बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

अदलाबदल

 

    "गॅस बारीक ठेव, त्या भांड्याला लाकडी डाव वापर, तुपाच्या डब्याच्या झाकणावर चहाचा चमचा कशाला ठेवलास ?" अशा बऱ्याच सूचना मला लेकीकडून मिळत असतात कारण आता तिच्या स्वयंपाकघरात मी लुडबुड करते ना ! सात-आठ वर्षापूर्वी घेतलेली शिकवणी तिने चांगली लक्षात ठेवली आहे ते बघून बरं वाटतं. एकेकाळी खोलीतला पसारा आवर म्हणून मी तिच्या मागे लागायचे आणि आता ती माझ्यामागे स्वयंपाकघर तिच्या पद्धतीने आवरत फिरत असते. सध्या अमेरिकेत आल्यापासून भूमिकांची मस्त अदलाबदल झाली आहे आणि मी हा बदल एकदम एंजॉय करतेय.

    माझी तीन वेळा ठरवून रद्द झालेली अमेरिका वारी या वेळेस पूर्ण झाली. त्यामुळे ' रात्र थोडी सोंगं फार ' असं आहे. आईला शक्य ती ठिकाणे दाखवायचा सोनिया आणि माझा होणारा  जावई यश यांचा प्रयत्न असतो. गेल्या आठवड्यात मुलांबरोबर ग्रीन्सबरो , ऍशविल, ब्लॅक माउंटन अशी मस्त ट्रिप झाली. एरवी कुठे जायचे म्हणजे मी भरपूर गूगल करते. कुठून कसं जायचं, काय पाहायचं, बरोबर काय घ्यायचं ... पण यावेळेस एकदम उलट. सगळी काळजी मुलांना. आपण फक्त  चला म्हटले की चलायचे. घरून गावाला निघताना दूध फ्रीज मध्ये ठेवलंय नां, गॅस, नळ नीट बंद केलेत नां किंवा air bnb सोडताना सगळ्या खोल्या बघणं , कचरा टाकणंआपलं काही कामंच नाही. लहानपणीचं  बिनजबाबदारीचं सुख बरेच वर्षांनी मिळतंय तर मजा करा.

    आधीच्या आठवड्यात सोनियाच्या ऑफिसची चार दिवस फिलाडेल्फियाला कॉन्फरन्स होती म्हणून मी पण तिच्या बरोबर गेले.म्हटलं तेवढेच एक ठिकाण बघून होईल. वॉकिंग टूर, ट्रॉली टूर कुठे कुठे जायचं असं मी बघून ठेवलं होतं. पण तिथे जरा 'वल्ली' लोक असल्याने आणि आम्ही जायच्या आदल्याच दिवशी हॉटेलजवळ एका माणसासोबत काहीसा प्रकार घडल्याने एकटं-दुकटं फिरू नका अशा सारख्या सूचना सोनियाला येत होत्या. एकदा तर ती मला कोपऱ्यावरच्या कॅफेतून सोडायला आली. “मी काय कधी एकटी फिरली नाहीये का कुठे?” अशी मी कटकट करताचतुझ्यापेक्षा इथले चार पावसाळे जास्त पहिले आहेत मीअसं म्हणून तिनं मला गप्प केलं. तरीही आपली आई कल्टी  मारून कुठेतरी  पटकन जाऊ शकते असा अंदाज असल्याने  तिने माझं लोकेशन ट्रॅकिंग चालू करून ठेवलं.वॉकिंग टूर नाही तर निदान Big Bus टूरसाठी मी परवानगी मिळवली आणि मस्त भर पावसात भटकून आले.  

    वॉशिंग्टनच्या घरी मात्र मी तिच्याशिवाय कुठे बाहेर पडत नाही. कारण इथे दर चार-पाच  माणसांमागे एक पाळीव प्राणी आहे. दर वेळेस लिफ्टमध्ये हे चार पायांचे मित्र नाहीत ना ते बघूनच मला चढावे लागते. तसंच एस्कलेटरवर चढताना मला काही होत नाही पण उतरताना मात्र चक्कर येते. त्यामुळे आईला (तिच्या हसण्यासकट) सांभाळून नेणे हा सोनियासाठी एक उद्योगच झाला आहे. एकदा तर रात्री वा फायर अलार्म वाजला. नेहमीप्रमाणे मी गाढ झोपेत. सोनियानेच उठवलं आणि अर्धवट झोपेत नऊ मजले उतरून खाली आलो. कुणाकडे तरी दूध जळले होते त्यासाठी इतक्या लोकांची आणि प्राण्यांची झोपमोड.

     अशी सगळी मजा चालू असताना कधी कधी मात्र आईची फार आठवण येते. कारण कळत-नकळत आता मी तिच्या सारखीच वागते.

    मला आठवतंय, कोव्हिडच्या पहिल्या वर्षी आई रहायला आली होती. मी अक्षरशः दिवसभर खुर्चीला चिकटल्यासारखी बसून काम करायचे. मग आई जमेल तशी मदत करत रहायची. संध्याकाळी काही तरी गरम खायला कर. कधी भाजी निवडून ठेव, थोडी फार आवरा-आवरी. आता मी ही तेच करते. "मी नंतर एकदम सगळी भांडी घासीन" असं सोनियानी बजावलं तरी दिवसभर पडतील तशी भांडी घासून टाकते. "त्यात काय गं, वेळ आहे तर घासून टाकली. बसून तरी काय करायचं सारखं " किंवा " मी आहे तोवर करते. नंतर तुलाच करायचं आहे सगळं"  चक्क आईचेच डायलॉग मारायला लागलेय मी !! सोनियाला दोन दिवस घरून काम करायचं असतं. जेव्हा तिचा व्हिडीओ कॉल असेल तेव्हा खोलीत आवाज न करता बसून रहाते. जणू काही ' Mute-Unmute/ teams background ' या गोष्टी मला माहितीच नाहीत. आपल्यामुळे तिच्या कामात व्यत्यय नको एवढंच वाटतं. दिवसभर मुलांबरोबर भरपूर भटकून , संध्याकाळी chill केल्यावर रात्री खोलीत एकटंच पुस्तक वाचत किंवा गाणी ऐकत बसायला बरं वाटतं. "तुम्ही या जाऊन सगळे, मी थांबते घरीच" असं बरेचदा आई म्हणतेच की.

    विचार करायला लागले की वाटतं किती सहज हे सगळं माझ्यात आणि सोनियात झिरपलं आहे. वळणाचं पाणी म्हणतात ते हेच की काय ? प्रत्येक भूमिकेत प्रवाही होणारं ?

    आता परत निघायची वेळ जवळ आली आहे. बघू या सध्याच्या भूमिकेचा 'जेट लॅग' किती टिकतो ते !!

 

८ टिप्पण्या:

  1. Wow Vaishali super. Most natural language to explain change of role. We must accept this fact and enojoy. Keep writting. 👌👌👍👍👏👏

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर झालाय लेख. कल आज और कल सारखी फिलिंग आली. तीन पिढ्यांमधल्या नात्यांचे बदलते संदर्भ आणि त्यांचा समजून उमजून केलेला स्वीकार याचं तू अगदी सहज सोप वर्णन केलं आहे. गोष्टी स्वीकारायला एवढ्या सोप्या असत्या तर बरं झालं असतं ना?

    उत्तर द्याहटवा
  3. वाह छान! जीवनातील सर्व भूमिका निभावयाची संधी सगळ्यानाच मिळते असं नाही! त्यामुळे त्या त्या भूमिकेत समरस होऊन त्यातील आनंद लुटावा हेच खरे! बाकी शब्दचित्र उभे करणे, नेहमी प्रमाणेच खास! अभिनंदन आणि शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय मार्मिक. तुम्हाला व्यक्त व्हायला अगदी मनसोक्त जमतं हे खुप छान आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. I have always enjoyed reading reading your true-life experiences. Daily life situations flashed in front of my after reading the 1st para. Your choice of words & simple language is truly impressive ....thoroughly enjoyed. Waiting for your next story.

    उत्तर द्याहटवा
  6. सुंदर झालाय लेख. काळानुरूप अपरिहार्य असणारा असा बदल खिलाडूपणे नुसता स्वीकारणं नव्हे तर तो एन्जॉय करण्याचं स्पिरीट लाजवाब.

    उत्तर द्याहटवा