सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

सुदाम्याचे पोहे

      " ईशाची मम्मा ना खूप छान  आहे दिसायलाआणि तिचे ड्रेस पण खूप छान असतात. पण अगं ती ना मम्मा नाही वाटत !".  सोनिया लहान असताना तिच्या पाळणाघरात एक नवीन मुलगी आली  होती. तिची आई रोज तिला सोडायला यायची आणि थोडावेळ थांबून मग जायची. सोनियाचं निरीक्षण फार. मला वाटलं असेल एखादी ' संतूर गर्ल'. पण सोनियाला वेगळंच काहीतरी जाणवत होतं आणि तिला नक्की काय वाटतंय ते मला कळत नव्हतं. आज एकदम ह्या प्रसंगाची आठवण झाली गौरीच्या मुखवट्यांचे फोटो बघून.  

या वर्षी घरचा गणपती करून निघाले. गौरीला पुण्यात नसल्याने सगळे अपडेट्स फोनवरच. गौरी गणपतीचे दिवस  आले की  वातावरणातच कसा उत्साह येतो. गणपतीचे स्टॉल लागायला लागतात आणि मग माझी एक हमखास चक्कर तुळशीबागेत होते. गौरीचे मुखवटे, स्टॅन्ड , साड्या , दागिने,सजावटीचं साहित्य यांनी तुळशीबाग गजबजून जाते. कुणाकडे खडयाच्या गौरी, कुणाकडे पितळ्याचे  किंवा चांदीचे मुखवटे. कुणाकडे तांब्या-भांड्यावर हळदी कुंकवाने रंगवलेल्या गौरी तर बरेच ठिकाणी शाडूचे मुखवटे. आमच्या घरी उभ्याच्या गौरी नसल्या तरी लहानपणी खळदकर मावशीकडे मी हक्काने तीन दिवस गौरी  आणायला,बसवायला, हळदीकुंकू द्यायला जात असे. लग्न झाल्यापासून आनंदिनी आणि अश्विनीकडच्या  गौरींचे दर्शन मी सहसा चुकवत नाही. गौरीच्या चेहेऱ्यावरचा प्रसन्न भाव आणि पूजेनंतर जे तेज येतं ते बघून मला एक वेगळीच ऊर्जा मिळते.

परवा एका मुखवट्याचा फोटो व्हॉट्स ऍप वर आला. अतिशय सुंदर मुखवटा. सुबक चेहेरा. आधुनिक केशरचना, कानावर बटा, कोरीव भुवया,डोळे-पापण्या -गालावर आजच्या पद्धतीचा मेकअप, कानात झुमके , गळ्यात नव्या जुन्या प्रकारचे दागिने. मुखवटा सुंदर होता यात शंकाच नाही पण त्यात मला काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. काही तरी कमी वाटत होतं, राहून गेल्यासारखं.  गौरीच्या साध्याशा मुखवट्यातला सात्विक शालीन भाव, मांगल्य, समाधान, तृप्ती कुठेतरी या नवीन मुखवट्यात मी शोधू पाहत होते.



मला एकदम आपली आधीची पिढी आठवली. आपली आई, आजी, काकू-आत्या, मामी-मावश्या, शाळेतल्या बाई,शेजारच्या काकू, मैत्रिणींच्या आया...सगळ्याजणी काही 'लौकिकार्थानं  सुंदर' नव्हत्या पण तरीही किती छान दिसायच्या. त्यातल्या बहुतेक जणी कधी ब्युटी पार्लरची पायरीही चढल्या नसतील. स्नो, पावडर, शिंगारचे ठराविक रंगातले कुंकू किंवा पिंजर, केसांची वेणी किंवा अंबाडा, ठराविक फॅशनच्या साड्या आणि दागिनेही मोजके चार-पाच प्रकारचे.

एखादा समारंभ किंवा हळदी कुंकू असेल तर चापून चोपून नेसलेल्या ठेवणीतल्या जरीच्या नऊवार किंवा पाचवार साड्या, गळ्यात तन्मणी,नाकात नथ, केसात घरचं गुलाबाचं फूल किंवा गजरा. चेहेऱ्यावर तृप्त, शांत समाधान!! रवी वर्म्याच्या चित्राइतकंच सुंदर वाटतं मला हे आठवणीतलं चित्रं.   

आपल्या मुलांवरचं प्रेम, आवश्यक ती शिस्त आणि धाक, मुलांच्या आजारपणात काळजीनं येणारा हळवेपणा,मुलांची छोटी हौस-मौज , हट्ट पुरवण्यातलं समाधान, लहान सहान गोष्टींचं डोळ्यातलं कौतुक, श्रावणी शुक्रवारी किंवा अश्विनी पौर्णिमेला मुलांना ओवाळताना चेहेऱ्यावरचा सात्विक आनंद. या सगळ्या नितळ भावनांचं 'आईपण' चेहेऱ्यावर खुलून येत असेल का? कुठल्याच सौंदर्याच्या परिभाषेत मांडता येणार नाही असं,बाह्य सौंदर्याच्या पलीकडचं वेगळंच परिमाण. जे फक्त अनुभवता येतं, आतून जाणवत राहतं.

आणि आज इतक्या वर्षांनी सोनिया तेव्हा मला जे सांगू पाहत होती ते पुरतं समजलं. डोळ्याला भावणारं, लुभावणारं  सौंदर्य शोधायच्या नादात कुठेतरी ‘मनीचा भाव’ हरवून बसलो का आपण?

 मला आठवतं,सोनिया झाली तेव्हा संजूचे मामा , भाऊमामा हॉस्पिटल मध्ये एका छोट्याशा कागदाच्या पाकिटात माझ्यासाठी नारळाच्या बर्फीच्या चार वड्या  घेऊन आले होते. डोळ्यात नेहमीचे मिश्किल हसू आणि मला प्रेमाने म्हणाले " सुधामामीने ताज्या वड्या केल्यात. बघ आज तुझं आणि नातीचं तोंड गोड करायला घेऊन आलो”. त्या वड्यांवर ना बदाम पिस्त्याची नक्षी, ना केशराचा वर्ख. पण इतकी अप्रतिम चव आणि भरपूर मायेचा ओलावा. तसंच एकदा लग्न झाल्यावर आम्ही दोघं वेंगुर्ल्याला फाटकांचे गणपतीचे देऊळ आहे तिथे गेलो होतो. गावात एक चुलत घर आहे जे गणपतीची व्यवस्था बघतात. जेवायला रोजचा साधा स्वयंपाक. गोड म्हणून त्या आजींनी दुभत्याच्या कपाटातून दोन छोट्या दह्याच्या वाट्या काढल्या, वरून साखर घातली आणि आमच्या पानात ठेवल्या. आजींनी किती साधेपणात वेळ साजरी केली. नाही तर आज काल कोणाला जेवायला बोलवायचे म्हणजे आधी काय बेत करायचा ते ठरवायचे, त्या साठी दहा ठिकाणाहून सामान आणायचे. एक दिवस आधी घराची स्वच्छता, क्रोकरी काढा, मग जेवणाच्या दिवशी टेबलाची, घराची सजावट आणि मग दुसऱ्या दिवशी सगळं क्रमाने आवरा. मग एवढा उटारेटा करण्यापेक्षा सरळ बाहेरच भेटू किंवा बाहेरून मागवू.

खरंच सगळं सुंदर, perfect, छान करण्याच्या नादात आपणंच आपलं आयुष्य कॉम्प्लिकेटेड आणि दिखाऊ करून घेतलं की काय?

पूर्वी कुणाला साडी द्यायची पद्धत पण किती छान होती. आई साडीची घडी मोडून, निऱ्या करून, भोवतीने गोल पदर गुंडाळून, साडीला हळद कुंकू लावून मग ज्यांना द्यायची त्यांना कुंकू लावून हातात देत असे. कागदातून घडी काढताना कुठला रंग असेल ही उत्सुकता, नव्या कोऱ्या साडीचा वास, पोतावरून हळूवार हात फिरवून बघणं असं सगळं रंग, गंध,स्पर्श आणि मनाला भावणारं नव्या नवलाईचं सुख आता उत्तम सजवलेल्या साडी बॉक्स मध्ये कसं मिळणार ? कोणी आलं की ओटी भरून कापड देणं ही पद्धत आपल्या व्यवहारी (प्रॅक्टिकल) विचाराने आपण जवळपास बंदच करून टाकली. पण मला वाटतं , घरात असलेल्या गोष्टींमधून एकमेकांना काही तरी देऊन प्रेम व्यक्त करायची हीअतिशय साधी -सोपी आणि आताच्या भाषेत sustainable पद्धत होती.

 पूर्वीच्या ह्या साध्यासोप्या गोष्टी... पण 'निर्मळ आनंदाची' देवाण घेवाण होत होती. पंचेंद्रियांच्या जाणिवांच्या पलीकडच्या , अंतरीच्या खऱ्या खुऱ्या भावनांचं मोल जाणून ते तितक्याच प्रेमानं जपलं जात होतं.

आपला सगळा आनंद, समाधान, सुख, यश दिखाव्यात,Likes मोजण्याचा, status ठेवण्याच्या नादात  'सुदाम्याचे पोहे' खाणारा आपल्या मनातला कृष्णच आपल्यापासून दुरावला की काय ??


p.c. आनंदिनी क्षीरसागर, Google

१२ टिप्पण्या:

  1. फारच सुंदर लेख, वैशाली. खरंच, काळाच्या ओघात तो कौटुंबिक साधेपणा, सहजता आणि आपलेपणा कुठेतरी हरवून त्याजागी एक चमत्कारिक ओढून ताणून पांघरलेलं अवघडलेपण, कृत्रिमता आणि त्याचा सूक्ष्म ताण तसंच अलिप्तता जाणवते. अर्थात लहान गावात गेल्यावर आजही जुन्या पाऊलखुणा दिसतातच, त्यावरच समाधान मानायचे.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप दिवसांनी आलेला हा तुझा लेख मनाला आरपार भिडणारा आहे वैशाली. केवळ आंतरिक सुंदर मन, सजग निरीक्षण वृत्ती, तरल संवेदना असणाऱ्या तुझ्या सारख्या सहृदयी व्यक्तीलाच असं लिखाण जमू शकतं याची खात्री पटली. लिहीत रहा. आनंद वाटत राहा. खूप खूप शुभेच्छा 👌🌹🌹👍😊

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी सहज आणि सोप्या शब्दात नेमक काय हरवत चालल आहे आणि ते किती महत्वाचं आहे याची आठवण करून दिलीत. सुंदर.

    उत्तर द्याहटवा
  4. आपल्या लोकल ते ग्लोबल प्रवासात ह्या छोट्या गोष्टी निसटून गेल्या. राहणीमान उंचावलं; जग विस्तारलं पण जगण्याचा अवकाश संकोचला. रंग, पोत आणि गंध मनाच्या कानाकोप-यात पोचण्यासाठी हा अवकाश फार आवश्यक असतो.
    आणि त्याही पलीकडे सतत उत्तम वेशभूषा आणि केशभूषा करुन आनन्दी, उत्साही अशी स्वत:ची प्रतिमा सतत जगापुढे उभी करण्याचा एक ताण असतोच.
    उलगडून दिलेली साडी घडी करुन ठेवली जायची आणि तशीच तिची घडी मोडली जायची.
    पूर्वी अशी प्रेमाने दिलेली साडी लवकरात लवकर एखाद्या साधारण जुळणा-या रंगाचं पोलकं घालून नेसून दाखवली जायची.
    आता इस्त्रीशिवाय आणि नेमकी रंगसंगती साधणारं पोलकं असल्याशिवाय साडी नेसत नाही. मग साहजिकच साडी आकर्षक बांधणीच्या खोक्यातच दिली जाते.
    तेव्हा आपण त्याला पातळ म्हणत असू.😊
    कालाय तस्मै नम:।

    उत्तर द्याहटवा
  5. अगदी मनात शिरणारं आणि घर करून राहणारं लिहिलं आहेस.

    उत्तर द्याहटवा
  6. Masta लेख वैशाली. नेमके भाव साध्या सोप्या शब्दात 👌👌👌
    Life is complex now and we ourselves are responsible for it ... That's for sure

    उत्तर द्याहटवा
  7. मनी नाही भाव
    म्हणे देवा मला पाव
    अशी सद्यस्थिती आहे. परवडतंय मग का नको करायला असा सूर असतो. पण ह्या भानगडीत पैसे आणि सोय are taking precedence over भावनिक ओलावा

    उत्तर द्याहटवा
  8. Beauty of this Article is- It throws light on our Futile Showmanship but Simultaneously it depicts the Importance of emotions attached with many traditional things which are being neglected so easily nowadays in this materialistic surroundings.

    उत्तर द्याहटवा
  9. खूप छान लेख! सर्व गोष्टींचे "व्यापारीकरण" होणाऱ्या आजच्या काळात दुर्दैवाने हेच अपेक्षित आहे! "नैसर्गिक" आणि "साधेपणा", म्हणजेच "बावळटपणा" अशी प्रतिमा तयार झाल्याने सर्वजण कृत्रिमतेकडे वळलेत आणि प्रवाहाबाहेर फेकले जाण्याच्या भीतीने नाईलाजाने स्वीकारत आहेत...

    उत्तर द्याहटवा