शनिवार, २५ जुलै, २०२०

आठवणीतल्या गोष्टी - फळा आणि खडू


            'बाळाचे पाय पाळण्यात दिसतातया म्हणीनुसार मी शिक्षण क्षेत्रात जाऊन गोडबोले परंपरा चालू ठेवणार हे माझ्या आई वडिलांना फार लवकर कळले असावे कारण 'फळा आणि खडू' हा माझा आवडीचा खेळ होता . एक कॅलेंडरच्या मापाचा गुंडाळी करता येणारा छोटा फळा आणि खडू यांच्या सोबतीत मी किती तरी वेळ एकटीच 'शाळा शाळा' खेळत असे. पुढे खऱ्या शाळेत जायला लागल्यावर मी माझी फळ्यावर लिहायची हौस पुरती भागवून  घेतली.

            आमच्या शाळेत फळे तरी किती  प्रकारचे होते. बऱ्याचश्या वर्गात भिंतीतच दगडी फळे होते. फारसे गुळगुळीत नाहीत पण अगदी काळे कुळकुळीत. त्यावर लिहिताना खडूचा 'टकटक' असा एक वेगळाच  छान आवाज यायचा.  केळकर बाई फळ्यावर सटासट गणितं सोडवून दाखवायच्या. गुप्ते बाई मोठ्या लाकडी कंपासला खडू लावून भूमितीच्या आकृत्या फळ्यावर इतक्या सुरेख काढायच्या की पाहतच रहावे. काही वर्गात लाकडी फ्रेममध्ये काचेचे/गारेचे हिरवट छटा असलेले फळे होते. कधीतरी त्यावर लिहिताना खडूचा अंगावर शहारे येणार आवाज येई. ते अगदी नवे गुळगुळीत फळे, पण मला मात्र दगडी काळा फळाच फार फार आवडायचा.
            ५वीत मी पहिल्यांदाच 'मॉनिटर' झाले होते. रोज सकाळी  मुली मोजून फळ्याच्या खालच्या कोपऱ्यात  'उपस्थित, अनुपस्थित, एकूण मुली' असा लहानसा, ज्याला आजच्या भाषेत 'daily dashboard' म्हणता येईल तो लिहायचा. ऑफ तास असेल तर मुलींना गप्पं बसवायची जबाबदारी कोणावर तरी असायची. मग बोलणाऱ्या मुलींची नावं फळ्यावर लिहायची. बहुधा हे काम बाई बडबड करणाऱ्या मुलींवरच  सोपवत आणि अर्थात मी त्यात असेच.   
            शाळेला तिन्ही मजल्यांवर लांबचलांब कॉरिडॉर होते. प्रत्येक वर्गाबाहेर लाकडाचे छान, मध्यम आकाराचे फळे होते. वेगवेगळे सुविचार, कविता, सण उत्सवांची माहिती, देशातल्या घडामोडी किती काय काय असायचं त्या फळ्यांवर. बरेचदा वर्गातील मुलीच  तो फळा बोलता ठेवत.
            ऑफिसजवळच्या आणि पोर्चमधल्या जिन्याच्या जवळच्या फळ्यावर महत्त्वाच्या सूचना असत. बोर्डात आलेल्या मुलींचं अभिनंदन, शाळेत येणाऱ्या विशेष पाहुण्यांची माहिती स्वागत, परीक्षेच्या काळात शुभेच्छा, शिक्षकांना मिळालेले पुरस्कार, १५ ऑगस्ट -२६ जानेवारीला तिरंग्याचे चित्रं आणि देशभक्तीपर गीत  आणि मग कधीतरी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन. आमच्या चित्रकलेच्या कर्वे बाई आणि मराठे बाई ह्यांचं अक्षर इतकं सुंदर होतं! काही विशेष दिवस असेल तर त्या फळ्यावर लिहीत असत. तिथेच थांबून त्यांचं लिहिणं किंवा साधी सोपी रेखाटनं बघणं हे सुद्धा एक शिक्षणंच असे. स्नेहसंमेलन किंवा इतर काही महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर व्यासपीठावर एका बाजूला दीप प्रज्वलनासाठी समई आणि दुसऱ्या कोपऱ्यात एक स्टँडवर ठेवलेला फळा. ईशस्तवन, स्वागतपद्य इथपासून आभार आणि अल्पोपहार असा सगळा आजच्या भाषेतला 'अजेन्डा' त्या फळ्यावर असे. 
            शिकाऊ शिक्षकांसाठी 'लेसन घेणं' हा एक प्रात्यक्षिक परिक्षेचा भाग असायचा. एरवी इतर बाई फळे भरून लिहीत नसत. भाषा, इतिहास हे तर जास्त बोलून शिकवायचेच विषय. पण 'लेसन' घेणारे शिक्षक मात्रं फळ्याचा इंच इंच वापरत. तासाच्या आधीच येऊन फळ्यावर एका बाजूला आकृत्या किंवा चित्रं काढायचे, एखाद्या बाजूला तक्ते किंवा नकाशे टांगायचे आणि मग मध्ये लिहायचे. कधी कधी 'लेसन पाडणे' हा प्रकारही आम्ही  करत असू आणि त्याबद्दल नंतर बाईंची बोलणीही खात असू .
            शाळेतून कॉलेजला गेल्यावर वर्ग आणि फळ्याचा आकार वाढतच गेला. एका बाजूला बारीक चौकोन आखलेले फळे बहुतेक वर्गात असायचे. Zoology, Botany च्या प्रयोगशाळेत त्या दिवशी करायच्या प्रयोगाच्या इतक्या छान आकृत्या असत की त्या बघून जर्नल लिहिणे सोपे जाई.
         पुढे मी शिकत असताना सहज म्हणून मला 'स्टेट बँक ट्रेनिंग सेन्टर' मध्ये तिथल्या ऑफिसर्सना शिकवायची संधी मिळाली आणि तिथल्या एका वरिष्ठ स्त्री अधिकाऱ्यांनी मला 'फळ्याचा परिणामकारक वापर' इतका छान समजावून सांगितला की तो अजूनही लक्षात आहे. 
माझ्या वर्गातले कपाट
              फळ्याचे सोबती खडू आणि डस्टर. शाळेत जाड लाकडी डस्टर असे. त्याचा उपयोग फळा पुसण्यापेक्षा टेबलावर  आपटून मुलींना गप्प बसवायलाच जास्त व्हायचा. डस्टरवरचे लाल, हिरवे कापड खराब झाले  की ऑफिसमधून बदलून नवीन डस्टर आणायचे. शाळेत प्रत्येक भिंतीत कपाट असे. एक बाजू सकाळच्या वर्गासाठी आणि दुसरी दुपारच्या वर्गासाठी. त्यात स्वाध्यायच्या वह्या,  कोऱ्या मार्कलिस्ट, खडू, डस्टर असं सामान असायचं . पांढऱ्या खडूचे बॉक्स असायचे पण  निळे, पिवळे, हिरवे किंवा गुलाबी-केशरी रंगीत खडू मात्र काटकसरीने वापरायला लागायचे. खडूचे उरलेले तुकडे शाई टीपायला, उगीचच कर्कटकने कोरीव काम करायला, कॅनव्हास शूजवर ओले करून पॉलिश करायला वापरायचे.  खडूच्या बॉक्समधला भुस्सा हिरव्या रंगात मिसळून
दिवाळीच्या किल्ल्यावर गवत म्हणून किंवा तळ्याभोवतीच्या बागेत हिरवळ म्हणून वापरायचापुढे दातार क्लासला असताना मुलं बोलायला लागली, गणितं चुकायला लागली की दातार सर नेम धरून खडू मारल्याची इतकी  बेमालूम ऍक्शन करत की खडू खरंच मारला की नाही ते फक्त त्या मुलालाच माहित.

            या खडूंची अजून एक आठवण. मी दुसरी-तिसरीत असताना आमच्या जवळ राहणाऱ्या एका मुलाने खडू बनवायचा उद्योग सुरु केला. शिक्षणात फारशी गती नसल्याने त्याला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी त्याची आई अधून मधून असे काही प्रयत्न करायची. प्रत्येक गोष्टीचे मला कुतूहल असल्याने खडू बनवण्यासाठी मी मदतीला येणार हे मी स्वतःच सांगून टाकले. खडू बनवायची पावडर आणून ती विशिष्ट प्रमाणात कालवणं, साच्यात घालणं, साचे गच्चीत  उन्हात ठेवणं, मग मध्येच उघडून खडू किती वाळलेत ते बघणं असं सगळं झाल्यावर पहिले खडू तयार झाले. स्वभाव मुळातच बडबड्या असल्याने मी आधीच शाळेत बाईंना सगळी माहिती देऊन पहिली ऑर्डर पण मिळवली होती. मग आमच्याच  पेन्सिलच्या  खोक्यातला उरलेला भुस्सा घालून, त्या मुलाच्या आईने मला खडूचा एक घरगुती खोका बनवून दिला . त्यातले काही खडू चांगले निघाले तर काही ओलसर राहिल्याने मधूनच तुटले. आपण दिलेले सगळे खडू चांगले निघाले नाहीत म्हणून मला वाईट वाटले आणि मी परस्परच बाईंना थोडे खडू फुकट आणून द्यायचे कबूल  केले.  त्या मुलाचे खडूचे गिऱ्हाईक टिकवणे आणि त्याचा नवीन उद्योग चांगला चालणे ही जणू काही माझीच जबाबदारी आहे ही  जाणीव त्या - वर्षाच्या वयात मला होती याचं आज मलाच नवल वाटतं. पुढे इतर अनेक उद्योगांप्रमाणे त्याचा हाही प्रयत्न थांबला. 
            मी सिम्बायोसिसला काम करत असताना एक माळकरी आजी आजोबा खडू विकायला येत. त्यांना मदत म्हणून आम्ही नेहमी त्यांच्याकडून खडू घेत असू. जेव्हा  आमच्याकडचे काळे फळे जाऊन व्हाईट बोर्ड  आणि मार्कर्स आले तेव्हा आमचा ऋणानुबंध संपला .
            खडूच्या वापराने घशाला त्रास होतो, खडूची धूळ होते म्हणून आता बऱ्याच ठिकाणी दगडी काळे फळे जाऊन व्हाईट बोर्ड आले. जुने जाणारनवे येत राहणार. प्रत्येकाची मजा वेगळी.  अजूनही कुठला नवीन प्रोजेक्ट, नवीन काम  चालू करताना  'white boarding' ही आमची पहिली  पायरी असते. फरक इतकाच की आता माझी फळ्यावर लिहायची हौस पुरती फिटल्याने मी ती संधी बाकीच्यांना देते... 


p.c. Google

मंगळवार, २१ जुलै, २०२०

आठवणीतल्या गोष्टी - पुस्तके आणि वह्या


३० एप्रिलला वार्षिक परिक्षेचा निकाल लागला की एक महत्त्वाचं काम असायचं ते म्हणजे अभ्यासाच्या वह्या - पुस्तकांचे कपाट आवरणे. आई अधून मधून आठवण करून द्यायची पण काम पुढे ढकलण्यासाठी निकालाचे नुसते निमित्त. मग एकदाचे सगळे कपाट काढून जुन्या क्रमिक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ठेवायचे. शाळेत किंवा इतर कोणाला हवी असतील तर तिथे ते गठ्ठे नेऊन पोचवायचे. इतर व्यवसायमाला, शाळेच्या प्रश्न मालिका वगैरे धाकट्या भावंडांसाठी नीट बाजूला ठेवून द्यायच्या. पुस्तके आवरून झाली की वह्यांकडे मोर्चा.


Gift Idea: Homemade Journals | Homemade journal, Diy book, Diy journal
           जुन्या वह्यांमधले कोरे कागद काढून त्याच्या वह्या बनवणे हा एक आवडीचा उद्योग असे. दर वर्षी बाबा माझ्याकडून आणि शुभदाकडून अतिशय सुबक आणि नेटकेपणाने या वह्या बनवून घेत. आधी कागद नीट लावून घायचे, दोन्ही बाजूंनी समान अंतरावर भोकं पाडून, पुढे-मागे जाड दोऱ्याने व्यवस्थित शिवून,पक्की गाठ मारून, उरलेला दोरा नीट कापून मग त्यावर एक छोटी चिकटपट्टी चिकटवायची. कव्हरवर एखादे चित्र काढायचं किंवा जुन्या निमंत्रण पत्रिकांवरची चित्रं लावून कोलाज करायचा. 'Reduce, Reuse, Recycle' अशी 'Sustainability' ची सूत्रं अशी घरीच हातोहात शिकायला मिळत होती .
           पुढे मग कधीतरी शाळेजवळ एक बाइंडिंगचे दुकान आहे, तिथे कागद दिले की - दिवसांत  वह्या करून मिळतात असं कळलं. पण त्या वह्यांना घरी केलेल्या वह्यांची सर नव्हती. एकतर चारी बाजूनी कागद कापून त्यांचा आकार छोटा व्हायचा. दिलेल्या सगळ्या पानांच्या मजबूत दोन तीनच  जाड जाड वह्या तयार व्हायच्या. लाल किंवा निळे रेक्झिन आणि पुढे -मागे पुठ्ठा. त्याला लावलेली खळ किंवा डिंक याचा असा काही भयंकर वास यायचा की वही हातात सुद्धा धरवत नसे आणि एकदम जाड असल्याने पान दुमडून लिहिणं पण कठीण. मग आम्ही आमचा घरी वह्या बनवायचा कुटीरोद्योगच चालू ठेवला.
           सुट्टीतल्या अभ्यासाची वही म्हणजे एक गंमतच होती. मी तिसरी -चौथीत असताना बाबा मला रोज सकाळी शुद्धलेखन द्यायचे. साधारण दहा ओळी  लिहून त्यांना दाखवायच्या. हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाला ते मला दहापैकी एक,दीड , दोन असे मार्क देत असत . १०-१२ दिवसांत गाडी साडेतीन मार्कांपर्यंत गेलीआणि या गतीने आपल्याला - मार्क कधी मिळणार? ह्यात काही अर्थ नाही असं स्वतःच ठरवून मी ती वही बंद करून टाकली.
           मे महिना संपत आला की नवीन पुस्तकांचे वेध लागायचे. टिळक रोडवरचं 'आनंद पुस्तक मंदिर ' म्हणजे आमचं हक्काचं पुस्तकांचं दुकान. मध्येच कधीतरी टिळक रोडवर गेलं की दुकानात चक्कर मारून यायची. " काका , आली  का हो पुस्तकं?". दरवर्षी एखादं पुस्तक तरी उशीरा छापून यायचं. मग ते सांगायचे, "पुढच्या आठवड्यात या". पाऊस सुरू व्हायच्या आत पुस्तकं खरेदीची गडबड. त्या वेळेस मला तासनतास त्या दुकानात थांबावंसं वाटायचं. नवीन पुस्तकांचा तो वास. आजही त्याची आठवण आली की अंगात वेगळाच उत्साह संचारतो.  दुकानात जिकडेतिकडे वह्या -पुस्तकांचे गठ्ठेच गठ्ठे. इयत्तेप्रमाणे, विषयाप्रमाणे पुस्तकं, शिवाय नकाशाचे कागद, आलेखनाचे कागद. वह्यांचे पण किती प्रकार. एक रेघी, दु रेघी, पाचवीत इंग्रजीसाठी चार रेघी, शिवणासाठी पानांवर चौकोन असलेली, कधी फुलस्केप, मुख्य विषयांना २०० पानी, बाकी १०० पानी, चित्रकलेची वेगळी आणि एक मोठी रफ वही अशी वह्यांची पण यादी असायची. वह्या घ्यायला वेळ लागायचा कारण वहीवरची चित्रं बघून, आतली पानं बघून मग खरेदी. मुलांपेक्षा जास्त उत्साहात काका आणि दुकानातली इतर माणसं प्रत्येकाची मागणी पुरवत असत. त्यांची ती धांदल बघून आपण काही दिवस या दुकानात काम करून त्यांना मदत करावी असं मला दर वर्षी वाटत असे.
           खरेदी करून घरी येतानाचा आनंद अवर्णनीय!! आधी मी मराठी आणि इतिहासाचं पुस्तक उघडून बघायचे. कधी कधी गुळगुळीत पानांवर तर कधी साधी चित्रं असायची. मला चित्रकाराचे नाव आठवत नाहीये, google करायचा प्रयत्न केला, पण नदीचे दोन्ही  हिरवेगार काठ, त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब ह्याचं इतकं सुंदर चित्रं मराठीच्या एका पुस्तकात होतं, अजूनही ते माझ्या डोळ्यासमोर आहे. एक्सप्रेसवेच्या आधी एक नदीवरचा पूल लागतो तेव्हा हमखास ते चित्रं मला आठवतं. सगळी चित्रं, नकाशे बघून झाले की मग  बाकीची पुस्तकं चाळून आतली पानं वगैरे व्यवस्थित आहेत ना बघायचं
Blank Diary notebook graffiti 30 sheets Sketch Book kraft cover ...
आता पुढचा  कार्यक्रम म्हणजे पुस्तकांना कव्हर्स घालणे (तेव्हा आम्ही कव्हरं म्हणायचो). मोठी सतरंजी घालून सगळ्यांची पुस्तकं बाहेर काढायची. गुळगुळीत, फ्रेश रंगाचा ब्राऊन पेपर घेऊन, मग एकंदरीत पुस्तकांच्या हिशोबाने त्याचे मोठे तुकडे करणं, बाजूचे त्रिकोण कापून घड्या दुमडणं, नावासाठी लेबल चिकटवणं…. गप्पांच्या नादात काम कधी संपायचं ते कळायचेही नाही. मग प्रत्येक विषयाच्या वह्या. कधीतरी मी ४०० पानी वही आणून, वरच्या समासात खाचा करून, त्यावर विषयांची नावं घालून , एकच वही ४ विषयांसाठी वापरली होती. माझा मामेभाऊ हेमंत कॉम्पुटर फॉन्टला लाजवेल इतक्या सुंदर अक्षरात सगळ्या वह्यापुस्तकांवर नावं घालून द्यायचा. अशी सगळी तयारी झाली की प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मग दप्तरात ठेवायची म्हणजे छत्री / रेनकोटमधून दप्तर भिजले तरी पुस्तकं भिजायला नकोत. नंतर प्लास्टिकची कव्हर्स पण मिळायला लागली. नुसतं पुस्तक खोचलं की  काम झालं पण ती काही मला फार भावली नाहीत. 
           शाळेच्या पुस्तकांशिवाय आमच्या घरी इतरही खूप पुस्तकं होती. रद्दी विकून जे काही पैसे येतील त्याची पुस्तकं आणायची हे ठरलेलं . शिवाय भेट मिळालेली, स्पर्धेची बक्षिसं म्हणून मिळालेली, काही बाबांच्या वेळची जुनी अशी सगळी पुस्तकं आम्ही त्यांच्या उंची आणि जाडीप्रमाणे लाकडी स्टॅण्डवर लावून ठेवली होती. एक वर्ष सुट्टीत त्यांना कव्हर्स घालायची टूम काढली. बाबांनी एकदम जाड ब्राऊन पेपर आणून दिला. इतका मजबूत की आज ३५-४० वर्षांनंतरही त्यातली अनेक पुस्तकं व्यवस्थित कव्हर्ससहित माझ्या कपाटात आहेत.
           सोनियाच्या निमित्ताने शाळेची ही खरेदी पुन्हा एकदा अनुभवता आली. अजूनही मे -जून मध्ये अप्पा बळवंत चौकात गेलं की वह्यांच्या स्टॉलला भेट देऊन चांगल्या डझनभर वह्या घ्यायचा मला मोह होतो. आता घरात खूप पुस्तकं झाली आहेत. काही दिवस तरी नवीन घायची नाहीत असं ठरवलं तरी ऑफिसमध्ये पुस्तक प्रदर्शन लागलं की राहवत नाही. नवीन पुस्तक घेऊन त्यावर नाव, तारीख घालताना मला तितकाच आनंद होतो.  
           मायक्रोसॉफ्ट ऑफिस, स्मार्ट फोन असे सगळे स्वीय सचिव हाताशी असूनही माझी भिस्त अजूनही माझ्या वहीवरच आहे. रोजची कामं, मीटिंग्सच्या नोट्स, वैयक्तिक महत्त्वाच्या नोंदी अशा सगळ्या माझ्या वेगवेगळ्या वह्या आहेत. कधीतरी ड्रॉवर आवरताना जुन्या वह्या सापडतात. वाचताना मजा येते. त्या फाडून मी परत दुसऱ्या वह्या ठेवायला जागा करते. ह्या-पुस्तकांचं कपाट आवरायचा माझा उद्योग बहुधा माझ्याबरोबरच थांबेल असं वाटतंय . 

p.c. Google