शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

माझ्या गुरु




शाळेच्या संस्कारक्षम वयात , बालवाडीपासून ते दहावीपर्यंत अनेक शिक्षिकांचे प्रेम आणि मार्गदर्शन लाभले. खरंतर माझ्या घडण्यात 'रेणुका स्वरूप ' शाळेचा फार मोठा वाटा आहे . 'संपूर्ण व्यक्तिमत्व विकास ' असं काहीही म्हणता आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी तिथे मिळाली . तिथल्या माझ्या मार्गदर्शक तारा बापट बद्दल बाईं मी मागेच लिहिले आहे .

आज मी लिहिणार आहे माझ्या  गायनाच्या गुरु डॉ. शोभा अभ्यंकर यांच्याबद्दल .

शोभाताईंना पहिल्यांदा मी माझ्या शाळेतच पहिले. कुठल्यातरी गाण्याच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आल्या होत्या . गुलाबी गोरेपण , शिडशिडीत बांधा ,एक  वेणी , नाकात चमकणारा हिरा आणि डोळ्यात एक मिश्किल हसू असलेली प्रसन्न भावमुद्रा . नंतर त्यांना बघितलं ते सवाई गंधर्वमध्ये . त्यावेळचा युवा गायक संजीव अभ्यंकरची आई म्हणून . संजीवचे रंगत जाणारे,त्याच्या गायनातल्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारे ते गाणे , रसिकांची उस्फूर्त दाद आणि टाळ्यांचा कडकडाट. आपल्या मुलाचं ते गाणं ऐकताना त्या माऊलीच्या डोळ्यातलं कौतुक आणि अभिमानाने फुललेला चेहेरा मला अजूनही आठवतोय .

त्यांचा मुलगा सचिन आणि माझा भाऊ अमित कॉलेज मधले मित्र . मध्ये काही वर्ष माझा  गाणं शिकण्यात खंड पडला होता . परत सुरु करायचं ठरवलं तेव्हा सचिनची आई म्हणून शोभाताईंना जाऊन भेटले आणि  त्यांच्याकडे माझं गाणं सुरु झालं .

आधीची वर्ष मी जास्त करून उपशास्त्रीय गाणं शिकल्याने पहिल्यांदाच इतक्या पद्धतशीरपणे शास्त्रीय गायन शिकायला मिळाले . आवाज लावणं , मेवाती घराण्याच्या पद्धतीनुसार ' ओम श्री अनंत हरी नारायण ' म्हणून रागाला सुरुवात करणं ,विलंबित लयीतले ख्याल गायन ,आरोहातल्या एकेक स्वराला बढत देऊन करायचा रागविस्तार , ख्याल झाला की द्रुत लयीतली बंदिश , ताना , बोलताना , कधी तराणा . शोभाताई प्रत्येक गोष्ट सोपी करून , समजावून सांगायच्या आणि मग गाऊन दाखवायच्या . त्यांची प्रतिभा विलक्षण . कधी मनासारखी बंदिश मिळाली नाही तर स्वतःही बंदिश रचत  असत. रागाचे स्वर तेच पण वेगवेगळ्या प्रकारे त्याची मांडणी, कॉम्बिनेशन्स करत गाणं कसं खुलवायचं हे सप्रयोग दाखवत असत .

आम्ही चार-पाच जणी एकत्र शिकायचो. तरी  प्रत्येकीच्या आवाजावर त्यांचे बारीक लक्ष असे. एखादीचा स्वर कमी जास्त लागला की लगेच तिला परत गायला सांगायच्या . आधी एकत्र आलापी , मग स्वतंत्र गाऊन दाखवायचे . कोणी तालाला पक्के तर कोणाच्या सफाईदार ताना . एकमेकींचं गाणं ऐकताना आणि प्रत्येकीला शोभाताईंनी दिलेल्या विशेष सूचना ऐकून आमचे गाणेही सुधारत असे.

मे महिन्याच्या सुट्टीत नेहमीच्या बॅचेस नसत तर सकाळी सात ते नऊ सगळ्यांचा  एकत्रित रियाज असे.  सकाळच्या वेळीअहिर भैरव’ च्या मंगल सुरांनी 'सुशील ' बंगला अक्षरशः भारून  जात असे .

गाणं शिकायला येणाऱ्या प्रत्येकीवर त्यांची माया. मीनल लोणावळ्याहून शिकायला यायची म्हणून तिला गरम दूध . एकजण स्वभावाने अतिशय गरीब होती . खाष्ट सासूपुढे तिचं काही चालत नसे. आपणही काही करू शकतो हा आत्मविश्वास तिला शोभाताईंनी मिळवून दिला.

 शोभाताई स्वतः Biochemistry च्या मास्टर्स आणि संगीतामध्येही प्रथम क्रमांकाने एम .ए.  सुरवातीला पं.  गंगाधरबुवा पिंपळखरे, पं.  वि. रा. आठवले आणि पुढे पं. जसराजजींच्या कडून त्या मेवाती घराण्याची गायकी शिकल्या .
शास्त्र आणि कला दोन्हीतही त्या अव्वलच होत्या . शोभाताईंनी आम्हाला सगळ्यांना गाणं तर शिकवलंच पण त्याचबरोबर ज्याला आपण ‘Life Skills’ म्हणतो , त्याची त्या स्वतःच एक चालती बोलती शाळा होत्या . She was an institution by herself.

आजच्या भाषेत त्यांनी आमचं 'ग्रूमिंग' केलं असंच म्हणता येईल. स्टेजवर गायला बसताना साडी कशी नेसायची,तंबोरा धरून बसताना साडी पायाच्या अंगठ्याखाली का धरायची , मेकअप कसा आणि किती करायचा असं सगळं त्या समजावून सांगत . प्रत्येक प्रकारच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे त्या त्या प्रसंगाला साजेशा साड्या असत . उच्च अभिरुची , साड्यांची चोखंदळ निवड , हिऱ्याचे किंवा मोत्यांचे मोजकेच दागिने. She was Gorgeous and Graceful..always graceful…!!!

प्रचंड आत्मविश्वास पण आत्मप्रौढी अजिबात नाही . वक्तशीर , व्यवस्थित आणि  शिस्तीच्या.  गबाळेपणा त्यांना अजिबात चालत नसे. गाणं शिकवताना पण एकदम ताठ बसायच्या. प्रत्येक गोष्टीचं प्लँनिंगही नेमकं असे.  घरातल्या वाण सामानापासून ते गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमापर्यंत . त्यामुळे आयत्यावेळी गडबड , पळापळ असं काही नाही . अफाट ऊर्जा . कंटाळा , थकवा हे शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हते . एका पाठोपाठ एक बॅचेस असत . पण प्रत्येक बॅचमध्ये तीच एनर्जी , तोच उत्साह , अखंड बोटावर ताल देऊन शिकवणं . Hats off to her dedication, involvement and commitment. शास्त्रीय संगीतात ' गुरु ' म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 'राग  ऋषी ' आणि 'पं . विष्णु दिगंबर पलुस्कर ' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

घरात सासू सासरे ,दीर नणंदा  आणि कायम पाहुण्यांचा राबता . त्या सगळ्यांचं अगदी व्यवस्थित करून त्या गाणं शिकवायला बसायच्या . सचिनची आजी आजारी असायची . त्यांचे बरेचदा सगळे करावे लागे. आजोबा काहीसे तापट. पण शोभाताईंनी आपल्या प्रेमाने आणि कर्तबगारीने सगळ्यांना जिंकून घेतले होते . त्यांना कामाचा अचाट उरक होता . घरात गौरी -गणपती असताना चारी ठाव नैवेद्याचा स्वयंपाक आठच्या आत आटपून त्या क्लास सुरु करत आणि क्लास संपल्यावर उकडीचे गरम मोदक वगैरे. 

माझ्या सासूबाईंना पॅरालीसीस झाल्याने त्या अंथरुणावर असत . मी तेव्हा शिकत होते. कॉलेज , अभ्यास , घरची जबाबदारी असं सगळं सांभाळताना मी कधीकधी गडबडून जात असे. अशावेळेस शोभाताई मला समजावत असत. " छान कर सगळ्यांचं . मोठ्या माणसांचे , आजारी माणसांचे आशीर्वाद फार मोलाचे असतात . कायम पाठीशी राहतात " असं म्हणून त्या मला धीर देत असत.

हातपाय गाळून बसलेलं , परिस्थितीपुढे हात टेकलेलं त्यांना अजिबात आवडत नसे . आपण पूर्ण प्रयत्न करायलाच पाहिजे मग जे घडेल ते घडेल हि त्यांची फिलॉसॉफी . अफाट जिद्द . आणि म्हणूनच त्या साठीनंतरही गाण्यात डॉक्टरेट होऊ शकल्या

 कदाचित ही जिद्द माझ्यात कमी पडली . नोकरीला लागल्यावर सगळ्या धबडग्यात माझं गाणं सुटलं . नंतर एक-दोन ठिकाणी शिकायचा प्रयत्न केला पण ते शिकवणं पटलं नाही . महिन्यात पाचवा आठवडा आला तर क्लासला सुट्टी हे गणित मला झेपलं  नाही. शोभाताईंनी माझ्या मनात गुरु बद्दलचा बेंचमार्क इतका जबरदस्त सेट केला आहे की त्याच्या आसपास पोचणारं अजून तरी कोणी मिळालं नाहीये . एकच आशा आहे की शोभाताईंची एखादी शिष्याच ही गादी पुढे चालवेल .

नवरात्रीच्या निमित्ताने या गान सरस्वतीला प्रणाम !!!

 वैशाली फाटक 

२३ सप्टेंबर, २०१७

४ टिप्पण्या: