शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

आठवणीतल्या गोष्टी - कंपास पेटी

 


            दप्तरातले एक विविध वस्तू भांडार म्हणजे कंपास पेटी. पहिली - दुसरीत असताना तर फक्त पाटीवरची पेन्सिल  न्यायला लागायची. त्या पेन्सिलीची चव पण काय छान असायची. कधी तरी पेन्सिलीला टोक करायला खोर कागद वापरायचो. पण त्यावेळी 'स्पंज पेटी' ही फार महत्त्वाची असायची. हिरव्या किंवा आमसुली गुलाबी अशा छान रंगात छोटी गोल डबी. त्यात स्पंजचा गोल तुकडा. तो भिजवून  पाटी पुसताना काय मस्त वाटायचं आणि मग फुंकर मारून पाटी वाळवायची. आधी 'सिंगल पाटी' आणि मग रा अभ्यास वाढल्यावर 'डबल पाटी'.  त्यावर लिहिलेलं पुसू नये म्हणून दोन्ही बाजूला पुठ्ठे. गणिताची परीक्षा असे तेव्हा घरूनच पाटीवर बेरजा -वजाबाक्यांसाठी घरं आखून न्यायची. ओल्या पाटीवर लिहिताना आधी अक्षरं नीट दिसत नसत. पण पाटी वाळली की ठळक व्हायची त्यात पण गंमत वाटायची. पाटीवरून आठवलं, एक पिवळ्या रंगाची पुठ्ठयासारखी छोटी पाटी मिळायची. त्यावर रिफीलने काहीही लिहिलं आणि कागद उचलला की लिहिलेलं सगळं पुसून जायचं.  

 

            मग हळूहळू शिसपेन्सिल  वापरायला सुरुवात झाली. आणि त्याच्याबरोबर हिरवे किंवा निळसर रंगाचे छोटेसे खोडरबर. ते हरवू नये म्हणून बाजूला बॉलपेनने आपलं नाव घालायचं.  त्यानं खोडलं की सगळं पान काळं होत असे आणि रबर पण काळं व्हायचं. मग युनिफॉर्मला घासून साफ करायचं. त्याच सुमारास रंगीबेरंगी/पारदर्शक  'सेंटेड' रबर मिळायला सुरुवात झाली. त्याला मस्त गोड वास यायचा. फुलपाखरू, स्ट्रॉबेरी आणि इतर फळं, बॅटबॉल आणि किती काय काय आकार असायचे. त्यावेळी वाढदिवसाला हमखास द्यायची किंवा मिळायची भेटवस्तू म्हणजे पेन्सिल आणि सेंटेड रबर. आणि जवळ कितीही असले तरी त्यातलं नाविन्य संपायचं नाही. माझे वडील डॉक्टर असल्याने त्यांच्याकडे बरेचदा नाकात पेन्सिलीचा किंवा रबराचा छोटा तुकडा गेलेली मुलं आणि त्यांचे घाबरे-घुबरे आई -वडील येत असत.  हे पाहिल्याने रबराचा वास कितीही आवडला तरी तो नाकात जाणार नाही ह्याची मी पूर्ण खबरदारी घेत असे.   

            पेन्सिलीचे तर किती प्रकार. नेहमीची लाल-काळी 'नटराज' पेन्सिल किंवा निळी 'अप्सरा'. पांढऱ्या रंगावर गुलाबी-हिरवी फुलं -पानं असलेली 'फ्लोरा' किंवा निळ्या-पिवळ्या रंगांवर छोटी नाजूक चित्र असलेल्या पेन्सिली. पेन्सिलला टोक करणं हा एक मन लावून करायचा उद्योग होता. मग त्या टोकयंत्रातून बाहेर आलेल्या छोट्या पापुद्र्याची फुलं करायची किंवा फुलांच्या पाकळ्या म्हणून चिकटवायला एका डबीत भरून ठेवायच्या. काही अतरंगी मुली अशी फुलं पुढे बसलेल्या मुलीच्या वेणीत खोचण्याचा खोडसाळपणाही करत असत! कोणी म्हणे की  टोकयंत्रापेक्षा ब्लेड किंवा चाकूने टोक केलं तर ते तुटत नाही. पेन्सिल जास्त टिकते. मग अर्ध पातं आणि त्याला प्लास्टिकचं कव्हर असं ब्लेड वापरायचो. त्या ब्लेडने पेन्सिलचा मागचा गोल कापून त्याच्या लाल -काळ्या टिकल्या बनवायच्या.  

मी लहान असताना आमच्याकडे  काही कामासाठी सुतार आला असताना त्याची कानावर पेन्सिल ठेवायची स्टाईल मला इतकी आवडली की मोठ्या पेन्सिलचे दोन तुकडे करून मी माझ्या कानावर ठेवायला दोन पेन्सिली तयार केल्या.

'रेणुका स्वरूप' या शाळेच्या माजी विद्यार्थिनीच्या स्मरणार्थ आमच्या शाळेला नाव दिले असल्याने दरवर्षी तिच्या वाढदिवसाला सर्व मुलींना वह्या आणि पेन्सिली मिळत. वर्षानुवर्षे एकच डिझाईन असलेल्या, चमकदार गुलाबी, हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पेन्सिली. शाळेतल्या कुठल्याही स्पर्धेत बक्षीस म्हणून त्या पेन्सिली मिळायच्या. त्या पेन्सिली म्हणजे एक 'ब्रँड' होता.

पुढे मग पेन्सिलीतही H (Hard) आणि B (Blackness) नुसार 1H, 2B, 1HB असे प्रकार असतात हे समजले. इंजिनिअयरिंगला गेल्यावर ड्रॉईंगसाठी 'क्लच पेन्सिल' आणि 'लीड बॉक्स' आणली पण लाकडी पेन्सिलची गंमत त्यात नव्हती. पण पांढरं 'स्टॅडलर' रबर मात्र खूप आवडायचं. 

शिसपेन्सिलीची बहीण म्हणजे रंगीत पेन्सिल. माझ्या काकांचं लक्ष्मीरोडवर मोठं ऑफिस होतं. गणपती उत्सवात मिरवणूक बघायला आम्ही घरातले सगळे तिथे जमत असू. वर्षातून एकदाच त्या ऑफिसला जायचे अजून एक आकर्षण म्हणजे निळ्या आणि लाल रंगांचे शिसे असलेल्या पेन्सिली. अर्धी निळी, अर्धी लाल, दोन्ही बाजूंकडून टोक करायचं. तशी पेन्सिल फक्त तिथेच बघायला आणि वापरायला मिळत असे, मग रात्रभर त्या पेन्सिलीने लिहून अगदी बारीक व्हायची.    

चित्रकलेसाठी रंगीत पेन्सिली फार कुणाकडे नसत. पण रंगीत खडू (oil pestles) मात्र भरपूर वापरले. माझा मामेभाऊ श्रीकांतदादा फाईन आर्टसला होता. एकदा  त्याने मला ४८खडूंचा एक बॉक्स दिला होता. ठराविक १२ खडूंचे रंग माहीत असताना, वेगळ्याच ४८ छटांचे ते 'मॅट फिनिश' मधले खडू बघून मला काय करू नि काय नको असं झालं. त्यात एरवी कुठेही बघायला मिळणार असे 'स्किन कलर 'चे पण खडू होते. मग वर्गात ' पतंग उडवणारी मुलं ', 'झेंडावंदन' अशी चित्र काढायला दिली की ते खडू सगळे जण वापरायचे.     

  'स्केच पेन' हा प्रकार खूप उशीरा वापरला आणि 'highlighter' तर कॉलेज संपतासंपता.

शाळेच्या वर्षांबरोबर पेन-पेन्सिल-रबर-पट्टी बरोबर कोनमापक, गुण्या , कर्कटक , कंपास अशा वस्तूंनी कंपास पेटी समृद्ध होत गेली. प्लॅस्टिकच्या पट्टीवरचे आकडे हळूहळू पुसले जायचे किंवा खटकन मधूनच पट्टी तुटायची. कंपासशी माझं कधी फारसं जमलं नाही. पेन्सिलने वर्तुळ काढताना मध्येच कंपास सरकला की वर्तुळ पूर्ण होणे अशक्यच. कंपासला पेन्सिल स्क्रूमध्ये घट्ट अडकवणे हे ही एक कौशल्याचं काम. जरा पेन्सिल उंचीला मोठी असेल तर मध्येच हाताला लागायची. कर्कटकचा मुख्य उपयोग बाकं कोरण्यासाठी किंवा कोणी त्रास देत असेल तर टोचण्यासाठी असतो हीच साधारण समजूत होती.  कोनमापक-गुण्या मात्र भूमितीत उपयोगी पडायचे. परीक्षेच्या आधी कंपासपेटीतल्या काही वस्तू हमखास सापडेनाशा होत. मग घरीच भावंडांच्या कंपास मधून उधार-उसनवार करायची. कंपासमधल्या वस्तू हरवण्याचं  प्रमाण आणि त्याचा एकंदरीत उपयोग ( utilization ) लक्षात घेता त्या वस्तूंची एक बँक शाळेत सुरु करावी असा विचार माझ्या मनात नेहेमी येत असे. सुरुवातीला सगळ्यांनी काही ना काही  वस्तू डिपॉझिट करायच्या आणि मग लागतील तेव्हा वस्तू नेऊन वापरून झाल्यावर परत करायच्या असा काहीसा विचार होता, पण कृतीत आला नाही हे खरं.   

        या शिवाय कंपासपेटीच्या झाकणात आतल्याबाजूस रोजचे टाईम टेबल असे. कुणाचा बसचा पास, सायकलमध्ये हवा भरायला सुट्टे पैसे, शाई पुसायला बारका कापडाचा तुकडा, एखादी सेफ्टी पिन, परीक्षेच्या वेळेस एखादा गणपतीचा फोटो. त्या एवढ्याश्या पेटीत असा बराच संसार असे.

            कंपास पेटीबरोबरच रंगपेटीही माझी आवडती. वॉटर कलर्स च्या चकत्या, कधी ट्युब्स तर कधी पोस्टर कलर्सच्या बाटल्या. -- नंबरचे ब्रश, रंग बनवायला फुलपाखराच्या आकाराचे किंवा अंडाकृती पॅलेट. आणि पाणी भरण्यासाठी एक छोटी डबी. काही मुलींच्या हातातच जादू असे. एखादा रंग नाही म्हणून त्यांचं काही अडत नसे. - रंग एकमेकांत बेमालूम मिसळून त्या इतकी सुंदर चित्रं रंगवत. अशी सगळी छान चित्रं शाळेच्या चित्रकला वर्गात नेहेमी लावलेली असायची.   


        अजूनही हे कंपासपेटीचं, रंग पेटीचं जग मला भुरळ घालतं. व्हिनसच्या दुकानातून उगीच बारीक सारीक खरेदी करायची हौस फिटत नाही. परवा लॉक डाउन मध्ये मी परत ब्रश आणि रंगपेटी आणली. प्रवासासाठी, कामासाठी, सेमिनारसाठी बरेचदा तारांकित हॉटेलमध्ये जायची किंवा राहायची वेळ येते. तिथे रायटिंग पॅड आणि पेन्सिल दिसली की मला लिहायचा मोह होतो. हॉटेलच्या प्रकृतीनुसार त्या पेन्सिलीही नाजूक - साजूक असतात. ठसठशीत अक्षरं काही उमटत नाहीत. पण म्हणून काय झालं, कागदावर रेघोट्या मारताना, गोळा -फुली खेळताना काही काळापुरतं माझं बालपण मला नक्कीच देऊन जातात.     

p.c. Google

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

आठवणीतल्या गोष्टी - शाईचे पेन


                माझ्या दृष्टीने 'चौथी' हे फार महत्त्वाचे वर्ष होते. स्कॉलरशिपची परीक्षा वगैरे किरकोळ कारणं होती, पण मुख्य कारण म्हणजे चौथीपासूनच शाळेत  'शाईचं पेन ' वापरायला परवानगी होती. शुभदाकडे छान निळ्या रंगाचं शाईचं पेन होतं आणि ते फक्त लांबूनच पाहायची मला परवानगी होती. त्यामुळे आपले स्वतःचे पेन असणं माझ्यासाठी फारच महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी चौथीपर्यंत थांबायला लागणार होतं. चौथीच्यावर्षी पुस्तक खरेदीबरोबर पेनचीही खरेदी झाली.
               शाळेत पेन वापरायच्या आधी 'बोरु लेखन' होते. दोन रेघा असलेली मोठी वही आणि प्रत्येक पानावर मोठ्या आकारातले एक अक्षर. गुळगुळीत बांबूचा बोरु छान टोकदार करायचा. मग शाईच्या दौतीत बुडवून अक्षरे काढायची. रोज एक पान लिहायचे. कॅलिग्राफीचे प्राथमिक धडेच होते ते. पण वर्षभर बोरु लेखन का नव्हते ते आता आठवत नाही.

              घरी कपाटात एका छोट्या पेटीत शाईची दौत, काळं टोपणवाला काचेचा ड्रॉपर ,शाई टिपायला खडूचा तुकडा, शाई पुसायचे छोटे फडके असा सगळा इंतजाम होता. शुभदाने ड्रॉपरने पेनात शाई कशी भरायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. नवीन पेनमध्ये शाई भरली की नीबमधून बाहेर यायला थोडा वेळ लागतो पण एकदा का पेन लिहू लागले की मग लिहितच रहावे असे वाटते. आधीच मला सतत लिहायची फार हौस. माझे बाबा मला गंमतीने 'तू मोठेपणी  कारकून होणार' असं म्हणत असत. शाईचं पेन मिळताच मी पानंच्या पानं भरून लिहायला लागले. माझ्या मधल्या बोटाच्या वरच्या पेराला नेहमी शाईचा डाग असे. शाईच्या पेनाचे प्रकार तरी किती असत. बारीक किंवा जाड. कोणी म्हणे जाड पेनाची नीब मोठी असते (ते नीब का ती नीब हा ही एक वाद असे) त्यामुळे अक्षर छान येतं. शाई किती राहिली ते कळावं म्हणून काही पेनं मधूनच किंवा पूर्ण पारदर्शक असत.
              माझे वडील 'पार्कर'चं पेन वापरत. काळ्या रंगाचं पेन आणि चकचकीत स्टीलचं टोपण. एकदम लहान नीब. पेनमध्येच ड्रॉपर असे. त्यामुळे त्यात जास्त शाई मावत नसे. आम्ही कधी ते पेन मागितलं की "हे पेन सह्याजी रावांसाठी आहे. रोजच्या अभ्यासासाठी नाही" असं बाबा म्हणायचे. पण मोठं झाल्यावर तसलं पेन घ्यायचं हे मी ठरवूनच टाकलं होतं.
              शाईच्या पेनाचे नखरेही फार असत. मध्येच उठेनासे व्हायचे. मग जोरजोरात शिंपडून बघायचे. मग कधीतरी इतरांच्या अंगावर निळी रंगपंचमी होत असे. शाळेच्या भिंतींवर किंवा कोपऱ्यात तर हमखास ही चित्रकला दिसायची. कधीतरी पेन कागदावर ठेऊन हळूच एखादा आटा सैल करायचा मग शाई ठिबकू लागायची. मग ते शाई पडलेले पान दुमडून 'फ्री हॅन्ड' ड्रॉइंग करून घ्यायचे. कधीतरी पेनच्या नीबच्या खाचेतून ब्लेड वर खाली फिरवायची, म्हणजे कचरा निघतो अशी एक समजूत. कधी कधी पेन अचानक गळायला सुरुवात होई, मग व्हॅसलिन लावायचं. कधी पेनाचे आटे किंवा टोपण घट्ट बसलं की रबर बँड लावून उघडायचं असलेही उद्योग असत. गळक्या पेनाची करामत युनिफॉर्मवरच्या किंवा मुलांच्या पांढऱ्या खिश्यावरच्या निळ्या ठिपक्यांच्या रांगोळीत दिसत असे.    

             नीब तर किती तरी वेळा तुटत असे. मग कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन नवीन नीब लावून आणायची. चंदेरी किंवा सोनेरी रंगाची नीब एखादी सोन्याची वस्तू घेतल्यासारखी पारखून घेत असू. दुकानातला मुलगा सफाईने मोडकी नीब हळूच दाबून काढत असे आणि नवीन लावून देत असे. पुढे मग आम्हालाही घरीच निब बदलता यायला लागली. दुकानात नवीन नीब लावली कीउगाच दोन चार रेघोट्या ओढून बघायचं, कधीतरी बरोबरच्या मैत्रिणीला पण लिहून बघायला सांगायचं. काही दुकानात -१० पैश्याला शाई पण भरून मिळत असे.
             आठवी-नववीत मध्येच कधीतरी वेगवेगळ्या रंगाची शाई वापरायची टूम आली. कुणी जांभळी शाई वापरत तर कुणी काळपट निळी. हिरव्या -लाल शाईच्या छोट्या दौती मिळत.  दहावीचा पेपर काळ्या शाईने लिहिला की परीक्षकांचे मत चांगले होते अशी उगीचच एक समजूत होती. पण मला मात्र अजूनही निळ्या रंगाचीच शाई फार आवडते. वाचताना त्यात एक शांतपणा जाणवतो. आम्ही 'कॅम्लिन' ची निळी शाई वापरायचो तर बाबा 'पार्कर'ची. 'पार्कर'च्या बाटलीचा बॉक्स, आकार, शाईचा वास यातून तिचा काहीसा उच्च दर्जा लक्षात यायचा. तो काहीसा वेगळा निळा रंगही मला खूप आवडायचा
               शाळेतून कॉलेजला गेल्यावर शाईच्या पेनाची जागा बॉलपेनने घेतली. शाळेत असताना बॉल पेन अजिबात वापरायला मिळत नसे. दाबून लिहिल्याने अक्षर बिघडते असा एक समज. पण बॉल पेन सोयीचे असे. टोपण पडलं, नीब मोडलं वगैरे भानगड नाही. रंगीबेरंगी प्लास्टिकची पेनं, खिशाला अडकवायला स्टीलची क्लिप, पुढच्या - मागच्या भागाच्या मध्ये एक स्टीलची रिंग, आत रिफील आणि त्याच्यावर एक स्प्रिंग. टोपणावर क्लिक केलं की लिहायला सुरुवात.  'Use and Throw' पेनं तेव्हा नसल्याने संपलेलं रिफील टाकून,२५ पैश्याचं नवं रिफील घालून परत तेच पेन वापरायचं. स्प्रिंग मात्र बरेचदा इकडे तिकडे फटकन उडून गोंधळ उडवून द्यायची. एरवी सोयीच्या असणाऱ्या ह्या पेनाची रिफील मात्र जर का गळायला लागली तर तो सगळा चिकट मामला निस्तरताना नाकी नऊ यायचे. त्या शाईचे कपड्यांवरचे न जाणारे डाग लिंबाचा रस लावून घासून घासून घालवायला बरीच मेहनत करावी लागे.
             बॉलपेनने डाव्या हातावर मैत्रिणीबरोबर 'जॉली' काढणे हा ही एक खेळ होता. रोज तो गोल गिरवून आपली मैत्री किती घट्ट आहे हे सिद्ध करायला लागत असे.  
             भाऊबीजेला किंवा वाढदिवसाला मुलींना भेटवस्तू काय द्यायची असा प्रश्न कुणाला फारसा पडत नसे. पण बिचाऱ्या मुलांना ठराविक पर्याय असायचे. मग मुंजीत किंवा इतर काही निमित्ताने शाईचं पेन आणि बॉल पेनचे भरपूर सेट जमा होत. त्यातही पूर्ण सोनेरी किंवा चंदेरी रंगाचा सेट म्हणजे भारीच. ती पेनं मग अगदी जपून वापरायची. आणि मग अशी खूप दिवस ठेवून दिली की बापडी बॉल पेनं तर वाळूनच जायची. अजून एका पेनाचं मला आकर्षण होतं ते म्हणजे एकाच पेनात लाल, काळं, निळं आणि हिरवं रिफील असायचं आणि चक्राकार पद्धतीने हवी ती शाई वापरायची.  
             
आज इतक्या प्रकारची पेनं मिळतात पण लिहिणंच कमी झालंय आणि त्याबरोबर शाईतला शब्दात उतरलेला ओलावाही…  

                पण आजही दहावीच्या वर्षात शाईच्या पेनाने लिहिलेले माझे निबंध, मराठीची उत्तरं, शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेतील भाषणं माझ्याकडे आहेत. इतकी वर्षं झाली तरी कागद तितकाच छान आणि शाई जरासुद्धा उडालेली नाही. त्या शाईच्या अक्षरांवरची आणखी एक अपूर्वाईची खूण म्हणजे सु.. तांबेसरांचं अक्षर. कधीही पुसल्या ना जाणाऱ्या आठवणी आज शाईच्या पेनाच्या निमित्ताने  







p.c. Google