किंवा खांद्यावर अडकवायचे.   दप्तराच्या वजनानुसार पट्ट्याची लांबी कमी जास्त करणे हा एक उद्योग असे. पुढे मग सायकल वापरायला लागल्यावर कॅरियरला दप्तर लावायचे आणि अधून मधून  हात मागे लावून दप्तर जागेवर आहे ना ते पाहायचे. मग पाठीवर मागच्या बाजूला लावायची पण दप्तरे मिळायला लागली. काही काही मुली शाईने दप्तरावर नाव घालत . त्या कापडावर शाई फुटत असल्याने बरेचदा ती अक्षरे मोठी व्हायची

Aluminum school box...used to have this in school...for a brief ...काही मुलींकडे अलुमिनियमच्या पेट्या असत. एकदम स्मार्ट. त्याचा चकचकीतपणा मोहवून टाकी पण त्या एका हातात धराव्या लागतात मग जड होतात त्यापेक्षा आपले दप्तरच बरे अशी आम्ही स्वतःची समजूत घालत असू .


         रोज सकाळी किंवा रात्री दप्तर भरणे का एक कार्यक्रम असे. टाईम टेबल प्रमाणे वह्या -पुस्तके काढणे- ठेवणे, मग इतर मालिकेच्या वह्या, स्वाध्यायच्या वह्या, किंवा व्यवसायमाला, शिवणाचे साहित्य, रंगपेटी, ब्रश अश्या बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवून भराव्या लागत. एखादी महत्वाची गोष्ट घरी विसरली की उगाच बाईंचे बोलणे खावे लागे. ज्या मुलींची घरं जवळ असत त्या पटकन मधल्या सुट्टीत घरून काही विसरले तर घेऊन येत. शाळेची सगळी वर्षं टाकीच्या नळाचे पाणी ओंजळ करून प्यायचो त्यामुळे 'टिफिन बॅग, वॉटर बॅग' असं काही नसायचं. दप्तराच्या बाहेरच्या कप्प्यात डबा. रस भाजी असेल तर कागदात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत. असा सगळा सुटसुटीत मामला होता.
         काही मुली दप्तर भरण्याच्या बाबतीत पण एकदम शिस्तशीर होत्या. तासानुसार एका बाजूला पुस्तके, मध्ये पुठ्ठा, दुसरीकडे त्याच क्रमाने वहया. तास संपला की ती पुस्तके खाली जाऊन पुढची पुस्तके वर येत. असं दप्तर भरायचा माझा उत्साह काही महिने टिके. पण माझ्या एका मोठ्या भावाने तर मला या बाबतीत फारच अगाध ज्ञान दिले. माझं दप्तर बघून तो म्हणाला, " तू एवढी जड पुस्तकं कशाला नेतेस ? मी तर जो धडा चालू आहे तेवढीच पुस्तकाची पानं घेऊन जातो!!"
       पण माझ्या दप्तरात तर वह्या पुस्तकांशिवाय इतरही खूप गंमती जंमती असत. मला रंगीबेरंगी पिसं जमवायचा छंद होता. माझी पिसं ठेवायची एक खास वही होती. दर - पानांआड एक एक रंगीत पीस ठेवलं होतं. इतर मुली पण त्यांची पिसं आणत. मग मधल्या सुट्टीत पिसांची देवाण घेवाण चाले. मोठ्या पिसाजवळ लहान पीस असेल किंवा दोन रंगांचे पीस असेल तर त्याची किंमत (value) फारच जास्त असे.
         बादशाहीच्या बोळात एका बकुळीच्या झाडाखाली छान सडा पडायचा, मग ती फुलं वेचून ठेवायला छोटीशी डबी. पुढे कधीतरी काड्यापेट्यांवरची चित्रं जमवायचा छंद लागला, मग त्याची एक बॉक्स. जाळी पडलेली पानं, गुलाबाच्या पाकळ्या , शेवरीची म्हातारी ,मोरपिसं , अभ्रकाचे पातळ पापुद्रे असा किती तरी खजिना दप्तरात सामावला असे. दप्तर म्हणजे आनंदाचं एक भांडारच होतं. तेव्हा घरात प्रत्येकाला स्वतंत्र खोली, कपाट असं काही नसायचं मग बरीचशी स्वतःची ' space ' त्या दप्तरातच मिळत असावी का?
            दुपारच्या शाळेत( म्हणजे ८वी ते १०वी ) गेल्यावर मुलींना शिंगं फुटतात असं बहुतेक सगळ्या शिक्षकांचं मत असे.त्याची एक खूण म्हणजे खाकी दप्तरापासून फारकत . शिवणाच्या वर्गात क्रॉस स्टिचने मोठ्या पिशवीवर भरतकाम  करायचे असे . मग सुट्टीत आईकडून लांब पट्ट्याची ती पिशवी शिवून घेतली की मग तीच दप्तर म्हणून वापरायला सुरुवात. तो पर्यंत,शुभदा, माझी मोठी बहीण कॉलेजला जायला लागल्याने रंगीबेरंगी, आरसे लावलेल्या, वेगवेगळ्या कापडाच्या 'शबनम' पिशव्यांशी पण ओळख झाली. इतके दिवस ठराविक कप्प्यांमध्ये शिस्तशीर बसवलेलं दप्तर शबनममध्ये एकदम मोकळं ढाकळं झालं. त्या अर्धवट वयातल्या विद्रोहाचीच तर निशाणी नव्हती नां ती ? 
         शाळा संपली , कॉलेज सुरू झालं .. संपलं . T square, drafter, drawing sheets ,journals .. दरवर्षी दप्तराचे आकार आणि प्रकार बदलत गेले पण जवळीक संपली नाही. आणि आता इतकी वर्षं नोकरी करतेय पण अजूनही मी 'लॅपटॉप बॅग' म्हणण्यापेक्षा 'माझं दप्तर ' असंच म्हणते. फक्त आता त्याच्यात अजून एका मोठ्या पर्सची भर पडली आहे. हे माझं दप्तर आणि पोतडी अजूनही प्रत्येक कप्प्यात खूप सारा खजिना बाळगून असतात पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी ..

आता उद्या दप्तरातले इतर सोबती.. 

४७ टिप्पण्या:

  1. झक्कास... लहानपणीच्या आठवणी

    आठवणीतलं दप्तर, लक्ष्जीमीरोडवर राजीवडेकरांकडून घेतलेलं... मित्रांचं पाहून बदलून आणलेलं...असंच काही रेनकोटबाबतीतही

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान वैशाली, शाळेचे दिवस डोळ्यासमोर आले. आमच्या गावी दप्तर नाही मिळायचे, एखादी कापडी पिशवी हेच आमचे दप्तर असायचे. वडिलांनी माझ्यासाठी औरंगाबाद वरून अल्युमिनियमची पेटी आणली ती खराब होईल म्हणून कधी शाळेत नाही नेली, ती अजून आहे माझ्याकडे. त्यावेळी अगदी छोट्या छोट्या गोष्टीच अप्रूप असायचं

    उत्तर द्याहटवा
  3. वैशाली छान लिहिले आहे. शाळेतल्या आठवणी छान जागवल्यास.मस्त अनुभव.

    उत्तर द्याहटवा
  4. Thank you Vaishali Mam for this article. It took me down the memory lane. ते जे aluminum चा दप्तर आहे ते मला सुद्धा शाळेत असताना घ्यायचं होतं. दत्त मंदिर च्या जवळ, महाराष्ट्र tea depot shop आहे, त्याचा समोरच्या एका दुकानात मिळायचे. मला प्रत्येक वर्षी daddy म्हणायचे आपण पुढच्या वर्षी घेऊ. आणि दुकानदाराला पण म्हणायचे आम्ही येऊ घ्यायला. अस करत कधीच नाही मिळाल मला ते दप्तर. मोठा झाल्यावर daddy ni सांगितले की अरे त्या aluminum च्या दप्तरा वर पैसे खर्च नव्हतो करू शकत आपण.....बालपणीच्या आठवणी मध्ये आज रमून गेलो...

    खूप छान!!!!

    उत्तर द्याहटवा
  5. वैशाली,
    खूप छान लिहिले आहेस.
    शब्दामधून चित्र उभे रहात गेले.
    वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद तुझ्या शब्दामध्ये आहे.
    भाषा पण ओघवती आहे.
    खूप कौतुक तुझे.

    बाकी चे ब्लाँग्स पण नंतर वाचीन.

    उत्तर द्याहटवा
  6. वैशाली,
    खूप छान लिहिले आहेस.
    शब्दामधून चित्र उभे रहात गेले.
    वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद तुझ्या शब्दामध्ये आहे.
    भाषा पण ओघवती आहे.
    खूप कौतुक तुझे.

    बाकी चे ब्लाँग्स पण नंतर वाचीन.

    उत्तर द्याहटवा
  7. मस्त लेख, वैशाली. नेहेमीप्रमाणेच सहज, सुंदर. अल्युमिनियम ची पेटी पावसाळ्यात भाव खाऊन जायची, शिवाय वर्गातल्या मारामाऱ्यात तिचा प्रभावी शस्त्र किंवा संरक्षण म्हणून उपयोग व्हायचा. कमकुवत शत्रू युद्ध संपल्यावर पाणी प्यायच्या सुट्टीत खाकी दप्तरावर शाई टाकून बदला घ्यायचे, त्यापासून ही संरक्षण मिळायचे. 😀

    उत्तर द्याहटवा
  8. खूप सुंदर लिहलं आहेस वैशाली,भाषा खूप छान आहे .मन लहानपणीच्या रम्य काळात गेलं, माझीही अशी स्टील ची बॅग होती, केवढ कौतुक असायचं त्याच त्या वेळी.

    उत्तर द्याहटवा
  9. खूप छान वैशाली, ओघवती भाषा आणि लिहिण्याची शैलीही... आठवणींचा खजिनाच जागा झाला....

    उत्तर द्याहटवा
  10. वाह, सुंदर लेख! माझ्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. खरचं दप्तर ही प्रत्येकाची खास स्वतःची स्पेस असायची. छोट्या छोट्या गोष्टीत अपार आनंद असायचा. आज तो हरवल्याची खंत वाटते! असो, पुढील लेखाची वाट पहात आहे! लवकरच येऊ द्या! 😊👍🏻

    उत्तर द्याहटवा
  11. Beautifully written, Vaishali, as you always do. Reminded me of my childhood days, a long time ago. Please keep sending.I wish you would publish a book of all that you write.

    उत्तर द्याहटवा
  12. वैशाली एकदम शाळेत घेऊन गेलीस....and this was the height of deja Vu...
    कॅरियरला दप्तर लावायचे आणि अधून मधून  हात मागे लावून दप्तर जागेवर आहे ना ते पाहायचे

    उत्तर द्याहटवा
  13. साध्या गोष्टींशी निगडीत किती सुंदर आठवणी असतात याचा प्रत्यय आला. माझी दप्तर खरेदी व त्याची दुरुस्ती मंडईचा मागे नेहरू चौकातल्या दुकानात असायची. कॅनव्हासची अच्छादने व दणकट कॅनव्हास पिशव्या हा त्या दुकानांचा मुख्य व्यवसाय. दप्तरं हा तसा त्यांचा संलग्न व्यवसाय.

    उत्तर द्याहटवा
  14. खूप मस्त लिहिले आहे. शुद्ध मराठी (काना, मात्रा, ऱ्हस्व उकार, दीर्घ उकार, शिरोबिंदू इत्यादी). आजकालच्या मराठी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा शुद्ध मराठी वाचायला मिळणार नाही. "दप्तर" चा प्रवास, त्यातले बारकावे हे नक्कीच सर्वांनी अनुभवले असेल.

    आतुरतेने वाट पहात आहे "आता उद्या दप्तरातले इतर सोबती"

    उत्तर द्याहटवा
  15. मनापासून धन्यवाद !!! अजूनही जयंती, योगेश पाध्ये यांनी पेटीजपून ठेवली आहे हे वाचून आणि फोटो बघून मजा आली.

    उत्तर द्याहटवा
  16. फारच सुंदर लेख. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माझी पेटी आजही वापरात आहे, त्या वेळच्या स्टिकर्स सकट 🙂ं आता मोटरसायकलवरून ॲाफिसला जाताना दप्तर जागेवर आहेना बघताना या लेखाची नक्की आठवण येणार. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  17. खूप छान वैशाली! शाळेतले दिवस आठवले खरंच

    उत्तर द्याहटवा
  18. खूप सुंदर...अगदी सगळ डोळ्यासमोर आलं....शाळेत अल्युमीनियम ची पेटी घेण्याची खूप इच्छा होती..पण माझ्या घाबरट पणामुळे मी ती घालवली...पाहुण्या समोर नाव सांगायला घाबरले आणि आता पेटी मिळणार नाही असे वडिलांनी सुनावले
    .
    नंतर गुपचूप मैत्रिणी कडून एक दिवसासाठी उसनी घेतली होती.पण वडिलांना समजताच परत नेऊन दिली...एक मनात खंत राहिली...

    उत्तर द्याहटवा
  19. खूपच छान लेख लिहिला आहे मॅडम जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि खरोखरच समोर जुने चित्र तयार होते खूपच आनंद झाला तुमचा हा लेख वाचून असेच छान छान लेख लिहिण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !💐👍🏻

    उत्तर द्याहटवा
  20. खूप छान होते ते दिवस ... साधेसुधे ... छोट्या छोट्या आनंदांचे

    उत्तर द्याहटवा
  21. अप्रतिम लिहिलं आहेस वैशाली. प्रत्येक प्रसंगातून जे बारकावे टिपलेत ते एकदम लाजवाब. थेट भूतकाळात, शाळेत नेऊन ठेवलेस मन. आणि काय सांगू...परीक्षा पण आठवली आणि पोटात सुपरिचित गोळा पण आला. बॅक टू द फ्युचर सिनेमा सारखं कधीही भूतकाळात डोकवायची सोया झाली तर काय बहार येईल ना...तुझ्या लिखाणात पण तिच ताकद आहे.
    अशीच लिहीत राहा. मनःपूर्वक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  22. Wow.... khoopach sundar..
    Kharech....parat shalet gelya sarkhe vatale...
    Ani ho to aluminium chi peti tar kharech shaan hoti...malahi Nahi milali kadhi ti.

    Saglyat mast tar to short cut....
    Je lesson asel tevdhich pages fadun gheun jaychi...... hahaha ...lol

    Junya athvni jagya zalya...
    Thanks for sharing....

    Shamli.

    उत्तर द्याहटवा
  23. खूप मस्त लिहिलं आहेस !! आता सुद्धा laptop bag म्हणजे आपलं एक विश्व असतं . Lockdown नंतर बिचारी कोपऱ्यात पडून असते . काहीतरी शोधायला मध्ये उघडली आणि त्यातल्या वस्तू पाहून खूप homely वाटलं !

    उत्तर द्याहटवा
  24. सुंदर लेख वैशाली.

    विशेषतः तो एक असा काळ होता जेंव्हा वस्तूंची रेलचेल नव्हती. काही आर्थिक कारणांनी आणि काही सामाजिक प्रथामुले, किमान खर्चात सर्व चालायचं.
    तुझा लेख त्या सर्व गोष्टींची आठवण देतो. त्यामुळे आम्हाला तो लेख खूपच छान वाटला.

    (कदाचित नव्या मुलांना ह्यात तितकी गम्मत जाणवणार नाही)

    मस्त लिहलय. चालू राहू दे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वैशाली... सहज सुंदर लिहिले आहेस.तझे निरीक्षण जबरदस्त आहे.वाचताना वाटले ' अरे आपलं तुटलं same आहे.... अशीच लिहित रहा... खूप खूप शुभेच्छा

      हटवा
  25. खूप छान. शाळेतल्या आठवणी म्हणजे सगळ्यांच्या खूप जवळच्या असतात. नवीन वही पुस्तकांचा सुगंध,नवीन दप्तर, डब्बा,बाटली किती उत्सुकता असायची सगळ्याची. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या .

    उत्तर द्याहटवा
  26. Great blog! Brought back memories of my own red “daptar “ with two big pockets in the front that could be worn on my back..

    उत्तर द्याहटवा
  27. वैशाली
    मला तुझा लेख वाचून माझी शाळा आठवली
    जीवन शिक्षण विद्या मंदिर मराठी मुलांची शाळा, पाथर्डी जिल्हा अहमदनगर ही माझी चौथीपर्यंत शाळा होती आम्ही दर बुधवारच्या दुपारी शेण गोळा करत गुरुवारी शेणाने शाळा सारवत असू. पुढे माध्यमिक शाळेत श्री तिलोक जैन विद्यालयात प्रवेश घेतला व बाकावर बसायला मिळाले. शेणाने शाळा सारवणे थांबले.
    तुझ्या रंगबिरंगी पिसा सारखं मला पोष्टाचे स्टॅम्पस आणि सिनेमा च्या नावाचे स्टिकर्स जमा करण्याचा छंद होता आणि शाळेच्या दप्तरात ते हमखास असायचं
    दप्तरासाठी कापडी पिशवी आणि नंतर वायरची व रेक्झिन ची पॉकेट वाली बॅग आजही आठवत आहे
    असो तुझ्या आठवणी भन्नाट आहेत
    मला माझ्या शाळेत त्या घेऊन गेल्या
    छान लिहिले आहेस
    चालू ठेव लिहिणं असच

    उत्तर द्याहटवा
  28. खूप छान. वैशाली तुझी स्मरणशक्ती जोरदार आहे. सगळे बारकावे छान टिपलेयस. 👌🏼

    उत्तर द्याहटवा
  29. Khup chan lihilay... kharach lahan pani chi aathwan aali...thanks for sharing...

    उत्तर द्याहटवा
  30. Very Nice Vaishali. Remembered all old days.."Balpan.dega Deva".. No one cam take the place of the" Daptar "
    👌👌

    उत्तर द्याहटवा
  31. Aluminum chya petichya atlya surface war stickers lawaycho te athawala ekdum. Khup chhan lihila ahes Vaishali.

    उत्तर द्याहटवा
  32. खूप छान वैशाली,
    शाळेचे दिवस आणि त्यावेळच्या भरपूर आठवणी जाग्या केल्यास. लिहीत रहा आणि आम्हाला पुन्हा बालपणात घेऊन जा.👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  33. वा वैशाली... शाळेतले सोनेरी दिवस परत नव्याने जगल्यासारखं वाटलं... तुझं लेखन पण अगदी सहज सुंदर असतं..

    उत्तर द्याहटवा
  34. Vaishali it is really well expressed and described. Your writing style is simple and touches heart...keep writing...proud to have such good school friend.

    उत्तर द्याहटवा
  35. वैशाली, नेहमीप्राणेच सहज सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिलं आहेस. एकदम शालेय जीवन डोळ्यासमोरून भर्रकन गेलं. तुझे लेख वाचणं आनंददायी असतं. असेच लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा
  36. Very nicely articulated... it took me in flashback in my childhood... I too used to have an Aluminum peti.. a pride-possession during those day :-)....
    Enjoy reading your posts & looking fwd for more such write-ups reflecting on life realities.

    उत्तर द्याहटवा
  37. Khup chan lihila aahes. Athawani tajya zalya. Mala nehemi chan daptar milale ani aluminum peti pan. Aata tyat mechanical stuff thewale aahe. Mazi mulagi ti peti bhaghun aashcharya chakit zali ki asa pan shalet net asat ka.
    By the way, thank you for taking us back in childhood

    उत्तर द्याहटवा
  38. खूप छान लिहिलं आहेस....शाळेच्या दिवसात घेऊन गेलीस...पुढच्या भागाची वाट पाहात आहे...

    उत्तर द्याहटवा
  39. फारच सुरेख वैशाली! शाळेतल्या दप्तराची आठवण करून दिलीस..माझ्या वडिलांना कोणीतरी अलयुमिनियमची पेटी दिली होती...ती मला मिळाली होती.

    उत्तर द्याहटवा