मंगळवार, २१ जुलै, २०२०

आठवणीतल्या गोष्टी - पुस्तके आणि वह्या


३० एप्रिलला वार्षिक परिक्षेचा निकाल लागला की एक महत्त्वाचं काम असायचं ते म्हणजे अभ्यासाच्या वह्या - पुस्तकांचे कपाट आवरणे. आई अधून मधून आठवण करून द्यायची पण काम पुढे ढकलण्यासाठी निकालाचे नुसते निमित्त. मग एकदाचे सगळे कपाट काढून जुन्या क्रमिक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ठेवायचे. शाळेत किंवा इतर कोणाला हवी असतील तर तिथे ते गठ्ठे नेऊन पोचवायचे. इतर व्यवसायमाला, शाळेच्या प्रश्न मालिका वगैरे धाकट्या भावंडांसाठी नीट बाजूला ठेवून द्यायच्या. पुस्तके आवरून झाली की वह्यांकडे मोर्चा.


Gift Idea: Homemade Journals | Homemade journal, Diy book, Diy journal
           जुन्या वह्यांमधले कोरे कागद काढून त्याच्या वह्या बनवणे हा एक आवडीचा उद्योग असे. दर वर्षी बाबा माझ्याकडून आणि शुभदाकडून अतिशय सुबक आणि नेटकेपणाने या वह्या बनवून घेत. आधी कागद नीट लावून घायचे, दोन्ही बाजूंनी समान अंतरावर भोकं पाडून, पुढे-मागे जाड दोऱ्याने व्यवस्थित शिवून,पक्की गाठ मारून, उरलेला दोरा नीट कापून मग त्यावर एक छोटी चिकटपट्टी चिकटवायची. कव्हरवर एखादे चित्र काढायचं किंवा जुन्या निमंत्रण पत्रिकांवरची चित्रं लावून कोलाज करायचा. 'Reduce, Reuse, Recycle' अशी 'Sustainability' ची सूत्रं अशी घरीच हातोहात शिकायला मिळत होती .
           पुढे मग कधीतरी शाळेजवळ एक बाइंडिंगचे दुकान आहे, तिथे कागद दिले की - दिवसांत  वह्या करून मिळतात असं कळलं. पण त्या वह्यांना घरी केलेल्या वह्यांची सर नव्हती. एकतर चारी बाजूनी कागद कापून त्यांचा आकार छोटा व्हायचा. दिलेल्या सगळ्या पानांच्या मजबूत दोन तीनच  जाड जाड वह्या तयार व्हायच्या. लाल किंवा निळे रेक्झिन आणि पुढे -मागे पुठ्ठा. त्याला लावलेली खळ किंवा डिंक याचा असा काही भयंकर वास यायचा की वही हातात सुद्धा धरवत नसे आणि एकदम जाड असल्याने पान दुमडून लिहिणं पण कठीण. मग आम्ही आमचा घरी वह्या बनवायचा कुटीरोद्योगच चालू ठेवला.
           सुट्टीतल्या अभ्यासाची वही म्हणजे एक गंमतच होती. मी तिसरी -चौथीत असताना बाबा मला रोज सकाळी शुद्धलेखन द्यायचे. साधारण दहा ओळी  लिहून त्यांना दाखवायच्या. हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाला ते मला दहापैकी एक,दीड , दोन असे मार्क देत असत . १०-१२ दिवसांत गाडी साडेतीन मार्कांपर्यंत गेलीआणि या गतीने आपल्याला - मार्क कधी मिळणार? ह्यात काही अर्थ नाही असं स्वतःच ठरवून मी ती वही बंद करून टाकली.
           मे महिना संपत आला की नवीन पुस्तकांचे वेध लागायचे. टिळक रोडवरचं 'आनंद पुस्तक मंदिर ' म्हणजे आमचं हक्काचं पुस्तकांचं दुकान. मध्येच कधीतरी टिळक रोडवर गेलं की दुकानात चक्कर मारून यायची. " काका , आली  का हो पुस्तकं?". दरवर्षी एखादं पुस्तक तरी उशीरा छापून यायचं. मग ते सांगायचे, "पुढच्या आठवड्यात या". पाऊस सुरू व्हायच्या आत पुस्तकं खरेदीची गडबड. त्या वेळेस मला तासनतास त्या दुकानात थांबावंसं वाटायचं. नवीन पुस्तकांचा तो वास. आजही त्याची आठवण आली की अंगात वेगळाच उत्साह संचारतो.  दुकानात जिकडेतिकडे वह्या -पुस्तकांचे गठ्ठेच गठ्ठे. इयत्तेप्रमाणे, विषयाप्रमाणे पुस्तकं, शिवाय नकाशाचे कागद, आलेखनाचे कागद. वह्यांचे पण किती प्रकार. एक रेघी, दु रेघी, पाचवीत इंग्रजीसाठी चार रेघी, शिवणासाठी पानांवर चौकोन असलेली, कधी फुलस्केप, मुख्य विषयांना २०० पानी, बाकी १०० पानी, चित्रकलेची वेगळी आणि एक मोठी रफ वही अशी वह्यांची पण यादी असायची. वह्या घ्यायला वेळ लागायचा कारण वहीवरची चित्रं बघून, आतली पानं बघून मग खरेदी. मुलांपेक्षा जास्त उत्साहात काका आणि दुकानातली इतर माणसं प्रत्येकाची मागणी पुरवत असत. त्यांची ती धांदल बघून आपण काही दिवस या दुकानात काम करून त्यांना मदत करावी असं मला दर वर्षी वाटत असे.
           खरेदी करून घरी येतानाचा आनंद अवर्णनीय!! आधी मी मराठी आणि इतिहासाचं पुस्तक उघडून बघायचे. कधी कधी गुळगुळीत पानांवर तर कधी साधी चित्रं असायची. मला चित्रकाराचे नाव आठवत नाहीये, google करायचा प्रयत्न केला, पण नदीचे दोन्ही  हिरवेगार काठ, त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब ह्याचं इतकं सुंदर चित्रं मराठीच्या एका पुस्तकात होतं, अजूनही ते माझ्या डोळ्यासमोर आहे. एक्सप्रेसवेच्या आधी एक नदीवरचा पूल लागतो तेव्हा हमखास ते चित्रं मला आठवतं. सगळी चित्रं, नकाशे बघून झाले की मग  बाकीची पुस्तकं चाळून आतली पानं वगैरे व्यवस्थित आहेत ना बघायचं
Blank Diary notebook graffiti 30 sheets Sketch Book kraft cover ...
आता पुढचा  कार्यक्रम म्हणजे पुस्तकांना कव्हर्स घालणे (तेव्हा आम्ही कव्हरं म्हणायचो). मोठी सतरंजी घालून सगळ्यांची पुस्तकं बाहेर काढायची. गुळगुळीत, फ्रेश रंगाचा ब्राऊन पेपर घेऊन, मग एकंदरीत पुस्तकांच्या हिशोबाने त्याचे मोठे तुकडे करणं, बाजूचे त्रिकोण कापून घड्या दुमडणं, नावासाठी लेबल चिकटवणं…. गप्पांच्या नादात काम कधी संपायचं ते कळायचेही नाही. मग प्रत्येक विषयाच्या वह्या. कधीतरी मी ४०० पानी वही आणून, वरच्या समासात खाचा करून, त्यावर विषयांची नावं घालून , एकच वही ४ विषयांसाठी वापरली होती. माझा मामेभाऊ हेमंत कॉम्पुटर फॉन्टला लाजवेल इतक्या सुंदर अक्षरात सगळ्या वह्यापुस्तकांवर नावं घालून द्यायचा. अशी सगळी तयारी झाली की प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मग दप्तरात ठेवायची म्हणजे छत्री / रेनकोटमधून दप्तर भिजले तरी पुस्तकं भिजायला नकोत. नंतर प्लास्टिकची कव्हर्स पण मिळायला लागली. नुसतं पुस्तक खोचलं की  काम झालं पण ती काही मला फार भावली नाहीत. 
           शाळेच्या पुस्तकांशिवाय आमच्या घरी इतरही खूप पुस्तकं होती. रद्दी विकून जे काही पैसे येतील त्याची पुस्तकं आणायची हे ठरलेलं . शिवाय भेट मिळालेली, स्पर्धेची बक्षिसं म्हणून मिळालेली, काही बाबांच्या वेळची जुनी अशी सगळी पुस्तकं आम्ही त्यांच्या उंची आणि जाडीप्रमाणे लाकडी स्टॅण्डवर लावून ठेवली होती. एक वर्ष सुट्टीत त्यांना कव्हर्स घालायची टूम काढली. बाबांनी एकदम जाड ब्राऊन पेपर आणून दिला. इतका मजबूत की आज ३५-४० वर्षांनंतरही त्यातली अनेक पुस्तकं व्यवस्थित कव्हर्ससहित माझ्या कपाटात आहेत.
           सोनियाच्या निमित्ताने शाळेची ही खरेदी पुन्हा एकदा अनुभवता आली. अजूनही मे -जून मध्ये अप्पा बळवंत चौकात गेलं की वह्यांच्या स्टॉलला भेट देऊन चांगल्या डझनभर वह्या घ्यायचा मला मोह होतो. आता घरात खूप पुस्तकं झाली आहेत. काही दिवस तरी नवीन घायची नाहीत असं ठरवलं तरी ऑफिसमध्ये पुस्तक प्रदर्शन लागलं की राहवत नाही. नवीन पुस्तक घेऊन त्यावर नाव, तारीख घालताना मला तितकाच आनंद होतो.  
           मायक्रोसॉफ्ट ऑफिस, स्मार्ट फोन असे सगळे स्वीय सचिव हाताशी असूनही माझी भिस्त अजूनही माझ्या वहीवरच आहे. रोजची कामं, मीटिंग्सच्या नोट्स, वैयक्तिक महत्त्वाच्या नोंदी अशा सगळ्या माझ्या वेगवेगळ्या वह्या आहेत. कधीतरी ड्रॉवर आवरताना जुन्या वह्या सापडतात. वाचताना मजा येते. त्या फाडून मी परत दुसऱ्या वह्या ठेवायला जागा करते. ह्या-पुस्तकांचं कपाट आवरायचा माझा उद्योग बहुधा माझ्याबरोबरच थांबेल असं वाटतंय . 

p.c. Google

२५ टिप्पण्या:

  1. अगदी तंतोतंत जुन्या आमच्या पण आठवणी, मस्त लिहलं आहेस

    उत्तर द्याहटवा
  2. नवीन पुस्तक घेऊन त्यावर नाव, तारीख घालताना मला तितकाच आनंद होतो.

    झक्कास !

    आमच्या पुस्तकांना माझ्या मामाच्या brail typing करुन झालेल्या कागदांचे कव्हर असायचे... 😊

    अजुनही काही कागद आहेत माझ्याकडे..

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान लिहिलं आहेस वैशाली, keep writing

    उत्तर द्याहटवा
  4. मस्तं , परत जगतोय ते दिवस . आणि नवीन पुस्तकांची पानं चिकटलेली असायची , ती पट्टीने फाडायची. अशा खूप आठवणी

    उत्तर द्याहटवा
  5. वैशाली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला .बाबा पण आमच्या जुन्या वह्यांतल्या उरलेल्या कागदांच्या वह्या बाईंड करुन आणायचे व त्या घरच्या अभ्यासाला वापरायच्या.मला पण कोर्या वह्या पुस्तकांचा वास भयंकर आवडतो

    उत्तर द्याहटवा
  6. वह्या पुस्तकं... कवर्स ...वर नावाचे स्टिकर्स

    आठवणी.... उजाळा...चला शाळेत परत

    छान लिखाण

    उत्तर द्याहटवा
  7. Reduce, reuse, recycle हे लहानपणी मनात इतके ठसले गेले आहे की त्याचा उपयोग अजूनही होत आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. वैशाली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला .बाबा पण आमच्या जुन्या वह्यांतल्या उरलेल्या कागदांच्या वह्या बाईंड करुन आणायचे व त्या घरच्या अभ्यासाला वापरायच्या.मला पण कोर्या वह्या पुस्तकांचा वास भयंकर आवडतो.
    वीणा मुळे

    उत्तर द्याहटवा
  9. फारच छान लिहिलं आहेस वैशाली.

    उत्तर द्याहटवा
  10. Vaishali- Excellent Description of Enthusiastic Process of Note Books with Covers, that reminded everyone of old Schoolig Days.
    Congrats & Keep Writing.����

    उत्तर द्याहटवा
  11. उत्कृ्टरित्या लिहिलेला लेख ... अजूनही जेंव्हा मी माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नवीन वह्या पुस्तकांना कव्हर घालायला मदत करतो, तेंव्हा नकळत बालपणीच्या आठवणी त्यांना शेअर करतो...रम्य ते बालपण!

    Perhaps our generation had altogether different childhood ... Lesser resources/gadgets but many more friends and free time to play with them !

    Thanks for sharing.... Please keep writing

    Milind

    उत्तर द्याहटवा
  12. वैशाली किती छान वाटलं वाचून,पुन्हा एकदा त्या काळात जाऊन आले,फार छान लिहिलं आहेस,नेहमीप्रमाणेच!

    उत्तर द्याहटवा
  13. लहानपण परत आल्यासारखे वाटले. मला तर अजूनही वाटते की स्वतःचे एक केवळ मराठी पुस्तकांचे दुकान असावे. कव्हर घाळणे म्हणजे एक सोहळा च असे. त्यावर नाव टाकायला एका मैत्रिणीकडे जायचो. असे खूप काही आठवले आणि खूप आनंद मिळाला. खूपच छान लिहिले आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. खुपच छान मॅडम! हा सुंदर लेख वाचताना लहानपणीचे दिवस आठवले खरोखरच खूप छान आठवणी या लेखातून तुम्ही वाचकांच्या समोर मांडल्या अप्रतिम!

    उत्तर द्याहटवा
  15. मस्तच! किमान आपल्या पिढी पर्यंत सर्वांचे असेच अनुभव आणि आठवणी आहेत! त्या प्रभावीपणे शब्दात मांडल्या आहेत त्याबद्दल कौतुक आणि अशाच अनेकविध आठवणींचा प्रवास घडत राहो ही अपेक्षा! अनेक शुभेच्छा! 👍

    उत्तर द्याहटवा
  16. काय बोलू वैशाली. बोलती बंद वर्णन. १०-१५ मिनिटं बसुन राहिलो एकाच जागी आणि सगळ्या ह्या अश्याच आठवणींची गर्दी उसळली मनात. काय सुंदर दिवस होते ते...आता सिंहावलोकन करताना समजतंय. आणि कितीही नाही म्हणलं तरी हल्लीच्या पिढीशी तुलना डोक्यात आलीच. सर्व काही आबादीआबाद असणारी मुलं आपली. त्यांना असल्या गोष्टी सांगणं आणि तुम्हीही असं करा हे सांगायची सुद्धा सोय नाही😏

    उत्तर द्याहटवा
  17. Sunder lekh Vaishali...... as always..enjoyed reading through the thoughts penned by you.
    Also, realized after reading this blog that we learnt the core concepts of Sustainability, Reduce-Recycle-Reuse in our childhood itself...thanks to our parents who not only taught us to be economical but also gave the lessons to be conscious about our environment.

    उत्तर द्याहटवा
  18. वैशाली, प्लॅस्टिक कोटेड ब्राऊन पेपर ची कव्हर्स पण मिळायला लागली होती. त्याची पण आठवण झाली. माझाही आवडता छंद होता. गौरव कुणाल मुळे काही वर्ष चालू ठेऊ शकलो. फारच छान आठवणी.

    उत्तर द्याहटवा
  19. व्वा... आठवणींची उत्कृष्ट मांडणी!!!
    वाचणाऱ्याला निमिषार्धात बालपणीच्या रम्य nostalgia मधे घेऊन जातेस. बाबांचा उल्लेख खूप भावला...

    उत्तर द्याहटवा
  20. Khoopach chhan ... new books la cover lavne...he kharach khoop avdayche...to Navin pustkancha sudandha...tar ajunahi avdato..

    उत्तर द्याहटवा
  21. आनंद पुस्तक मंदीर आणि इयत्तेनुसार बांधून ठेवलेले गठ्ठे... आठवणी एकदम रीफ्रेश झाल्या

    उत्तर द्याहटवा
  22. बालपणीची सफर पुन्हा एकदा....खूप मजा आली...

    उत्तर द्याहटवा
  23. Khup chhhan..aamhi pan suttit hech sarv udyog karaycho..aani aata mulan kadhun pan karun gheto..ho ani junya vahinichya phuthyachi ghare banavaycho suttit..majja yayachi..

    उत्तर द्याहटवा