शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला भेट

 

" ममा, फिरायला आल्यावर बघितलेली अमेरिका आणि राहायला आल्यावर बघितलेली अमेरिका; खूप फरक आहे त्यात. खूप स्पर्धा आहे इथे आणि कोणी तुम्हाला फार मदत करत नाही. तुमचं तुम्हालाच पुढे जावं लागतं." मी आणि सोनिया जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी (GWU) बघायला गेलो तेव्हाचा हा संवाद.

कोविडमुळे दोन वर्ष ठरवूनही तिच्याकडे येता आलं नव्हतं. पहिल्यांदा -कॉनव्होकेशन  झालं. सगळे विद्यार्थी, पालक, प्रोफेसर्स virtually connect झाले होते. पण २०२१ मध्ये युनियव्हर्सिटीला २०० वर्षं पूर्ण झाली म्हणून दोन्ही वर्षांच्या कॉनव्होकेशनसाठी खूप मोठ्या समारंभाचे आयोजन केले होते. (वॉशिंग्टनमध्ये  चार युनिव्हर्सिटीज असल्या तरी फक्त GWU चे कॉनव्होकेशन  नॅशनल मॉल इथे  होते. नॅशनल मॉल इथे सगळी महत्वाची स्मारकं आहेत.) त्यावेळेस जाता  येईल असं वाटत असतानाच ट्रॅव्हल रेस्ट्रीकशन्स मुळे जमलं नाही. त्यामुळे या वेळेस आल्या आल्या पहिली भेट GWU ला.

"ममा, आता पुढचे दीड दोन तास आपण कॅम्पस टूर करायची आहे. भरपूर चालायची तयारी आहे ना ?" मेट्रोमधून बाहेर येतानाच सोनिया म्हणाली. तरी बरं तिला माहित आहे की युनिव्हर्सिटी वगैरे म्हटलं की माझ्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. गोडबोले आणि शिक्षण यांचं फार जवळचं नातं आहे. सगळे गोडबोले आयुष्यभर काही ना काही शिकत राहतात आणि शैक्षणिक संस्थांना हातभार लावतात असं संजू आम्हाला नेहमी चिडवत असतो.

युनिव्हर्सिटी कॅम्पस म्हटला की आपल्या डोळ्यासमोर विस्तीर्ण परिसर उभा राहतो. हिरवेगार वृक्ष, दगडी इमारती, त्याभोवती हिरवळ-बागा, विखुरलेल्या इतर इमारती, फारशी वाहतूक नसलेले रस्ते, पायवाटा, गजबजलेलं कॅन्टीन आणि ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे घोळके.

GWU मात्र या पेक्षा खूप वेगळी आहे. मेट्रो स्टेशन मधून बाहेर आलो की युनिव्हर्सिटीचा कॅम्पस सुरु. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक चौकांमध्ये लांबवर पसरली गेलेली ही युनिव्हर्सिटी पण सगळा कॅम्पस मुख्य शहरातच.  

टूरची सुरुवात अर्थातच सोनियाच्या 'Milken School of Public Health' पासून



या इमारतीची रचना अशी की आत शिरल्यावर लिफ्ट दिसतच नाही. अर्थातच सगळे समोरच्या जिन्यानेच वर जातात. एक जिना संपला की दुसऱ्या मजल्यावर जायला एक चक्कर मारून दुसऱ्या बाजूला जायला लागते, तिथे पुढचा जिना. दिवसभर सगळ्यांना सहजच व्यायाम होत राहतो. आग लागली तर दुसरा एक जिना आपोआप बंद होतो आणि सगळ्यांना मुख्य जिन्यानेच खाली यायला लागते. थिएटर स्टाइल क्लास रूम्स,प्रत्येक मजल्यावर छोट्या स्टडी रूम्स,डिस्कशन रूम्स, वेगवेगळी डिपार्टमेंट्स. मला तर स्कूल खूपच आवडली. पण सोनिया आता तिथे नसल्याने आम्हाला फार वेळ थांबता आलं नाही.  तिथून पुढे GW हॉस्पिटल. आपल्या दीनानाथ सारखी तिथेही मस्त कॉफी मिळते असं कळलं. तिथून पुढे मेडिकल, इंजिनियरिंग, सायन्स , आर्टस् , law अशी अनेक डिपार्टमेंट्स, टेक्सटाईल म्युझियम , डिझाईन म्युझियम, लहान मोठी बरीच होस्टेल्स , कम्युनिटी बिल्डींग्स, बँक , ग्रोसरी शॉप्स . सगळा परिसर विद्यार्थ्यांनी फुललेला. त्यांना काम करत बसण्यासाठी ठिकठिकाणी छोटे छोटे आयलँड्स, बेंचेस, वर्क स्टेशन्स.  त्या रस्त्यांवरून फिरताना परत एकदा कॅम्पस मधली उत्फुल्लता जाणवायला लागली. एकदम फ्रेश, ताजं -तवानं वाटायला लागलं.  


कॅम्पस मध्ये तीन मोठ्या लायब्ररीज आहेत. २४ तास चालू असतात. आत जाऊन पाहायची फार इच्छा होती पण ऍक्सेस नसल्याने बाहेरूनच पाहावी लागली. बरीच मुलं शेअरिंग बेसिसवर राहत असल्याने बराचसा अभ्यास, सबमिशन इथेच बसून पूर्ण करतात


बाहेरच्या रस्त्यावर बरीच वाहतूक असली तरी आतले रस्ते शांत होते. गाड्यांची फारशी वर्दळ नाही. बहुतेक सगळे विद्यार्थी 'कमवा आणि शिका' प्रकारातले असल्याने आपल्याकडे कॉलेज पार्किंगमध्ये गाड्यांची जशी तुडुंब गर्दी असते तसं काहीच दृश्य नव्हतं. सायकलीही दिसल्या नाहीत. मेट्रोची उत्तम सुविधा हेही एक कारण.

'स्टुडंट्स सेंटर' हे इथलं  एक महत्वाचं ठिकाण. आल्या आल्या सगळ्यांची ओळख होते  ती  इथेच. अनेक देशांचे सण -उत्सव इथे उत्साहात साजरे होतात. ही एकदम happening आणि रंगीबेरंगी जागा आहे. नवीन कार्यक्रमांची पोस्टर्स, वेगवेगळ्या जाहिराती, सूचना, टाइमपास करणारी मुलं, गजबजलेलं फूड कोर्ट,वरच्या मजल्यावर योगा  रूम, डान्स रूम, निवांत संध्याकाळी बसण्यासाठी रूफ टॉप टेरेस . मला तर ही जागा फारच आवडली.    

 कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टनचे पुतळे आहेत. त्यांचा मॅस्कॉट हिप्पोचा ही पुतळा आहे


असा हा कॅम्पस पुढे लिंकन मेमोरियलपाशी संपतो. "तुमच्या युनिव्हर्सिटीला आमच्यासारखा कॅम्पस नाही" असं जेव्हा बाकीच्या युनिव्हर्सिटीची मुलं यांना चिडवतात तेव्हा, आमच्याशेजारी लिंकन मेमोरिअल आहे असं  GWUची मुलं अभिमानाने सांगतात.

वाटेतच WHO चे ऑफिस लागले. ऐन कोविडच्या काळात सोनियाला  तिथे कोविड संदर्भात इंटर्नशिप करायला मिळाल्याने तिथे जाणे माझ्यासाठी खासच होते.






दीड-दोन  तासांची कॅम्पस टूर मला आठवणींमध्ये घेऊन गेली. डेन्टिस्ट्रीच्या दुसऱ्या -तिसऱ्या वर्षात असताना सोनिया काही रिसर्च पेपर्स वर काम करायला  लागली.दोन पेपर इंटरनॅशनल जर्नल मध्ये निवडले गेले . २०१६ मध्ये ती एकटीच अमेरिकेला जाऊन आली आणि तिथूनच कदाचित पुढची दिशा ठरत गेली.

मग वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती मिळवणं, तयारी करणं सुरु झालं. भारतात 'Public Health' ही शाखा अजून फार प्रचलित नसल्याने फारशी माहिती उपलब्ध  नव्हती. पण प्रो. सत्यनारायण सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि इतर सहा युनिव्हर्सिटी मिळत असताना GWU निवडण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला. वॉशिंग्टनडीसीमध्ये राहिल्याने इतर अनेक उपक्रमात भाग घेता आला. सिनेटरचे Congressional  Hearing कॅपिटल हिलमध्ये जाऊन ऐकायला मिळाले.

मला खात्री आहे, शिक्षणाच्या संधी शोधत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची साधारण अशीच गोष्ट असणार. स्वप्नांचा पाठपुरावा करत त्यांनी आपलं गाव किंवा देश, आपलं घर, मित्रमैत्रिणी या 'comfort zone' मधून बाहेर येत झेप घेतली आहे. सगळ्या अवघड गोष्टींवर मात करून पुढे जाण्याचं त्यांचं या लहान वयातलं धैर्य आणि या सगळ्यासाठी लागणारी  विचारातली सुस्पष्टता  मला अचंबित करते. जेव्हा जेव्हा मी या पिढीतल्या मुलांशी बोलते तेव्हा दर वेळेस मला वाटतं की मी २५ वर्षं उशीरा जन्माला यायला हवं होतं. GWU फिरून आल्यावर तर मला हे आज फारच प्रकर्षांनं जाणवलं. बघू या आता इथे एखादा कोर्स सिनियर सिटीझन साठी आहे का ते 😊😊          



९ टिप्पण्या:

  1. वैशाली किती छान वाटलं तुझा लेख वाचून,एकदम ताजंतवानं!शिक्षण इतकं सामावून घेणारं पाहिजे नाही का! सोनियाला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!आणि तूही तिथे नक्की काहीतरी करशील ह्याची खात्री आहे!

    उत्तर द्याहटवा
  2. घेऊन गेलीस आम्हाला तिथे वैशाली...Wonderful virtual experience...

    उत्तर द्याहटवा
  3. Nicely written Vaishali. Re- living experience for most of the parents of our age

    उत्तर द्याहटवा
  4. वैशाली, अतिशय सुंदर लिहिल आहेस. वाचताना आपणच तिथे फिरून हा सगळा अनुभव प्रत्यक्ष घेतोय असं वाटलं. सोनियाला किती आनंद झाला असेल आई-बाबांना तिची युनिव्हर्सिटी दाखवल्यावर!
    आम्हाला पण असं वाटलं होतं युनिव्हर्सिटी बघून की आपण 25-30 वर्ष उशिरा जन्माला यायला हवं होतं😀 आजच्या पिढीचं खूप कौतुक वाटतं. They work hard and play hard😀

    उत्तर द्याहटवा
  5. Nicely written Vaishali. Looking forward to some more of your blogs on your trip to USA.

    उत्तर द्याहटवा
  6. खरंच तिथे चक्कर मारून आल्यासारखं वाटलं, एरवी मला प्रवास वर्णन वाचण्याचा जरा कंटाळच येतो पण खूप सुटसुटीत आणि सहज लिहिलं आहेस. मजा आली.

    उत्तर द्याहटवा
  7. मस्त लेख! चपखल वर्णन असल्याने, डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभे राहते! हे कसब जपावे व वाढवावे! अनेक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  8. खूपच सुरेख लिहीले आहे. तिथे प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद आणी भावना दोन्ही मिळाल्या. सोनियाला शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  9. छान लिहिलं आहेस. नवीन ठिकाणी समरसून तिथलं वेगळेपण टिपताना त्याच वेळी त्याची वेगळ्या स्थळकाळाशी सुरेख शब्दात सांगड घातली आहे. अगदी प्रत्यक्ष फिरून आल्यासारखं वाटल.

    उत्तर द्याहटवा